श्री बैठकांच्या माध्यमातून जगभरात पोहोचले, आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण जाहीर…

राज्यातला सगळ्यात मानाचा पुरस्कार म्हणजे ‘महाराष्ट्र भूषण’. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. ज्येष्ठ निरुपणकार असलेले अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलनमधील कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केलाय.

ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय, त्या आप्पासाहेब धर्माधिकारींना याआधी देशातला चौथा सर्वोच्च पुरस्कार असलेला पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालाय.

“पूत्र व्हावा ऐसा गुंडा,

ज्याचा तिहू लोकी झेंडा”

या ओळी खरंतर आप्पासाहेब यांनी सार्थ करून दाखवल्यात असं म्हणता येईल. का? तर, त्यांंनी आपले वडील श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून घेतलेला वसा व्यवस्थित सांभाळलाय आणि कुशलतेनं वाढवलाय.

असं म्हटलं जातं की, मागच्या ४०० वर्षांपासून या नानासाहेबांच्या घरात समाजप्रबोधन करण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे, त्यांचं मुळचं आडनाव हे शांडिल्य होतं. पण त्यांचे पूर्वज गोविंद शांडिल्य हे स्वैच्छेने धर्म जागृतीच्या कामात आले त्यामुळे मग त्यावेळी कान्होजीराजे आंग्रे यांनी गोविंद शांडिल्य यांना धर्माधिकारी ही पदवी बहाल केली. तेव्हापासून मग या घराण्याचं आडनाव हे धर्माधिकारी असं लागलं.

नानासाहेब धर्माधिकारी यांनी लोकांना अध्यात्मात रस निर्माण व्हावा, अध्यात्म कळावं, त्यांचं प्रबोधन व्हावं यासाठी मोफत अध्यात्मिक साहित्य समजवण्याचा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची सुरूवात त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या रेवदांडा या ठिकाणी केली होती.

परिवाराची परंपरा जरी ४०० वर्ष जुनी असली तरी समाज प्रबोधनासाठी, अध्यात्मिक प्रसारासाठी लोकांना एकत्रित आणून या कार्याला स्थायी स्वरूप दिलं ते नानासाहेब धर्माधिकारी यांनी.

श्री बैठक:

लोकांना अध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी लोकांना एकत्र आणून मग अध्यात्म समजवणं गरजेचं होतं. त्यामुळे मग सुरूवात झाली श्री बैठकीची. म्हणजे काय, तर आठवड्यातला एक दिवस बरेच लोक एकत्र येतात. आणि ठरलेली व्यक्ती निरूपण करते. आता हे निरुपण म्हणजे नक्की काय असतं? तर आपलं मत, आपले विचार हे समोरच्या व्यक्तीर्यंत पोहोचवणं म्हणजेच निरूपण असतं.

या श्री बैठकांमध्ये कोणते विचार मांडले जातात? तर, विविध धार्मिक ग्रंथांमध्ये काय म्हटलंय? त्यातून शिकण्याचं काय आहे? याबद्दलचं आपलं मत, आपले विचार मांडले जातात. सुरूवातीला या बैठकांसाठी महिला आणि पुरूष यांनाच येण्यास परवानगी होती. काही काळाने मग लहान वयापासूनच मुलांच्या कानावर चांगले विचार पडावे, त्यांच्यावर संस्कार व्हावे म्हणून मुलांनाही या बैठकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.

ही तेव्हा सुरू झालेली श्री बैठक आज मोठ्या पातळीवर यशस्वी ठरतेय. भारतातच नाही तर, भारताव्यतिरिक्त युएई, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, इराण यासारख्या अनेक देशात अशा पद्धतीच्या श्री बैठका पार पडत असतात.

याशिवाय वृक्षारोपण करणं, रक्तदान शिबिरं आयोजित करणं, मोफत वैद्यकीय शिबिरं आयोजित करणं, रोजगार मेळावे आयोजित करणं, स्वच्छता मोहीम राबवणं, अंधश्रद्धा निर्मूलन करणं, व्यसनमुक्ती केंद्रे उभारणं या क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोठं काम केलंय. त्यासाठी त्यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केलीये.

अगदी अलीकडचं काम सांगायचं झालं तर, प्रतिष्ठानतर्फे साधारण महिनाभरापुर्वी औरंगाबादमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियानात तब्बल ७४,००० स्वयमसेवकांनी भाग घेतला असल्याचं वृत्त आहे. तर, एकूण ७४८ टन कचरा या अभियानातून काढून टाकण्यात आला.

एकंदरीतच लक्षात घेतलं तर समाजासाठी जे काम करण्याचं स्वप्न नानासाहेब धर्माधिकारी यांचं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे जे उपक्रम हाती घेतले ते उपक्रम यशस्वीरित्या पुढे चालवत असतानाच अनेक नवे उपक्रम सुरू करून त्यांनाही यशश्वी करण्याचं काम हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलंय.

आप्पासाहेबांनी दासबोधाचं केलेलं निरुपण हे आता मराठीशिवाय हिंदी, तामिळ, कन्नड आणि इंग्रजी भाषेतूनही केलं जातं.

नानासाहेबांचा वारसा आप्पासाहेबांनी जसा व्यवस्थित सांभाळला तसंच आप्पासाहेबांची पुढची पिढी म्हणजे सचिन दादा, राहूल दादा आणि उमेश दादा हे तिघेही याच कामात सक्रीय आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.