अवघ्या एका वर्षात दिल्लीत सत्ता मिळवणारा आप दशकभरात राष्ट्रीय पक्ष बनला

दिनांक ८ डिसेंबर २०१३, स्थळ दिल्ली! दिल्ली विधानसभा निवडणुकीत ३ वेळा मुख्यमंत्री असणाऱ्या काँग्रेसच्या शीला दिक्षित यांना नाकारून दिल्लीच्या जनतेने त्रिशंकू कौल दिला होता. निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ३२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला फक्त ८ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

मात्र या दोन्ही पक्षांपेक्षा सर्वात जास्त चर्चा होती ती २८ जागा जिंकून दिल्लीत स्वतःचं खातं उघडणाऱ्या आम आदमी पक्षाची. 

अण्णा हजारे यांच्या लोकपाल बिलच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी असणाऱ्या अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांच्या अण्णा टीमने २६ नोव्हेंबर २०१२ रोजी संविधान दिनाच्या औचित्यावर आम आदमी पक्षाची स्थापना केली. देशभरात या पक्षाबद्दल चर्चा सुरु झाली, अनेकांनी या पक्षावर औट घटकेचा पक्ष म्हणून टीका देखील केली.

परंतु एकाच वर्षानंतर झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि आम आदमी पक्ष चर्चेत आला. निव्वळ दिल्लीच नाही तर देशभर आपच्या विजयाची चर्चा सुरु झाली होती.

परंतु आपच्या पारड्यात २८ जागा पडल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी ३६ जागांची आवश्यकता होती.

एकीकडे आपने दिल्लीत काँग्रेसचा विरोध करून काँग्रेसला हरवलं होतं. परंतु सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि आजपासून बरोबर ९ वर्षांपूर्वी २८ डिसेंबर २०१३ रोजी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

परंतु अवघ्या ४९ दिवसानंतरच अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आपचं सरकार कोसळलं. अनेक राजकीय विश्लेषकांनी आपच्या निर्णयावर टीका केली होती. मात्र आपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं होतं. 

देशभरात मोदी लाट असताना देखील आपने ४०० जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले होते. 

देशभरात आपमध्ये सहभागी होण्याचं अभियान राबवण्यात आलं मात्र जेव्हा लोकसभेचा निकाल लागला तेव्हा देशभरात आपचे फक्त ४ उमेदवार निवडून आले होते आणि ते देखील पंजाबमध्ये. या निकालानंतर आपची दिल्लीतील हवा ओसरलीय आणि फक्त मोदी लाट सुरु आहे अशी चर्चा सुरु होती.

परंतु दिल्लीतील वर्षभराची राष्ट्रपती राजवट संपली आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. संपूर्ण देशात भाजपाची सत्ता असताना राजधानी दिल्लीत मात्र आपने ७० पैकी ६७ जागा जिंकून इतिहास रचला होता. या दणदणीत विजयानंतर दिल्लीत पुन्हा एकदा आपची सरकार स्थापन झाली.

आपची राज्यात सरकार आली मात्र पक्षात फूट पडायला लागली.

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांसाठी वीज आणि पाणी मोफत करण्याची घोषणा केली. परंतु पक्षात घेण्यात येणारे निर्णयावरून पक्षातील वातावरण तापलं होतं. अरविंद केजरीवाल एकटेच घेतात, तेच पक्षाचे सुप्रीम लीडर असल्यासारखे वागतात असे आरोप प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्यावर केले होते. 

लवकरच प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अजित झा हे आपमधून बाहेर पडले. २०१८ च्या दरम्यान केजरीवाल आणि कुमार विश्वास यांच्यातील संबंध देखील ताणायला लागले होते. लवकरच त्यांनी देखील आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

अनेक मोठे नेते आपमधून बाहेर पडले असले तरी केजरीवाल यांनी आपला देशभरात पोहोचवण्यास सुरुवात केली.  

२०१४ मध्ये ४ लोकसभा सीट्स जिंकणाऱ्या पंजाबमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ताकद लावली. या निवडणुकीत तब्बल २० जागा जिंकून आप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून निवडून आला. 

त्यानंतर २०२० मध्ये पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपने दणदणीत विजय मिळवला होता.

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने दिल्ली जिंकण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते गृहमंत्री अमित शाह निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरले होते. परंतु २०२० च्या निवडणुकीत देखील आपने ६२ जागा जिंकल्या आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. आपचा हा विजय भाजपासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातं.

दिल्लीनंतर आपने पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवला. 

२०२२ च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणूक पार पडल्या ज्यात पंजाबमध्ये ११७ जागांपैकी ९२ जागांवर भाजपने विजय मिळवला आणि आपचे लोकसभेतील एकमेव खासदार भगवंतसिंग मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर गोवा विधानसभेत देखील २ जागा जिंकून खातं उघडलं.

तर गुजरात निवडणुकीने आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून दिला. 

दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आपने गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत दमदार प्रचार सुरु केला. यात हिमाचल प्रदेशामध्ये आपला खातं देखील उघडता आलं नसलं तरी गुजरातमध्ये १२.८२ टक्के मतं मिळवून ५ जागा जिंकण्यात आप यशस्वी ठरलं. गुजरातमधील मतांच्या बळावर आप अवघ्या दशकभरात प्रादेशिक पक्षापासून राष्ट्रीय पक्ष झाला.

गुजरात हिमाचल हातून गेले परंतु दिल्ली महापालिका जिंकण्यात आपने यश मिळवलं.

गेल्या १५ वर्षांपासून दिल्ली एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजपाची सत्ता पाडण्यासाठी शीला दिक्षित यांनी दिल्ली एमसीडीचे ३ भाग केले तरी देखील दिल्ली एमसीडी भाजपच्याच ताब्यात होती. दिल्ली विधानसभेत आप असून देखील एमसीडी भाजपाकडे होती. मात्र २०२२ च्या निवडणुकीत २५० जागांपैकी १३४ जागा जिंकून आपने भाजपला चांगलीच टक्कर दिली.

सध्या देशात दिल्ली आणि पंजाब राज्यात आपची सत्ता आहे. तर गोवा आणि गुजरातसह देशभरातील ४ राज्यांमध्ये १६१ आमदार आहेत. तर दिल्ली एमसीडीसोबत गुजरातच्या सुरत, गांधीनगर, आसामची गुवाहाटी, पंजाबमधील चंदिगढ आणि मध्य प्रदेशच्या सिंगरौली या ६ महानगरपालिकांमध्ये १८२ नगरसेवक देखील आहेत.

लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपला मिळणाऱ्या मतांचं प्रमाण वाढत आहे.

२०१४ च्या लोकसभेत २.४ टक्के मतं मिळवणाऱ्या आपला २०१९ मध्ये ४ टक्के मतं मिळाली होती. दिल्लीत २४ टक्के, गुजरातमध्ये १२.८२ टक्के, दिल्ली एमसीडीमध्ये ४२ टक्के तर इतर महानगरपालिकांमध्ये सरासरी २५ टक्के मतं आपला मिळालेली आहेत.

९ वर्षांपूर्वी दिल्लीत पहिल्यांदा सत्तेत आलेली आप आज देशभरात स्वतःचं मताधिक्य वाढवून राष्ट्रीय पार्टी बनली आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.