उद्धव ठाकरेंचं गुजराती प्रेम, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा म्हणजे ‘या’ मतांचं गोळाबेरीज आहे

मागे राज ठाकरेंचा न झालेला अयोध्या दौरा बराच गाजला.. आणि आता मात्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजतोय..

आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्याही आधी खासदार संजय राऊत आणि हजारो शिवसैनिक देखील अयोध्येला पोहोचले होते.

“हा दौरा राजकीय नसून श्रद्धेचा भाग आहे” असं जरी सांगण्यात येत असलं तरी अयोध्या दौरा आणि राजकारण हे समीकरणच राहिलंय.

निवडणूक आल्या कि, नेते अयोध्येला जातात. का जातात हे सांगण्याची गरज नाही पण आत्ताच्या आदित्य ठाकरेंचा दौऱ्याशी निगडित महत्वाचे काही मुद्दे समोर येतायत …

त्याच मुद्द्यांवर नजर मारुयात..

मुद्दा क्र. १  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं एक महत्वाचं स्टेटमेंट.

मुंबई समाचार या वृत्तपत्राला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर उपस्थित होते.  

यावेळेस उद्धव ठाकरेंनी विधान केलं कि, “मुंबईत मराठी व गुजराती हे दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्राचे हे नाते अधिकधिक दृढ व्हावे”.

आता मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा अर्थ काढायचा तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ते गुजराती भाषकांना आपलेसं करण्याचा प्रयत्न करतायेत.

मुंबईत जवळपास ३० लाख गुजराती मतदार असल्याचं सांगण्यात येतं. 

मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी ५० ते ५५ प्रभागांमध्ये गुजराती मतदारांचा थेट प्रभाव आहे. 

  • २०२१ पासूनच गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी   “मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धध ठाकरे आपडा’ नावाची मोहीम सुरु केलीय. 
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंना वरळीमधून उमेदवारी जाहीर झालेली तेंव्हा ‘केम छो वरळी’ हे बॅनर बरेच गाजले होते. 

जरी शिवसेना हा मराठी माणसासाठी म्हणून समोर आलेला पक्ष असला तरी त्यांना गुजराती मतदारांना आकर्षित करायची गरज का असावी ???

तर सेनेला मुंबईला आपल्या हातून मुंबई जाऊ द्यायची नाही आता तर भाजपासून फारकत घेतल्यानंतर सेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं प्रतिष्ठेची लढाई तर आहेच शिवाय मुंबईतल्या अस्तित्वाचाही प्रश्न आहे. 

काही राजकीय जाणकार म्हणतात कि, 

“शिवसेनेनं जरी दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय असतील यांच्या मुंबईत राहण्यावरून टोकाच्या भूमिका घेतल्या असल्या तरीही गुजरातींबद्दल शिवसेना कायम मवाळ राहिलीय”. त्यात मुंबईत गुजराती व्यापारी वर्ग बराच मोठा आहे आणि या व्यापारी वर्गाला दुखावणं शिवसेनेला परवडणारं नाही. म्हणूनच मुंबईत सत्ता कायम ठेवायची असेल तर गुजराती वर्ग सेनेला महत्वाचा असणारे. 

दुसरा मुद्दा म्हणजे- 

आजचा आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा का तर त्यामागचं कारण म्हणजे शिवसेनेला जसं हिंदू मतं गरजेचे आहेत तसेच उत्तर भारतीयांच्या मतांची देखील गरज आहे.  अलीकडेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झालेला. त्यात खासदार ब्रिजभूषण सिंह हे आघाडीवर होते. या विरोधातून मनसे अजून उत्तरं भारतीयांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट केलं गेलं. आता मुद्दा असाय कि, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला मात्र विरोध केला नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांचा एक सॉफ्ट कॉर्नर सेनेला आहे आणि सेनेचाही सॉफ्ट कॉर्नर उत्तर भारतीयांना आहे हे चित्र दिसतंय… 

जचा युपी दौरा मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना खेचण्यासाठी कामी येऊ शकतो, हे स्पष्टयं कि सेनेला उत्तर भारतीय मतदार महत्वाचे आहेत, कारण… 

मुंबई महानगरपालिकेत उत्तर भारतीयांचा दबाव असल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. 

२०१७ च्या पालिका निवडणुकित २२७ सदस्यसंख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ७२ बिगरमराठी नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी २६ मुस्लिम, २४ गुजराती, १४ उत्तर भारतीय, ५ दक्षिण भारतीय आणि ३ ख्रिश्चन आहेत. 

आता हे झालं निवडून आलेल्यांचं. पण त्यापलीकडेही इतर जागांवर पण उत्तर भारतीयांची मतं  निर्णायक असतात.  मुंबईत २७% पेक्षा जास्त उत्तर भारतीय मतदार आहेत, तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात  (MMR) १ कोटी ५० लाख मतदान उत्तर भारतीयांचं असल्याचं सांगण्यात येतं. मुंबईतील एकूण प्रभागांपैकी १८४ प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या ५ ते ५३ टक्क्यांपर्यंत आहे. यापैकी ६३ प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण २५% पेक्षा जास्त आहे. 

त्यामुळं उत्तर भारतीय मतांसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावणार एवढं फिक्स आहे.

तिसरा मुद्दा म्हणजे- 

मुंबईत महानगरपालिकेचं जे मराठी अस्मितेचं जे राजकारण होतं. ते राजकारण पूर्णपणे शिफ्ट होऊन सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण करायचं असं धोरण सेनेनं अखलंय. 

म्हणून ते गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय अशा सर्वांसोबतच सेना सॉफ्ट होतेय. मुंबईतल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी कधीकाळी सेनेला ‘मराठी’ माणूस महत्वाचा वाटायचं आता उत्तर भारतीय आणि गुजराती माणूस महत्वाचा वाटतोय. 

२०१८ च्या दरम्यान मराठी – अमराठी असा संघर्ष निर्माण झालेला, मुंबईत उत्तर भारतीयांवर हल्ले होत होते. तेंव्हा त्यांच्या बचावात शिवसेना समोर आली होती. शिवसेनेचे मुंबई शहरातील आमदार ‘उत्तर भारतियों के सन्मान में शिवसेना मैदान में’ अशी नारेबाजी करत रस्त्यावर उतरले होते. 

या सगळ्या वरून मुंबई – ठाण्यासारख्या शहरातील मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठीच राखीव असल्याचं चित्र दिसून येतंय. 

चौथा मुद्दा म्हणजे  –

हिंदुत्ववादाच्या राजकारणात शिवसेना बॅकफूटवर गेली होती, तेच डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरतोय. 

देशात आणि महाराष्ट्रात जसा मशिदीवरच्या भोंग्याचा विषय सुरु झाला होता तसं राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवर भाजप आणि मनसेकडून आरोप होऊ लागले. सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सामील झाली, आणि सत्तेसाठी सेनेने हिंदुत्ववाद सोडलंय.  

हिंदू -मुस्लिम, मराठी – गुजराती – उत्तर भारतीय हे सगळं धर्माचं, अस्मितेचं राजकारण सोडून त्याही पलीकडे जाऊन मुंबईतल्या लोकांच्या अनेक समस्या आहेत ज्यावर कुणालाच लक्ष द्यायचं नाहीये.

मुंबईतील सर्वात मोठी समस्या म्हणजे मुंबईतली पूरस्थिती असो, रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यांवर पाणी तुंबणे असो किंव्हा मग खराब ड्रेनेजची व्यवस्था असो. या सगळ्या समस्यांमुळे शिवसेनेला मुंबईकरांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. 

त्यामुळेच या सार्वजनिक मुद्द्यांना डावलून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्याची खेळी शिवसेनाच काय सर्वच पक्षांकडून चालू आहे…आणि याच राजकारणाचा भाग म्हणून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे पाहिलं जातंय. आता या अयोध्या दौऱ्याचा शिवसेनेला येत्या मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीत कितपत फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे..

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.