आमिरच्या ४ वर्षांच्या भाच्याने सेटवरच जूही चावलाला लग्नाची मागणी घातली होती…

आपल्याकडे ‘राजहट्ट’, ‘स्त्री हट्ट’ आणि ‘बाल हट्ट’ असे हट्टाचे तीन प्रकार सांगितले गेले आहेत, या तीन हट्टानपुढे कुणाचे काही चालत नाही. यातून अनेकदा काही गमतीदार तर कधी गंभीर प्रसंग देखील घडतात. हिंदी सिनेमाच्या बाबतीत बोलायचं तर असे हट्टाचे अनेक प्रसंग तुम्हाला आठवतील.

आज एक बालहट्ट्याचा गमतीदार प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे. १९८८  साली  ज्यावेळी आमिर खान आणि जूही चावला यांच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाची चित्रीकरण चालू होते त्या वेळेचा हा प्रसंग आहे. आमिर खानच्या होम प्रोडक्शन चे हा चित्रपट असल्याने आमिरचा भाचा इमरान खान हा देखील चित्रपटाची शूटिंग पाहायला येत असायचा त्या वेळी तो अवघ्या चार वर्षाचा होता.

हा इमरान खान पुढे मोठा होऊन हिंदी सिनेमा नायक म्हणून अनेक चित्रपटातून दिसला.

जाने तू या जाने ना, देहली बेली… हे त्याचे गाजलेले सिनेमे. तर हा लहानगा चार वर्षाचा इमरान खान दररोज ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सेटवर येत असायाचां. छोटा,गोंडस, गुबगुबीत आणि बोलका असल्याने प्रत्येकाचा तो लाडका झाला होता.

जूही चावलाला देखील इमरान खूप आवडत होता. 

ती त्याचे खूप लाड करायची. ती कायम शॉट संपला की त्याला घेऊन फिरवत असे. त्याच्यासाठी रोज आईस्क्रीम, चॉकलेट्स, बलून्स आणून देत असे. त्यामुळे छोट्या इमरानला देखील जूही खूपच आवडत असे. एके दिवशी तो जूही चावलाला  म्हणाला,” मला तुझ्याशी लग्न करायचे आहे!” त्याची मागणी ऐकून जुही हसायला लागली आणि सेटवर सगळ्यांना सांगत सुटली. 

पण छोटा इमरान सिरीयस होता आणि तो म्हणाला,” मला नक्की तुझ्याशी लग्न करायचे आहे. मला तुझ्यासारखी गोरी गोरी बायको पाहिजे आहे!” त्या दिवशी सेटवर सगळ्यांची खूप करमणूक झाली.

किस्सा इथेच थांबत नाही खरी धमाल पुढेच आहे. दुसऱ्या दिवशी इमरान दोन अंगठ्या घेऊन सेटवर आला आणि पुन्हा एकदा जूहीला  बोलावून म्हणाला ,”मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि त्यासाठी मी तुला आज रिंग घालणार आहे. तू देखील हि रिंग मला घाल!” अशा प्रकारे जुहीला सर्वांच्या समक्ष त्याने अंगठी घातली. 

“ही माझी बायको होणार आहे त्याची एंगेजमेंट म्हणून ही रिंग घालत आहे!” असे सांगितले. पुन्हा सगळ्यांची खूप करमणूक झाली. अशा प्रकारे जुही ची पहिली एंगेजमेंट चार वर्षाच्या लहानग्या इमरान खान सोबत झाली! दोन-चार दिवस अशा टिवल्याबावल्या गमती जमती झाल्या. 

सेट वर लोक इम्रान ला चिडवू लागले. 

नंतर एक दिवस अचानक छोटा इमरान जुही चावला म्हणाला ,”माझी माझी अंगठी परत दे . मला तुझ्याशी लग्न करायचे नाही!” त्यावर जुही चावला म्हणाली ,”अरे असे करता येत नाही. आता एकदा अंगठी घातली म्हणजे आपलं लग्न ठरलं!”  तो म्हणाला,” नाही माझी माझी अंगठी परत दे…” असे म्हणून त्याने भोकाड पसरले.

जुहीने आपल्या बोटातील अंगठी काढून त्याला दिली. छोट्या इमरान ने  देखील आपले अंगठी काढून परत त्या डबीत ठेवून दिली. अशा प्रकारे जुही आणि इमरान खान यांचे ब्रेकअप झाले.

‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान घडलेली ही लव स्टोरी आणि त्यानंतर घडलेले ब्रेकअप पुढे अनेक दिवस सेटवर चर्चिले जात होते. इमरान खान जेंव्हा त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी प्रमोशनच्या वेळी प्रेस समोर आला त्यावेळी त्यांनी हा किस्सा सगळ्यांना सांगितला. 

जूहीने देखील एका इंटरव्यू मध्ये हा किस्सा शेअर केला होता. आणि इमरानची नजर किती ‘रत्नपारखी’ आहे हे त्याच्या बाल वयातील ‘चॉईस’ करून कळते असे म्हणत तिने  एक डोळा मारला होता!

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.