पोलीस कॉन्स्टेबल ते गुजरातच्या CM पदाचा चेहरा…गोपाल इटालियांनी मोठा पल्ला गाठलाय…
गुजरातच्या निवडणूका तोंडावर आल्यात…प्रचारही सुरु झालाय..साहजिकच वादग्रस्त वक्तव्य येणं, आरोप-प्रत्यारोप होणं याच प्रचाराच्या राजकारणाचा भाग असतो. असंच राजकारण सद्या गुजरातमध्ये सुरु आहे. आप चे नेते गोपाल इटालिया यांनी पंतप्रधान मोदीं आणि मोदींच्या आई विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.
आठवडाभरात इटालियांचे तीन व्हिडिओ पोस्ट करून भाजपने इटालीया यांना टार्गेट केले आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये इटालियांनी पीएम मोदींना शिवीगाळ केली, सोबतच अनेक वादग्रस्त गोष्टी बोलल्या होत्या. आणखी एका व्हिडिओमध्ये, इटालियांनी महिलांना तेथे न जाण्याचा सल्ला दिला होता आणि मंदिर आणि कथांचे वर्णन शोषणाचे अड्डे म्हणून केले होते.
व्हायरल झालेल्या दुसर्या व्हिडिओमध्ये, इटालिया पंतप्रधानांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. अवघ्या २३ सेकंदांच्या याच व्हिडीओमुळे गोपाल इटालिया यांना महिला आयोगाने आणि दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र लोकांच्या दबावानंतर त्यांना सोडण्यात आलं.
रिपोर्ट्सनुसार हे तिन्ही व्हिडिओ २०१८ चे आहेत.
इटालिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मोदी सरकार पाटीदार समाजाच्या सदस्यांना तुरुंगात टाकण्याशिवाय अजून वेगळं काय करू शकते? भाजपला पाटीदार समाजाचा द्वेष आहे. मी सरदार पटेलांचा वंशज आहे आणि तुमच्या तुरुंगांना घाबरत नाही”.
तुम्हाला कदाचित गोपाल इटालिया यांचं नाव फारसं माहिती नसेल मात्र हेच गोपाल इटालिया गुजरात पोलिस कॉन्स्टेबल होते. एक हवालदार आणि नंतर लिपिक म्हणून काम करण्यापासून, हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार आंदोलनात प्रमुख भूमिका बजावण्यापर्यंत अरविंद केजरीवाल यांचे गुजरातमधील पॉइंट मॅन असणारे गोपाल इटालिया आज आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आहेत सोबतच गुजरात निवडणुकीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत.
ते राजकारणात कधी आले तर अलीकडेच. खूप छोटी राजकीय कारकीर्द असलेले इटालीया यांनी खूप मोठा पल्ला गाठलाय. सद्या गुजरात निवडणुकी रणधुमाळीमध्ये भाजपचे फेव्हरेट टार्गेट गोपाल इटालिया असल्याचं दिसतंय. कारण भाजपच्या आयटी सेलकडून गोपाल इटालिया यांचे १ नव्हे तर ३ व्हिडीओ शेअर केलेत.
गोपाल इटालिया कोण आहेत ?
त्यांचा २१ जुलै १९८९ चा बोताडमधला. गोपाल इटालिया यांनी गुजरात विद्यापीठात शिक्षण घेतले. सध्या त्यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी म्हणून आहे, परंतु त्याआधी त्यांनी अहमदाबाद पोलिसांमध्ये जानेवारी २०१३ मध्ये मधुपुरा पोलिस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम केले. यानंतर गोपाल इटालिया यांनी २०१४ मध्ये अहमदाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल लिपिक म्हणून काम केले.
ते राजकारणात कसे आले त्यामागे एक किस्सा असा आहे कि,
२०१७ मध्ये इटालिया प्रसिद्धीच्या झोतात आले, जेव्हा सरकारी कर्मचारी या नात्याने त्यांनी गुजरातचे तत्कालीन उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना फोन करून राज्याच्या दारूबंदी कायद्याला विरोध दर्शवला होता. तेंव्हा त्यांची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती. एका मिनिटाच्या या क्लिपमुळे राज्य सरकारला मोठा पेच निर्माण झाला, कारण फोन कॉल मध्ये एक कॉन्स्टेबल असल्याचा दावा करत होता. त्या फोन कॉल मध्ये इटालीया यांनी वरिष्ठ अधिकारी खालच्या संवर्गातील अधिकाऱ्यांना दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून रोखत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याच्यावर कलम १२० अन्वये कारवाई करण्यात आली.
या संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले, सरकारची, शासनाची बदनामी झाली सोबतच २०१७ मध्ये त्यांची बदली झाली त्याचा निषेध म्हणून त्यांनी गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांच्यावर विधानसभेच्या बाहेर जोडा फेकून मारला. तसेच सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. या घटनेनंतर त्यांना सेवा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसूल विभागातून बडतर्फ करण्यात आले.
सरकारी नोकरीतून बडतर्फ इटालिया समाजसेवक बनले…अन् हळूहळू राजकारणात आले.
ते सत्ताधारी भाजपचे मुखर टीकाकार बनले. २०१८ ते २०२० दरम्यान इटालिया पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS) या सामाजिक संघटनेशी संबंधित होते. इटालिया यांनी बेरोजगार तरुणांच्या हक्कांसोबतच नागरिकांच्या हक्कांसाठी प्रचार केला. नागरिकांच्या कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक गावांना भेटी देऊन त्यांना भारतीय संविधान आणि कायद्याची जाणीव करून दिली. त्यांनी २०१८ मध्ये ‘कायदा कथा’ नावाची चळवळ सुरू केली, राज्यभरात गावोगावी फिरून संविधानावर जनतेशी संवाद साधला. यामुळे त्यांना तळागाळात भक्कम आधार तयार करण्यात मदत झाली.
नोव्हेंबर २०१८ मध्ये, फेसबुकवरील लाइव्ह व्हिडिओमध्ये, इटालिया यांनी शेतकऱ्यांनी बनवलेल्या नवीन कॉन्ट्रापशनचे प्रदर्शन करण्यासाठी प्लास्टिकच्या बंदुकीने हवेत गोळ्या झाडल्या. ही बंदूक शेतकर्यांच्या वापरासाठी होती कारण फटाके फोडण्यास न्यायालयाने बंदी घातली होती, बहुतेकदा अशा प्रकारची बंदूक शेतकरी शेतात वापरतात. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जानेवारी २०१९ मध्ये गोपाल इटालिया यांना त्यांच्या शेतात प्लॅस्टिक बंदूक चालवल्याबद्दल शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.
जेंव्हा इटालिया राजकीय आणि सामाजिक चळवळीत सक्रिय होत होते आणि नेमकं त्या दरम्यान गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन तीव्र झालेले. या आंदोलनात गोपाल इटालिया हार्दिक पटेलच्या सर्वात जवळचे कार्यकर्ते होते.
पाटीदार आंदोलनामध्ये इटालिया यांचे नेतृत्व सर्वांच्या नजरेत येऊ लागले. तिकडे दिल्लीबाहेर आप पक्षाचं संघटन वाढवण्यावर केजरीवाल लक्ष देऊन होते. तितक्यात आप च्या नेत्यांनी इटालीया यांची ओळख दिली. आंदोलनाच्या दिवसांत इटालिया यांच्यातील प्रतिभा अरविंद केजरीवाल यांच्या लक्षात येऊ लागली.
जून २०२० मध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला.
आप मध्ये सामील झाल्यानंतर लगेचच, इटालिया यांना पक्षाच्या गुजरात युनिटचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. डिसेंबर २०२० मध्ये त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षांपासून ते गुजरातमध्ये आप पक्षाचा मुख्य चेहरा आहेत. नेमकं मागच्या जून महिन्यात हार्दिक पटेलांनी भाजपची वाट धरली. दोन नेते, एकाच आंदोलनातले नेतृत्व आज दोन वेगवेगळ्या बाजूंनी उभे आहेत हे विशेष. असो,
तर सद्या सुरु असलेलं राजकारण म्हणजे, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीला दोन महिन्यांहून कमी कालावधी उरलाय. त्यात पंजाबच्या यशस्वी सत्ता स्थापन केल्यानंतर पुन्हा एकदा आप मुसंडी मारण्याच्या संधीची वाट पाहत आहे. त्यात सत्ताधारी भाजप राष्ट्रीय नेत्यांपासून ते प्रादेशिक नेत्यांच्याबाबतही हात धुवून कारवाई करत असल्याचे आरोप गुजरातच्या राजकारणात होत आहेत.
मात्र इटालियाच्या मागे पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया भक्कपपणे उभे असल्याचे चित्र दिसून येते.
एका ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी म्हंटलंय की, “संपूर्ण भाजप गोपाल इटालियाच्या मागे का?”, आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पोस्ट केले, “भाजपमध्ये पाटीदार समाजाच्या लोकांबद्दल इतका द्वेष का आहे? ची लोकप्रियता गुजरातमध्ये वाढू लागली. निवडणुकीतील पराभवाची भीती वाटू लागल्यावर दिल्लीत भाजपने गोपाल इटालियाला अटक केली असा आरोप आपचे नेते करतायेत.
या वर्षाच्या अखेरीस पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासाठी इटालिया यांच्याकडे सर्वोच्च दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
त्या मागचं मुख्य कारण म्हणजे, एक तर आप साठी गुजरातमध्ये प्रसिद्ध आणि राजकीय इतिहास असलेला कोर सक्रिय नेता नाहीये. तर दुसरं कारण म्हणजे, इटालीय हे पाटीदार समाजाचे नेते आहेत, तसेच त्या आंदोलनात देखील ते बरेच सक्रिय होते.
त्यात गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाची भाजपला मोठी भीती बसली आहे. कारण २०१५ मध्ये गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे भाजपला नागरी आणि पंचायत निवडणुकीत प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यानंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही याच आंदोलनामुळे भाजपला बऱ्याच आव्हानाला सामोरं जावं लागलं होतं. मागे पाटीदार समाजानं आंदोलन केल्यानंतरच तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना पक्षाने हटवलं होतं.
‘आप’ला इटालिया महत्वाचे आहेत कारण गुजरात मध्ये ‘पाटीदार’ खूप महत्वाचे आहेत.
गुजरातच्या एकूण लोकसंख्येपैकी १.५ कोटी लोकसंख्या ही पाटीदार समाजाची आहे. आणि या समाजाचा जवळपास ७० विधानसभेच्या जागांवर थेट प्रभाव आहे. थोडक्यात गुजरातमध्ये कुणाचं सरकार येणार हे पाटीदार मतदार ठेवतो म्हणल्यास वावगं ठरणार नाही.
गुजरातमधील एकूण १८२ विधानसभा जागांपैकी सुमारे ७० जागांवर ‘पाटीदार मतदार’ थेट प्रभाव टाकतात. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार आंदोलनामुळे भाजपला या जागांचे नुकसान झाले होते. पक्षाला १०० जागांचा आकडाही पार करता आला नव्हता. भाजपला केवळ ९९ तर काँग्रेसला ८२ जागा मिळाल्या. सर्वात जास्त नुकसान सौराष्ट्र भागात झाले आहे. जिथे काँग्रेसने ५६ पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी भाजपला अवघ्या २२ जागांवर समाधान मानावे लागले.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३६ आमदार पाटीदार समाजाचे होते, तर २०१७ मध्ये त्यांची संख्या २८ झाली. तर काँग्रेसचे २० पाटीदार उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते.. गुजरातमध्ये सध्या भाजपचे पाटीदार समाजाचे ४४ आमदार आहेत आणि ६ खासदार आणि तीन राज्यसभा खासदार आहेत.
अर्थातच आप पक्षाची इथे ताकद वाढवायची झाल्यास पक्षाच्या वतीने येत्या गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून २ वर्षांपूर्वी पक्षात आलेले गोपाल इटालीया समोर आले तर आश्चर्य वाटायला नको.
हे ही वाच भिडू :
- या राजकीय तडजोडीमुळे इराकमध्ये राष्ट्रपती कुर्द, पंतप्रधान शिया तर स्पिकर सुन्नीच असतात
- जीएन साईबाबा : १ व्यक्ती, २ आरोप, ८ वर्षांची कैद आणि निर्दोष मुक्तता, असं आहे संपूर्ण प्रकरण
- शिंदे गटानं अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक का लढवली नाही ?