शाहरुख सुपरस्टार होण्यामागे आमीर खान आणि सनी देओलची भांडणे कारणीभूत ठरली.   

सध्या बॉलिवूडमध्ये एकच विषय ट्रेंडीगला आहे तो म्हणजे शाहरुख खान. त्याचा पठाण पिक्चर रिलीझ व्हायला फक्त काहीच दिवस बाकी आहेत. पठाणला आसाममध्ये विरोध केला जातोय, त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी ‘शाहरुख खान कोण आहे ?’ असं वक्तव्य केलं. तर नंतर शाहरुखनंच त्यांना फोन केल्याच्या बातम्याही आल्या.

या सगळ्यात एका बाजूला शाहरुखच्या पाठिंब्याच्या पोस्ट पडतायत, तर दुसऱ्या बाजूला शाहरुखच्या विरोधात. या निमित्तानंच चर्चेत येतोय शाहरुखला सुपरस्टार बनवायचा किस्सा. 

नव्वदच्या काळात घडलेला हा किस्सा. यशराजवाले त्याकाळात सुद्धा बॉलीवूडमधील सर्वात मोठे बॅनर होते आणि यश चोप्रा सर्वात यशस्वी दिग्दर्शक. अमिताभला घेऊन बनवलेल्या दिवार पासून ते सिलसिला, चांदणी वगैरे कित्येक सिनेमे त्यांचे सुपरहिट झाले होते. मारधाडीवाला सिनेमा असला तरी त्यात त्यांनी सौंदर्य दृष्टी जपलेली असायची.

यश चोप्राच्या चांदणीनंतर लम्हे आणि परंपरा मध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाल नव्हत. काहीही करून एक मसालेदार सुपरहिट सिनेमा बनवायचा त्यांच्या डोक्यात होतं. त्यांच्या मुलांनी कुठल्याशा इंग्लिश सिनेमाची स्टोरी त्यांना सांगितली. त्यावर यश चोप्रांनी एक कथा लिहिली.

पिक्चरच नाव दिल होतं डर.   

हा एक सायकोलॉजीकल थ्रिलर सिनेमा होता. पिक्चरचा हिरो होता त्याकाळात सुपरस्टार असणारा सनी देओल. पण यात हिरोच्या रोलच्या तोडीस तोड व्हिलनचा सुद्धा रोल होता. काही काही सीनमध्ये व्हिलन फुटेज खाणार हे दिसत होतं. व्हिलनचा रोल लिहिला होता संजय दत्तला डोळ्यासमोर ठेवून. पण काही कारणांनी त्याला करायला जमल नाही. मग तो रोल गेला आमीर खान कडे.

कयामत से कयामत तक मुळे पहिल्या सिनेमापासून सुपरस्टार झालेल्या आमीरला देखील खूप दिवसापासून एका हिट ची गरज होती. यश चोप्रा यांच्या पडलेल्या परंपराच्या मोठ्या स्टारकास्टमध्ये तो देखील होता. 
 
पण आमीर खानने यापूर्वी कधी निगेटिव्ह रोल केला नव्हता. त्याला स्टोरी खूप आवडली होती. त्याने यशचोप्रा यांना होकार दिला. काही दिवसांनी शुटींगही सुरु होणार तेव्हा मात्र आमीर खानने स्क्रिप्ट मध्ये शंका काढली.
 
झालं अस होतं की क्लायमॅक्समध्ये एक सीन आहे जिथे व्हिलन हिरोला दोन वेळा चाकू मारतो आणि हिरोईनला पळवून नेतो पण काही वेळानी हिरो शुद्धीत येतो, आपल्या शरीरात घुसलेला चाकू काढतो, तिथे कापड गुंडाळतो आणि व्हिलनला शोधून त्याला मारून टाकतो. आमीर खानची रास्त शंका होती की,

ज्या माणसाला चाकू मारला आहे तो उठून परत कसा येईल आणि बदला कसा घेईल?

यश चोप्राना त्याने हा प्रॉब्लेम सांगितला. ते म्हणाले मी एकदा सनीशी बोलून बघतो. यश चोप्रा सनी कडे गेले. सनी देओलला जेव्हा त्यांनी आमीरच म्हणण सांगितलं तेव्हा तो हसला आणि म्हणाला,

“फिल्म तो क्या रियल लाईफ में भी आमीर खान मुझे दो बार चाकू मार दे तब भी मुझ में इतनी पावर रहेगी कि मै उठकर जाउंगा और उसको मार दुंगा.”

सनी देओलचं हे म्हणण जेव्हा आमीर खानला कळाल तेव्हा त्याला सनी देओलचं बोलन आवडल नाही. खर म्हणजे बुटक्या आमीरला सनी देओलचा ढाई किलो का हात बसला की तो उठणार नाही हे त्याला पण माहित होत पण सगळ्यासमोर असं बोलून सनीदेओलने ठीक केल नव्हतं.

तसही आमीरचा आक्षेप होता की यश चोप्रा आपल्याला आणि सनीला एकत्र बोलवून थेट स्टोरी सांगत नाहीत. त्याचं वागण आमीरला शंकास्पद वाटत होतं. परंपरावेळी सुद्धा त्याला काही चांगला अनुभव आला नव्हता.

आमीरने डर सोडून दिला.

त्याच्या जागी यश चोप्रांनी नवोदित शाहरुख खानला आणलं. त्याला काही चोइसच नव्हता. यश चोप्रांच्या सिनेमात काम मिळतंय म्हणून त्याने स्टोरी, रोल कशाचाच विचारन करता सरळ होकार दिला. शुटींग करताना मात्र त्याने यश चोप्रांवर आपल्या बोलण्याने जादू केली. त्याचा परिणाम झाला की त्यांनी स्वतःहूनच शाहरुखचा रोल वाढवला.

सनीला जेव्हा हे कळाल तेव्हा मात्र त्याचा तीळपापड झाला. एकदा तर शुटींग सुरु असताना त्याने रागाच्या भरात स्वतःची पँट फाडून टाकली. पुढे डर रिलीज झाला. सुपरहिट झाला. पण यात फक्त आणि फक्त शाहरुख भाव खाऊन गेला होता.

डरमुळे एक झालं की आमीर खानने यश चोप्रा आणि सनी देओल या दोघांसोबतही काम करायचं नाही हे ठरवून टाकलं. सनी देओलने सुद्धा यश चोप्राबरोबर आयुष्यात काम करायचं नाही म्हणून फायनल केल.

या सगळ्याचा फायदा झाला शाहरुख खानला.

त्याचा यशराज बॅनरचा पुढचाच दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. यश चोप्रा यांच्या या पुढच्या प्रत्येक सिनेमाचा, त्याच्या मुलाच्या पिक्चरचा, त्याच्या मेहुण्याच्या मुलाच्या पिक्चरचा प्रत्येक ठिकाणी हिरो म्हणून शाहरुखची वर्णी लागली.

इकडे आमीर आणि सनी एकमेकांशी भांडत राहिले. दोघांचेही मोठे सिनेमे एकमेकांच्या बरोबरच रिलीज होत गेले. एकमेकांचं नुकसान करण्याशिवाय दुसर काही केल नाही. तर दुसरीकडे शाहरुख फक्त मोठ्या बनरचे ब्लॉकबस्टर सिनेमे करत होता.

शाहरुख खान सुपरस्टार होण्यामागे त्याची एका छोट्याशा अपमानामुळे झालेली आमीर खान आणि सनी देओलची भांडणेसुद्धा कारणीभूत होतीच, पण त्यापेक्षा महत्त्वाची ठरली ती मेहनत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.