क्रिकेट सोडल्यानंतर आकाश चोप्राचं खरं करियर सुरु झालं….

के एल राहूल हा मागच्या काही दिवसांपासून फलंदाज म्हणून सतत अपयशी ठरताना दिसतोय. अगदी त्याचा खेळ इतका खालावलाय की, त्याने टीममध्ये असावं की नसावं या विषयावर टीव्हीसमोर बसून गप्पा हाणणाऱ्या पोरांपासून ते अगदी माजी क्रिकेटर्समध्येही वाद होतायत.

आता भारतीय संघातला माजी बॉलर व्यंकटेश प्रसाद याने या विषयात त्याचं मत व्यक्त केलंय.

मागच्या तीन इनिंग्जमध्ये त्याने किती धावा केल्यात याची आकडेवारी मांडत त्याच्याऐवजी भविष्यातल्या सामन्यांमध्ये शुभमन गिल टीमकडून ओपन करताना दिसू शकतो असं म्हटलंय.

दुसऱ्या बाजूला आकाश चोप्रा हा कॉमेंटेटर आणि माजी क्रिकेटपटू मात्र के एल राहूलच्या बाजूने उभा राहिलाय. त्याच्या बाजूने बोलताना आकाश चोप्राने एक वेगळी आकडेवारी मांडली ज्यात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये रोहीत शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर नंतर सर्वोत्तम फलंदाज म्हणून राहूलचा नंबर लागतोय.

यावर मग प्रसादने अजिंक्य रहाणेचा दाखला दिला त्यावर आकाश चोप्राने पून्हा ट्वीट करत प्रत्यूत्तर दिलं. हे सगळं मॅटर आज दिवसभर सुरू होतं. आता पूर्ण विषय काय झाला कसा झाला ते त्यांच्या ट्विटरवर तुम्हाला वाचायला मिळेलच.

आकाश चोप्रा हा आपल्याला एक उत्तम कॉमेंटेटर म्हणून माहितीये, पण त्याचं इंटरनॅशनल करियर काय होतं आणि मग तो अचानक क्रिकेट कॉमेंट्रीकडे कसा वळला याबद्दल जरा माहिती करून घेऊ.

आग्रा शहरामध्ये त्याने क्रिकेटचं प्राथमिक शिक्षण घेतलं. दिल्लीतल्या सॉनेट क्रिकेट क्लबमधून खेळत असताना त्याच्या क्रिकेट करियरची सुरवात झाली. ओपनिंग बॅट्समन म्हणून तो खेळत असे. १९९५ साली वेस्ट इंडिज टूर मध्ये इंडिया स्कुल बॉईजकडून आकाश चोप्राला खेळायची संधी मिळाली. अंडर १६ आणि अंडर १९ मध्ये दिल्लीच प्रतिनिधित्व सुद्धा त्याने केलं.

चांगल्या खेळीच्या जोरावर आकाश चोप्राने भारताच्या टेस्ट संघात आपली वर्णी लावली. २००३ साली न्यूझीलँड विरुद्धच्या टेस्ट सामन्यात त्याचं पदार्पण झालं. पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये चोप्राने अनुक्रमाने ४२ आणि ३१ धावांच्या छोटेखानी खेळ्या केल्या. मोहाली टेस्टमध्ये अर्धशतक झळकावून चोप्राने आपल्या खेळाची प्रचिती एव्हाना दिलीच होती.

आकाश चोप्राने वीरेंद्र सेहवाग सोबत बऱ्याच सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून जबाबदारी पार पाडली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आकाश चोप्राची निवड झाली याचं कारण होतं तो मैदानावर टिकून खेळायचा आणि स्ट्राईक रोटेट करत असायचा. मेलबर्न आणि सिडनी टेस्ट यामध्ये वीरेंद्र सेहवाग सोबत त्याने शतकी भागीदारी करून अनेकांची मने जिंकली होती. 

पाकिस्तान दौऱ्यावर सुद्धा तो चांगल्या फॉरमॅट होता पण त्यावेळी युवराज सिंग नावाचं वादळ आलं आणि त्याने संघात आपली दावेदारी पेश केली. इकडे आकाश चोप्राचा फॉर्म गायब झाला आणि तो कमी धावा करून बाद होऊ लागला.

तर युवराज सिंगने दुसरीकडे आपला फॉर्म कायम राखत धडाकेबाज बॅटिंग करून संघात जागा फिक्स केली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी त्याची निवड झाली मात्र खराब फॉर्म सुरूच राहिला. यामुळे गौतम गंभीर हा ओपनर बॅट्समन म्हणून खेळू लागला होता.

पुढे आयपीएलमध्ये आकाश चोप्राला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि नंतर राजस्थान रॉयल्स संघाने त्याला निवडलं पण संधी दिली नाही. ट्वेन्टी ट्वेन्टी मधेही आकाश चोप्राची पाठ खराब फॉर्मने सोडली नाही. त्यामुळे क्रिकेटच्या सगळ्याच फॉर्मॅटमधून त्याने संन्यास घेतला. 

इथं आकाश चोप्राच्या बाबतीत वेगळं घडलं. रिटायरमेंट नंतर लोकांचं करियर डबघाईला येतं पण आकाश चोप्राचं खरं करियर इथून सुरु झालं. क्रिकेट कॉमेंट्री करून लोकांना त्याने आकर्षित केलं. क्रिकेट समीक्षक आणि उत्कृष्ठ समालोचक म्हणून क्रिकेट विश्वात त्याने आपली एक वेगळी शैली निर्माण केली. क्रिकेट खेळणाऱ्या आणि पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचा आवाज माहिती आहे.

कधी कधी कॉमेंट्रीच्या भरात तो इतका वाहवत जातो कि आवडत्या खेळाडूला टिप्स दिल्या म्हणून चाहत्यांकडून त्याला शिव्या देखील पडतात. पण आकाश चोप्राच्या प्रसिद्धीचं कारण म्हणजे तो एखाद्या बोरिंग मॅचमध्ये सुद्धा आपल्या आवाजाने जिवंतपणा आणतो.

आयपीएलमध्ये आपल्या कॉमेंट्रीच्या जोरावर अनेक रंगतदार सामन्यांना त्याने टिपेला पोहचवलं. रवी शास्त्री आणि नवजोत सिंग सिद्धू नंतर क्रिकेट कॉमेंट्री मध्ये सगळ्यात जास्त फेमस असणारा आकाश चोप्रा हा खेळाडू आहे. इंस्टाग्राम रिल्सवर गावखेड्यातील तरुण क्रिकेट खेळताना त्याच्या आवाजाचा प्लेबॅक ठेवतात. यावरून आकाश चोप्राची लोकांमध्ये असलेली क्रेझ कळून येते. 

इंग्रजी कॉमेन्ट्रीला पर्याय म्हणून आकाश चोप्राकडे लोकांचा ओढा वाढला आणि शब्दांचं भांडार असलेला आकाश चोप्रा लोकांच्या विश्वासाला खरा उतरला. अनेकदा त्याच्यावर टीका हि केलीयं जाते कि त्याच क्रिकेट करिअर इतकं वाईट होतं आणि तो इथं चांगल्या खेळाडूंवर रान हाणतो. पण आकाश चोप्राच्या आवाजाशिवाय क्रिकेटची मजा नाही.

माही मार रहा हें…..

जा रे जा ये हे रवींद्र जाडेजा…..

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.