कृषीसंस्कृतीचं एक गूढ रहस्य – “आनीपिनी”
दिवाळीचे सण होते, मी नेमका तेव्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या आसंगी गावात मित्राकडे रहायला गेलेलो. रात्र झालेली आणि आम्ही गप्पा मारत बसलेलो. अचानक लांबून एक दिवा आमच्या दिशेनं पळत येताना दिसला. कायम दूष्काळी असणाऱ्या या माळरानावरून मध्यरात्री आमच्या दिशेनं येणारा हा गुढ दिवा पाहून आज आपला शेवटं होणार हे मनात पक्कं झालं..
इतक्यात, तो दिवा माझ्या जवळ आला आणि गवसला तो आपल्या कृषीसंस्कृतीचा एक सुंदर ठेवा !!!
आसंगी हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेलं गाव. सांगली जिल्ह्यातल्या पुर्व दक्षिण टोकाला व विजापूर पासून फक्त अर्धा तासाच्या अंतरावर येणार महाराष्ट्रातलं हे शेवटच गाव म्हणतां येईल. या गावची भाषा कन्नड मिश्रीत मराठी. सीमेवर असणारं दूष्काळी पट्यातील गाव असल्यानं साहजिक या भागानं एक वेगळेपणा जपला आहे. हे गावात शिरताच दिसून येतं.
सन २०१५ साली मित्राबरोबर ऐन दिवाळीच्या सणात आसंगीला जाण्याचा योग आला. मित्राचं घर आसंगी आणि मोटवाडी या दोन गावांच्या दरम्यान. जे लोकं या दूष्काळी भागात फिरले असतील त्यांना माहित असेल या भागात वाड्या वस्त्या आणि शेतावर घरं असणारी संख्या जास्त आहे. मित्राचं घर देखील तसच. गावच्या तळ्याकाठी असणारं एकरभर रान आणि सोबतीला सिमेंट पत्र्याचं दोन खोल्यांच घर. घराशेजारी गोठा आणि गोठ्यात गाई म्हशी, कोंबड्या असा संसार..
दिवाळीच्या सणांनिमित्त मी देखील मित्रासोबत त्याच्या घरी मुक्कामाला होतो. रात्रीचे अकरा वाजत आलेले. दिवसभर केलेली दूनियादारी बद्दल आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या इतक्यात मला लांबून एक दिवा माझ्या दिशेने येताना दिसला. इतक्या रात्री माळरानावरुन माझ्या दिशेला येणारा दिवा त्या भागाचं गुढ वाढवायला पुरेसा होता. ते पाहूनच माझी तरतरली. माझी अवस्था पाहूनच मित्र म्हणला, भितोस कशाला जवळ आल्यावर बघ नेमकं काय आहे.
तो दिवा जवळ आला तेव्हा जे दिसलं ते कधीच न विसरतां येण्यासारखं होतं. माझ्या मित्राचा चुलतभाऊ, सातवीत शिकणारा. तो हा दिवा मध्यरात्रीच्या अंधारात माळरानावरून घेवून चालत येत होता. त्याच्या सोबत त्याची लहान बहिण देखील होती. त्याच्या हातात पानसरं (पानथळ) वनस्पतींच्या वेलांना वळवून तयार केलेला फणा होता. या वेलींना नागाच्या फण्याच्या आकार या मुलांनी तंतोतंत दिलेला होता. आणि त्याचं वेलींचा खोलगट कप्पा करून त्यामध्ये पणती लावलेली. काकींनी त्यांना तेल दिलं. त्या दिव्याची ज्योत मोठ्ठी झाली तसा तो लगबगीने गोठ्याजवळ गेला आणि गाई म्हशींना ओवाळू लागलां !!! ओवाळत असताना त्यानं कन्नडमिश्रीत मराठी भाषेचा एक सुर पकडला आणि मंत्र म्हणू लागला !!!
मी लगेच कॅमेरा काढला आणि शूट करू लागलो. त्यातच त्याला नेमकं हे काय आहे ते विचारलं. तेव्हा ते गावचं पोरं बुजलं. ते काहीच सांगेना. तेव्हा मी माझ्या मित्राला या प्रथेबद्दल विचारू लागलो त्यानं सांगितलं, “हा भाग येतो दक्षिण पुर्व जत तालुक्यात. बहुतेक गावं कन्नड सफाईत बोलणारी पण पुर्वापार महाराष्ट्रात वसलेली. दूष्काळी भाग आणि कृषीसंस्कृतीचं जतन या भागात खूप वेगळेपणा जपला आहे. यातूनच कृषीसंस्कृतीचे उपकार मानण्याच्या हेतूने “आनीपिनी” प्रथा या भागात रुजली असावी. या आनीपिनी या शब्दाचा कन्नड अर्थ इडापीडा असा होतो. थोडक्यात अडापिडा टळू दे बळी च राज्य येवू दे म्हणतं मागणं मागण्याची ही प्रथा.”
महाराष्ट्रात देखील कृषीसंस्कृतीचं पांग फेडण्यासाठी वेगवेगळे सण केलेच जातात मग या सणांमध्ये आणि आनीपिनी मध्ये वेगळेपण ते काय ?
तर वेगळेपण आहे तो म्हणजे ही प्रथा ज्या प्रकारे साजरी केली जाते त्या पद्धतीत !!!
अजूनही गावातली लहान मुलचं गुर चरायला घेवून जातात. त्यातूनच त्यांच आणि गुराढोरांच एक नातं तयार होतं. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवाळसणाच्या पाचही दिवशी फणाधारी पणतीचा साज पानसरीने करायचां !! या फण्याची संख्या देखील दिवाळीच्या पाच दिवसात दिवसागणिक वाढत जाणारी असते. पुर्वी मोठ्ठी माणसं आणि आत्ता छोट्या मुलांचे उत्साही ग्रुप ही पणती आपल्या गावातल्या मित्रांच्या जनावरांना ओवाळायला मध्यरात्री बाहेर पडतात. ही पणती ओवाळताना ते नेमकेपणानं काय म्हणतात तर, “ तुम्ही आम्हाला मदत करुन आमच्या साऱ्या जगाची पोशिंदी बनता. तुम्हाला काहीही न होवो ! तुम्ही उत्तम आयुष्य जगो !!!
पणती विझू नये म्हणून दर उंबरठ्याला पणतीत तेल ओतणारी शेतकऱ्यांची मालकीण !! मध्यरात्रीचा काळोख चिरत पणती घेवून बळीराजाचं राज्य मागणारे लहान मुलं !!! गोठ्यात असणारी ती गुर ढोरं आणि या सगळ्यात दिवसभर काबाडकष्ट करुन आलेला शेतकरी या वातावरणात मला एका कृषीसंस्कृतीचा ठेवा गवसल्याचा आनंद माझ्यासाठी अमुल्यच होता.
सौरभ कुंभारे
७५८८८२४९८३
उत्तम लेख ।.. सुंदर वर्णन आणिक
डोळ्यासमोर सारं तरळून जात,नि निसर्ग व प्राण्यांप्रतिची कृतज्ञता व्यक्त होते.????सी माँ कुंभारे