श्रीलंकेच्या रेडिओला उत्तर देण्यासाठी तयार झालेलं विविधभारती बंद होत आहे का..?

भारतात ज्या लोकांचं वय आता ४० पेक्षा जास्त असेल त्यांनी जुन्या काळी हमखास हातात ट्रान्झिस्टर घेऊन घरभर फिरायचं, मरफी रेडिओचा अँटिना सरळ करायचा असे प्रकार केले असणार. त्याच कारण एकच ‘देश की सुरीली धड़कन’ चा म्हणजेच विविधभारतीच कार्यक्रम ऐकण्यासाठी.

कधी अभ्यासातून वेळ मिळाल्यावर, कधी रानात काम करताना, महिलांनी स्वयंपाक घरात काम करताना, किंवा आराम खुर्चीत बसल्यावर कधीना कधी विविधभारतीचे कार्यक्रम ऐकलेच असणार. त्यात ऐकवल्या जाणाऱ्या प्रत्येक गाण्याशी काही ना काही तरी आठवणी जोडल्या गेलेल्या असणार.

पण याच आठवणी आता कायमच्या आठवणी राहणार आहेत. आताच्या आणि पुढच्या काळात येणाऱ्या पिढीला विविधभारतीवरची ही गाणी ऐकताच येणार नाहीत.

कारण मागील ६३ वर्षांपासून सुरु असलेली आकाशवाणीची हि सेवा बंद होणार आहे. या संबधितचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे. 

दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा, पश्चिम बंगालसह दक्षिणेकडील ४ राज्य अशा एकूण ८ राज्यांमधील हि सेवा कायमची बंद करण्यात येणार आहे. येत्या एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

अशी झाली होती विविध-भारतीची सुरुवात

१९५५-५६ चा काळात देशात सिलोन रेडिओ (श्रीलंकाची रेडियाे प्रसारण सेवा) खूप प्रसिद्ध होती. कारण त्यावेळी भारत सरकारने आकाशवाणीवर चित्रपटांमधील गाणी लावण्यास परवानगी दिली नव्हती. ही गाणी ऐकून लोक बिघडू शकतात त्यामुळे केवळ सुगम संगीतावर आधिरीत गाणी रेडिओवर ऐकवली जात असतं.

सिलोनची नवीन गाणी लावण्याची कल्पना तुफान चालली. लोक घरात, शहरात फिरताना यावरची गाणी ऐकू लागली. त्यावरची गाणी, कंटेंट दर्जेदार होताच पण व्यावसायिकरण आणि आर्थिक गणित पण व्यवस्थित होती. अनेक कंपन्या आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी सिलोनमध्ये जाहिरात देत असत.

या जाहिरातींमुळे देशाचा पैसा बाहेर जात होता.

हे थांबवण्यासाठी सरकारने यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली. त्यातून एक रेडिओ चॅनेल सुरु करण्याची कल्पना पंडित नरेंद्र शर्मा यांच्या डोक्यात आली. ती कल्पना मान्य झाली आणि याची जबाबदारी त्यांचं दिली गेली. सोबतीला होते केशव पांडे, गोपालदास, गिरिजा कुमार माथुर यांच्यासारखे साहित्य आणि रेडिओ प्रसार सेवेतील एकसे बढकर एक दिग्गज.

३ ऑक्टोबर १९५७ रोजी आकाशवाणीवरून शीलकुमार शर्मा यांच्या आवाजात विविध-भारतीची पहिली उद्घोषणा झाली, ती काहीशी अशी होती.

‘यह विविध भारती हैं, आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम, पंचरंगी यानी पांच ललित कलाओं- गीत, संगीत, नृत्य, नाट्य और चित्र का समावेश.

विविध भारतीवर पहिले गाणे ऐकवण्यात आले, ते होते ‘नाच रे मयूर’… विविध भारतीचे आद्यप्रवर्तक पंडित नरेंद्र्र शर्मा यांनी ते लिहिले होते आणि मन्ना डे यांनी ते गायले होते. अनिल विश्वास यांनी त्या गाण्याला संगीत दिले होते.

त्यानंतर हि सुरीली धडकन अशी काही सुपर-डुपर हिट झाली कि लोक सिलोन रेडिओच नाव घ्यायचं देखील बंद झाली.  यामध्ये अमीन सायानी यांच्या आवाजामधील ‘बिनाका गीतमाला’ तर गोष्टच काही और होती. संगीतामधील पहिला सुर ‘षड्ज’ म्हणजे ‘स’ सारखा. एकदा हे फिक्स झालं कि पुढचे सर सुर आपोआप फिक्स व्हायचे.

त्याच सात सुरांसारखे विविध भारतीवरचे ७ कार्यक्रम सुप्रसिद्ध होते.

१. बिनाका गीतमाला

यात हिंदी चित्रपटांचं टॉप -१० गाण्यांचं काउंटडाउन असायचं. याला अमीन सयानी आपल्या बहारदार आवाजात छान पॉस घेऊन कोणतं गाणं कधी प्ले होणार आहे, आता किती नंबरच गाणं ऐकलं. असं सगळं सांगत होते दर बुधवारी रात्री ८ ते ९ या दरम्यान हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा.

२. जयमाला

हा भारतीय रेडिओच्या इतिहासातील एकमेव कार्यक्रम होता जो सैन्य दलातील सैनिकांसाठी बनला होता. रोज संध्याकाळी ७ वाजून पाच मिनिटांनी हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा. सैन्यदलातील शिपायांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण आपलं आवडीचं गाणं ऐकण्यासाठी फर्माईश करायचा.

त्यांची हि फर्माईश प्राण, अमरीश पुरी, गुलज़ार, अमिताभ बच्चन, अमाेल पालेकर, एसडी बर्मन, आरडी बर्मन, मीना कुमारी अशा मोठ्या विभूतींनी पूर्ण केली. यांनी केवळ गाणीच सादर केली नाहीत तर त्यांच्याशी संवाद देखील साधायचे.

३. छायागीत

हा कार्यक्रम रात्री १० वाजता प्रकाशित व्हायचा. कमल शर्मा यांच्यासारख्या रेडिओमधील सुप्रसिद्ध प्रस्तुतीकार हा कार्यक्रम सादर करायच्या. अगदी आपल्या शायराना अंदाजात. ती काहीशी अशी,

“चांद की चांदनी में रूमानियत भरते हुए. ऐसा ही एक कार्यक्रम सुनकर तरोताज़ा कीजिए पुरानी यादों को.”

४. हवा-महल :

या कार्यक्रमांमधून गोष्टी आणि कथानकांना नाट्य रुपात सादर केले जायचे बरेचदा हास्यविनोद लोट पोट होणारी कथानक असायचे. हा कार्यक्रम रात्री आठ वाजता यायचा. यात यापूर्वी अमरीश पुरी ओम पुरी असरानी यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांनी आपली कला सादर केली होती.

५. संगीत-सरिता

या कार्यक्रमाची वेळ म्हणजे सकाळी ७:३० मिनीटांची. संगीताची एकदम मनापासून आवड अणाऱ्यांना हा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच होती. शास्त्रीय संगीतातील विविध रागांची मूलभूत माहिती इथे दिली जायची. सोबतच त्या रागावर आधारित एखाद्या संगीता मोठ्या कलाकाराच्या सादरीकरणाद्वारे चित्रपटातील गाणी देखील ऐकवली जात होती.

अशाच एका कार्यक्रमात शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर यांनी राग तिळक कामोद च्या बाबतीत सांगितले आहे

६. आज के फनकार

हा कार्यक्रम यायचा सकाळी ९:३० वाजता. कोणत्याही एका सुप्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार यांना केंद्रस्थानी ठेवून त्यात त्यांना त्यांच्या रचना सादरकरण्यांची आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी दिली जायची.

७. सखी-सहेली

दुपारी ३ नंतर घरच्या कामातून निवांत झालेल्या महिलांमुळे हा कार्यक्रम महिलावर्गात खूप प्रसिद्ध होता. याचे सादरीकरण सुप्रसिद्ध सादरकर्त्या ममता सिंह यांच्याकडे होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या घराघरात पोहोचल्या.

या कार्यक्रम पुर्णतः महिला वर्गाला समर्पित असल्यामुळे त्यात महिलांशी संबधीत सर्व प्रश्नांवर बोलले जायचं. त्यांना त्यांच्या आवडीच्या रचना देखीलं ऐकवाल्या जायच्या.

८. पिटारा

जसं नाव तसंच स्वरुप. म्हणजे मस्ती, मनोरंजन आणि माहितीचा पिटारा. यात रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांच सादरीकरण व्हायचं. यात कधी ‘हॅल्लो फर्माईश’ (फोनद्वारे) तर कधी ‘सेल्‍युलाईड के सितारे’ (चित्रपट कलाकारांच्या मुलाखती) तर कधी ‘सरगम के सितारे’ (संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या मुलाखती) तर कधी आरोग्याशी संबंधीत ‘सेहतनामा’. त्यामुळे या पिटाऱ्यात खरचं सगळं असायचं.

पुढे काळ बदलला. विविधभारतीने बदलत्या वेळेनुसार आपलं स्वरुप देखील बदललं. इतर अनेक एफएम चॅनलं सारखं विविध भारती देखील इंटरनेटवर आले. 102.8 एफएम विविध भारतीचा आधुनिक चेहरा होता.

बदलत्या काळानुसार श्रोता कदाचित कमी झाला असेल. पण विविधभारतीला मानणारा वर्ग मात्र अजिबातच कमी झाला नव्हता.

भारतरत्न लता मंगेशकर यांनी यांनी दिलेल्या एका प्रतिक्रीयेवरुन या कार्यक्रमांचे महत्व आपल्याला लक्षात येवू शकते. त्या म्हणाल्या होत्या,

जर विविध भारती नसते तर आम्हा मंगेशकर बहिणींचा (लता, आशा, उषा) आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला नसता.

त्यांच म्हणणं खर देखील आहे. म्हणूनच विविध भारती ‘देश की सुरीली धड़कन’ आहे. जे प्रत्येक चाहत्यांचा आणि श्रोत्याच्या ह्रदयात आहे.

पण आता लवकरच विविधभारती आपला निरोप घेणार आहे. पण त्यामुळे आकाशवाणीच्या रिले स्टेशन्सनी नियमांनुसार आपल्या स्थानिक प्रसारणाची वेळ संपल्यानंतर काय प्रसारित करायचे हे एक मोठे आव्हान असणार आहे. इथे सकाळी दहा नंतर सायंकाळपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित होतात.

आकाशवाणीमधील एका उद्घोषकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,

सध्या महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपुर या तीन प्रमुख आकाशवाणी केंद्रावर स्थानिक कार्यक्रम निर्मितीचं नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच स्वतःचे प्रसारणाचे अंतर पुढील तीन महिन्यांपर्यंत वाढवावा लागेल. हे एक मोठे आव्हान असणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.