आजचे दिल्लीतले काँग्रेसचे मुख्यालय आंग सान सू की यांचे आश्रयस्थान बनले होते

आजच म्यानमारमध्ये लष्करानं तिथल्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांना अटक करून  सत्ता आपल्या हातात घेतली आहे. देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना लष्कराकडून अटक करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान सरकार आणि देशाच्या लष्करादरम्यान तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे लष्कराचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्लाईंग यांच्या हाती सत्तेची सुत्रे आली आहेत.

आंग सान सु की यांना अटक झालेली बातमी जगभरात खळबळ उडवणारी आहे. भारताच्या शेजारी देशात लोकशाही संपून लष्करशाही सुरु होणे ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही.

आंग सान सू की यांचे आणि भारताचे नाते खूप वर्षे जुने आहे.

म्यानमार तेव्हा बर्मा होते. भारताप्रमाणे ब्रिटिशांचे तिथे राज्य होते. आंग सान सू की यांचे वडील आंग सान हे तिथल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख नेते होते. त्यांनी तिथे क्रांतिकारी चळवळ उभी केली. आंग सान  यांच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव होता. तरीही त्यांनी अगदी जपानची मदत घेऊन म्यानमार मधील ब्रिटिश सत्ता उलथवून देण्याचे प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी देखील झाले.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला त्याच दरम्यान इंग्रजांनी म्यानमारला स्वतंत्र करण्याच्या हालचाली सुरु केल्या. वसाहतीच्या राज्याचे आंग सान  यांना पंतप्रधान करण्यात आले. मात्र दुर्दैवाने म्यानमार स्वतंत्र होण्याच्या सहा महिने आधी त्यांचा खून करण्यात आला.

आंग सान यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांची पत्नी डॉ.खिन क्यू यांच्या कडे आला. त्या काही काळ म्यानमार च्या समाजकल्याण मंत्री देखील होत्या.

पुढे त्यांच्या कुटुंबावरील हल्ल्याचा धोका वाढल्यानंतर डॉ. खिन क्यू यांना भारतातील म्यानमारचे राजदूत म्हणून नेमण्यात आले. 

भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आंग सांग यांचे मित्र होते. दोघांचे विचार एकमेकांशी जुळत असल्यामुळे नेहरूंना म्यानमारच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल विशेष आपुलकी होती. यातूनच जेव्हा आंग सांग यांच्या कुटुंबाला सुरक्षिततेसाठी भारतात आणण्यात आले.

त्यांची राहण्याची व्यवस्था ल्यूटन्स दिल्लीमधील ब्रिटिशकालीन २४ अकबर रोड या बंगल्यात करण्यात आली होती. डॉ.खिन यांच्या पतीच्या स्मरणार्थ नेहरूंनी या बंगल्याला बर्मा हाऊस हे नाव दिले.

आंग स्यान स्यू की तेव्हा पंधरा वर्षांच्या होत्या. उंचीने लहान अंगकाठीने अगदी सडपातळ असणाऱ्या आंग स्यान स्यू की यांच्या साठी दिल्ली हे अतिविशाल शहर होतं. रंगूनच्या बाहेरच जगच त्यांनी कधी पाहिलं नसल्यामुळे दिल्लीच्या वातावरणात सुरवातीला त्या दबून गेल्या.

२४ अकबर रोडवरच्या बंगल्यामध्ये राहुल गांधी यांचे ऑफिस होते तिथे आंग स्यांग स्यू की यांची खोली होती. या रूममध्ये मोठ्ठा पियानो असल्यामुळे त्यांनी या खोलीची निवड केली होती. रोज आंग स्यांग स्यू की यांना पियानो शिकवण्यासाठी एक संगीत शिक्षक या बंगल्यात यायचा.

मध्यंतरी आंग स्यांग स्यू की  जेव्हा भारत दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा त्यांनी आपल्या २४ अकबर रोड या घरातल्या मधुर आठवणी जाग्या केल्या. स्यू की  सांगतात,

“पुढे अनेक वर्ष मी नजरकैदेत बंद होते तेव्हा दिल्लीच्या आठवणी आणि पियानो याच्याच सहाऱ्याने मी जगू शकले. “

त्यांना गोल डाक खाना इथल्या जीजस मेरी सेंट स्कुल या शाळेतदाखल करण्यात आले. बऱ्याचदा त्यांच्या बरोबर खेळण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दोन्ही नातू पंतप्रधान निवास मधून २४ अकबर रोडवर यायचे. थोरला राजीव हा स्यू की यांच्या पेक्षा १ वर्षाने मोठा होता तर धाकटा संजय १ वर्षाने लहान.

या तिघांना बऱ्याचदा राष्ट्रपती भवन मध्ये प्रेसिडेंट्स बॉडी गार्ड यांच्या कडून घोडेस्वारी शिकताना पहिले जायचे.

हायस्कुलचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दिल्लीच्याच सुप्रसिद्ध लेडी श्रीराम कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं. या कॉलेजची स्थापना नेहरूंचे मित्र लाला श्रीराम यांनी केली होती. आंग स्यांग स्यू की या तिथे राज्यशास्त्राचे शिक्षण घेत होत्या. याच काळात जगभरातील राजकीय चळवळी, महात्मा गांधी यांचा सत्याग्रह, अहिंसावादी शिकवण यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. नवा दृष्टिकोन लाभला.

पुढे आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशन साठी त्यांची रवानगी ऑक्सफर्ड विद्यापीठात झाली. त्यानंतर त्या जगभर फिरल्या. काही काळ न्यूयॉर्क मध्ये वास्तव्य केलं. मात्र दिल्लीने त्यांना घडवलं हे त्या आजही मान्य करतात.

पुन्हा म्यानमार मध्ये गेल्यावर वडिलांची अर्धवट राहिलेली राजकीय चळवळ हातात घेतली. याच काळात त्यांचा बालपणीचा मित्र राजीव गांधी भारताचे पंतप्रधान बनले होते. आंग स्यांग स्यू कि यांच्या सरकारला अंतरिम सरकार म्हणून मान्यता देण्याची त्यांनी तयारी देखील केली होती मात्र तिथल्या लष्कराने त्यांना अटक केली.

पुढची जवळपास २० वर्षे आंग स्यांग स्यू की यांनी नजर कैदेत काढली. या काळात गांधीवादी विचारसरणीवर त्यांची निष्ठा अढळ होती. याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देखील देण्यात आला.  त्या म्हणायच्या,

“ताक़त नहीं बल्कि डर भ्रष्ट करता है. ताक़त खोने का डर उन लोगों को भ्रष्ट कर देता है जो इसे चलाने की कोशिश करते हैं और ताक़त के अभिशाप का डर उनको भ्रष्ट कर देता है जो इसके अधीन हैं.”

२०१० साली त्यांची सुटका झाली. मात्र त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले.

२०१६ साली सत्तेत आल्या. पण सत्तेत आल्यावर त्यांना देखील राजकीय तडजोडी कराव्या लागल्या होत्या. रोहिंग्या मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यावेळी त्यांच्या भूमिकेबद्दल टीका देखील करण्यात आली होती.

नुकताच झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करत लष्कराने त्यांना सत्तेतून खाली खेचले. एवढंच नाही तर त्यांना अटक देखील करण्यात आली. त्यांच्या भविष्यावर आता टांगती तलवार आहे. म्यानमारची इंदिरा गांधी  जाणाऱ्या आंग सांग स्यू की यांची लवकरातल्या लवकर सुटका होणे हे तिथली लोकशाही टिकण्यासाठी आवश्यक आहे.

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.