४ वर्षे शूटिंग रखडलं, अंगावरचे कपडे फाटले तरी कलाकारांनी काम थांबवलं नाही

बजेट हा मराठी सिनेमासाठी नेहमीच चर्चेत असणारा विषय. खूप वेळेस बजेटची गणितं न जुळल्यामुळे शूटिंग सुरू असलेले अनेक सिनेमे बंद पडल्याची सुद्धा काही उदाहरणं आहेत. आज तुम्हाला मराठी सिनेसृष्टीमधील अशाच एका सिनेमाचा किस्सा सांगणार आहोत.

या सिनेमाचं नाव ‘आम्ही जातो आमच्या गावा’.

१९६८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण भिडूंनो, या सिनेमाचं शुटिंग जवळपास ४ वर्ष सुरू होतं. हा सिनेमा बनवायला इतकी वर्ष का लागली ???

सुरुवातीला ‘आम्ही जातो आमच्या गावा’ सिनेमाविषयी…

शाळेमध्ये असताना सांस्कृतिक समारंभात एकदा तरी आपण सर्वांनी ‘देहाची तिजोरी’ हे गाणं गायलं असावं. तेव्हा या गाण्याचे शब्द किती अर्थपूर्ण आहेत, हे समजण्याची बुध्दी नव्हती. पण आत्ता जेव्हा हे गाणं ऐकण्यात येतं तेव्हा खूप छान वाटतं.

‘पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची , मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची’

असे अर्थपूर्ण शब्द जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून साकार झाले आहेत. हे गाणं ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या सिनेमातलं आहे, हे फार उशीरा कळालं.

या सिनेमाची कथा मोठी गमतीशीर…

तुरुंगातून पळालेले तीन कैदी एका सज्जन माणसाच्या घराचा आश्रय घेतात. सुरुवातीला त्यांचा उद्देश चोरी करण्याचा असतो. पण त्यानंतर या तीन कैद्यांमध्ये कसं परिवर्तन घडतं आणि त्या सज्जन माणसाच्या आयुष्यात असलेल्या अडचणी हे तीन कैदी कशा सोडवतात , याची धमाल गोष्ट म्हणजे ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ हा सिनेमा.

‘आम्ही जातो आमुच्या गावा’ सिनेमाचे निर्माते – दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांचा हा सिनेमा १९६८ साली प्रदर्शित झाला असला, तरी या सिनेमाचं शुटिंग १९६३ साली सुरू झालं होतं.

या काळात कमलाकर तोरणेंना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. यामुळे शूटिंग लांबत चाललं होतं. शूटिंग एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पुढचे चार – पाच वर्ष सुरू होतं.

या वर्षांमध्ये कलाकार सिनेमासाठी जे कपडे वापरत होते, ते कपडे पार झिजून गेले.

तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की इतकी वर्ष शूटिंग चालू होतं आणि एकाही कलाकाराने सिनेमा सोडला नाही. तर भिडूंनो, तो काळ वेगळा होता. तेव्हा अभिनयासाठी सिनेमा किंवा नाटक हीच माध्यमं होती. त्यामुळे कलाकार सुद्धा त्यांचं काम निवांत करू शकत होते. सध्या जी गडबड असते आणि कलाकारांना श्वास घ्यायला फुरसत नसते, असं काही नव्हतं.

तसेच सिनेमा कसाही असो पण एखाद्या सिनेमाशी असलेली बांधिलकी आणि दिलेला शब्द कलाकारांसाठी महत्वाचा होता.

या सिनेमात सूर्यकांत, श्रीकांत मोघे, मधू आपटे, उमा भेंडे असे दिग्गज कलाकार होते. या सर्व कलाकारांनी सुद्धा कोणतीही तक्रार न करता पार विटून गेलेले हे कपडे वापरून हा सिनेमा पूर्ण केला.

हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी सिनेमाचे निर्माते – दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी एका धनाढ्य व्यक्तीकडून दहा हजार रुपयांचं कर्ज काढलं.

आत्ता ही रक्कम वाचल्यावर कमी वाटत असेल. १९६८ सालाचा विचार केल्यास ही रक्कम जास्त होती. अखेर ९ ऑगस्ट १९६८ रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आणि आश्चर्य म्हणजे सिनेमा सुपरहिट झाला. आर्थिक दृष्ट्या सुद्धा सिनेमाने भरपूर कमाई केली.

निर्माते – दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांना भरपूर आनंद झाला. सिनेमा हिट झाल्याने त्यांना आर्थिक फायदा सुद्धा झाला. पूर्वीच्या काळी सिनेमा हिट झाल्यावर कलाकारांना आठवण म्हणून ट्रॉफी दिल्या जायच्या. या ट्रॉफी लाकडाच्या किंवा पत्र्याच्या असायच्या. पण कमलाकर तोरणे यांनी आनंदाच्या भरात सर्व कलाकारांना चांदीच्या ट्रॉफी दिल्या. ज्या माणसाकडून त्यांनी दहा हजार रूपयांचं त्याचं कर्ज घेतलं होतं त्याचं कर्ज त्यांनी व्याजासकट परत केलं.

इतकंच नव्हे, तर सिनेमाशी निगडीत सर्व कामगार आणि तंत्रज्ञांना त्यांनी दहा हजार रुपयांचा बोनस दिला.

जो सिनेमा झिजलेल्या कपडेपटांमध्ये तयार झाला होता, एका क्षणाला असंही सर्वांना वाटतं होतं की, या सिनेमाचं शुटिंग बंद पडणार.

जो सिनेमा बनवायला चार वर्षांहून अधिक काळ लागला. अशा ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ सिनेमाने भरघोस यश संपादन केलं. आणि निर्माते – दिग्दर्शक यांनी सुद्धा हात आखडते न घेता सर्वांसोबत मोकळेपणाने आनंद साजरा केला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.