या मराठी माणसामुळे तुम्ही रविवारची सुट्टी एन्जॉय करताय.

शालेय जीवनातला आपला सर्वाधिक आवडता दिवस म्हणजे रविवार. सगळेच आतुरतेने रविवारची वाट बघत असतात, कारण यादिवशी बहुतांश लोकांना सुटी असते. त्यामुईल सगळ्यांकडेच रविवारचे वेगवेगळे बेत आखलेले असतात. पण, आजपासून १२९ वर्षांपूर्वी मात्र असं काही नव्हतं बरं का…!

रविवारची साप्ताहिक सुटी सर्वप्रथम मंजूर झाली ती १० जून १८९० रोजी. याच दिवसापासून भारतात कामगारांना हक्काची साप्ताहिक सुटी मिळाली. ही सुटी मिळवून देण्यात सर्वात महत्वाचा वाटा होता तो नारायण मेघाजी लोखंडे यांचा.

कोण होते नारायण मेघोजी लोखंडे ?

१३ ऑगस्ट १८४८ साली जन्मलेले आणि महात्मा फुलेंच्या विचारांचे पाईक असणारे सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे हे मुळचे पुणे जिल्ह्यातील कव्हेरसर गावचे. त्यांचे पालक चांगल्या व्यावसायिक संधीच्या शोधात त्यांच्या लहानपणीच ठाण्याला स्थायिक झाले. मेघाजी लोखंडे यांनी आपल्या मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी नारायण यांना स्कॉटिश मिशनच्या शाळेत दाखल केले. याच शाळेत त्यांच्यावर समतावादी विचारांचे संस्कार झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कल्याण येथे चीफ क्लर्क म्हणून काम करायला सुरुवात केली. मुंबईला बदली झाल्यानंतर रेल्वेच्या सेवेत असताना तसेच पुढे जिपिओपदी काम करताना त्यांना येथील कष्टकरी वर्गाचे आणि गिरणी कामगारांच्या हलाखीच्या परिस्थितीचे दर्शन झाले.

कामगारांना करावी लागणारी अपार मेहनत, त्याबदल्यात कायद्याचे कुठलेही संरक्षण नसणे आणि कामाच्या ठिकाणी असणारे अनारोग्यदायी वातावरण यामुळे कामगारांचे हाल-हाल होत असतं. हे बघून नारायण लोखंडे अतिशय व्यथित झाले आणि त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मांडवी मिलमध्ये स्टोअरकीपरची नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

याचदरम्यान त्यांनी कामगारांच्या समस्यांना हात घालायला सुरुवात केली, त्याचवेळी ते महात्मा फुलेंच्या संपर्कात आले. १ डिसेंबर १८७३ रोजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुलेंचे व्याख्यान आणि मुंबईत सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

फुलेंच्या सहवासाने प्रभावित झालेल्या लोखंडेंनी आपलं उर्वरित आयुष्य सामाजिक सुधारणांसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी १८७३-७४ च्या दरम्यान आलेल्या ‘फॅक्टरी अॅक्ट’मुळे त्यांच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडून आला.

तत्कालीन शासकीय कागदपत्रानुसार २८०० स्त्रिया व २५०० बालकामगार गिरण्यांमधील शोषणाचे बळी होते. त्यांचे संरक्षण करावे, असा आग्रह मँचेस्टर येथील गिरणी मालकांनी धरला. त्यांच्याविरोधात २ फेब्रुवारी १८७५ रोजी भारतातील पहिली गिरणी मालकांची संघटना असणाऱ्या “बॉम्बे मिल ओवनर्स असोशिएशन”ची स्थापना करण्यात आली.

गिरणी कामगारांचा लढा अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी लोखंडे यांनी पुण्यातील बंद पडलेले ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र नव्याने मुंबईतून सुरु केले. या पत्रातून त्यांनी मोफत व सार्वत्रिक शिक्षणाची, शेतकरी व शुद्रातीशुद्र, गरीब व होतकरू मुलांसाठी फ्रीशिप देण्याची तसेच ५ % जागा राखीव ठेवण्याची मागणी लोखंडे यांनी केली.

“बॉम्बे मिल हँड्स असोशिएशन” संघटनेची स्थापना.

याचवेळी ब्रिटीशांचा गिरणी कामगारांच्या आपत्यांविषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला. अहवालात ८ वर्षाच्या आतील मुलांना गिरणीत कामावर ठेऊ नये, कामाच्या वेळेत विश्रांतीची सुटी द्यावी आणि कामाची वेळ सकाळी ते सायंकाळी ६ ठेवावी अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. या शिफारसींवर नेमण्यात आलेल्या आयोगाने गिरणी कामगारांच्या प्रत्येक्ष मुलाखती घ्याव्यात असा आग्रह लोखंडे यांनी धरला.
कामगारांचे शोषण, कामाचे स्वरूप आणि मालकांची वृत्ती यावर लोखंडे उघड-उघड टीका करू लागले. या विचारांना मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी भारतातील पहिल्या “बॉम्बे मिल हँड्स असोशिएशन” या संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून ते कामगारांच्या वेतनासंबंधीच्या, ठराविक वेळेसंबंधीच्या मागण्या आक्रमकपणे मांडू लागले. ‘फॅक्टरी कमिशन’वर २ भारतीय कामगार प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

२४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांनी मुंबई येथील महालक्ष्मीच्या रेसकोर्स मैदानावर १० हजार गिरणी कामगारांची सभा बोलावली. या सभेत २ महिला कामगारांनी भाषण केले. ही आधुनिक भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना ठरली. या विराट सभेत कामगारांनी आपला आवाज दाखवून दिला. सर्व कामगारांनी आपल्याला रविवारची सुटी देण्यात यावी, अशी मागणी एकमुखाने केली.

या प्रश्नाचा विचार करण्यासाठी इंग्रज सरकारने सर जॉर्ज कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. कॉटन यांनी १० जून १८९० रोजी रविवारच्या सुटीस मंजुरी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. हा नारायण मेघाजी लोखंडे आणि कामगार चळवळीचा मोठाच विजय ठरला.

पुढे सरकारने लोखंडे यांची ‘फॅक्टरी लेबर कमिशन’वर नियुक्ती केली. १८९१ चा विधायक ‘फॅक्टरी अॅक्ट’ निर्माण होण्यात त्यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळेच कॉटन जॉर्ज यांनी लोखंडे यांचा ‘अतिशय बुद्धिमान आणि समर्थ कामगार पुढारी’ असा उल्लेख केला. सध्या कामगारांचे ८ तास आहेत. लोखंडे यांनी १८९६ मध्येच आरोग्याच्या दृष्टीने कामगारांचे पावणेसात तास असावेत, असे सांगितले होते. दृष्ट्या माणसांची खूण यापेक्षा वेगळी काय असते…?
प्रा. गणेश राउत.
हे ही वाच भिडू.
Leave A Reply

Your email address will not be published.