आर्यनला जामीन मिळाला पण त्यात एक प्रॉब्लेम झालायं…..

गेल्या जवळपास महिन्याभरापासून ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एनसीबीचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, आर्यन आणि त्यांच्या मित्रांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर आर्यनच्या जामीन अर्जाला आज परवानगी दिली.

आता तुम्हाला वाटेल जामीन मंजूर झाला म्हणजे आर्यन खानची सुटका होईल. पण तसं नाहीये. आर्यनला जामीन मिळाला पण या जमीनाचा सविस्तर आदेश अद्याप जारी केलेला नाही.  न्यायालयाने म्हंटलंय कि, सध्या जामिनाला मंजुरी जरी दिली असली तरी यावर कायदेशीर आदेश उद्या म्हणजेच शुक्रवारी २९ ऑक्टोबरला जारी केला जाईल.

महत्वाचं म्हणजे जरी कोर्टानं आजचं त्याचा जमीनाचा आदेश जारी केला असता तरी सुद्धा आर्यनला आजची रात्र जेलमध्ये काढावी लागली असती. कारण त्याच्या जमीनाचा निर्णय लागला संध्याकाळी आणि जेलचे सुद्धा काही नियम असतात, वेळेचं बंधन असत. त्यातल्याच एका नियमानुसार न्यायालयाचा आदेश ठराविक वेळेत पोहोचला नाही तर प्रकरण दुसऱ्या दिवशी पुढे ढकललं जातं.

आणि हाच नियम आर्यन खानच्या प्रकरणात लागू झाला असं म्हणता येईल. म्हणजे जामीन मंजूर झाला,पण कायदेशीर प्रक्रिया अजून बाकी आहे. ती पूर्ण झाल्यावर आर्यन खान शुक्रवारी किंवा शनिवारी जेलमधून रिलीज होईल.

माहितीनुसार आर्यन खान सोबतच अटक केलेल्या ८ जणांपैकी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

आता या सगळ्या प्रकरणावर नजर टाकायची झाली तर, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे २ ऑक्टोबर गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डेलिया नावाच्या क्रूझ जहाजावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने  छापा टाकला. या जहाजावर पार्टी सुरु होती आणि मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा वापर केला गेला होता.

एनसीबीने ऑन द स्पॉट शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासोबत आठ जणांना ताब्यात घेतले. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना ड्रग्जचा वापर केल्याच्या, खरेदी आणि विक्री करण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं गेलं.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या ८ जणांना विशेष सुटी न्यायालयात न्यायदंडाधिकारी आर.के. राजेभोसले यांच्यासमोर हजर केले गेले. त्यानंतर त्यांना एका दिवसाची एनसीबीच्या कोठडी सुनावण्यात आली.

पुढे ४ ऑक्टोबरला आर्यनला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. वकील अनिल सिंग हे एनसीबीतर्फे बाजू मांडत होते, त्यांनी सर्व आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. सिंग म्हणाले की,

आर्यनच्या फोनमध्ये अशा काही लिंक्स सापडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा खुलासा होऊ शकतो. त्यामुळे आर्यन खानला ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवून चौकशी करता येईल.

यावेळी न्यायालयाने दोन्हीकडून बाजू ऐकून घेतल्या आणि  या प्रकरणी चौकशीची गरज लक्षात घेता न्यायालयाने आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात दिले. ज्यांनंतर न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या दरम्यान आर्यन खान यांच्याकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आली. ज्यावर ८ ऑक्टोबर रोजी सुनावणी सुरू झाली. विशेष एनडीपीएस न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. यानंतर आर्यनसोबत अटक करण्यात आलेल्या बाकीच्या लोकांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले.

पुढे हे प्रकरण सत्र न्यायालयात पोहोचले. जिथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी जामीन अर्जावर सुनावणीसाठी १३ ऑक्टोबरची तारीख दिली. त्यादिवशी प्रकरण ताणले गेले. आणि सुनावणी दुसऱ्या दिवसावर गेली. त्यादिवशीही  कोर्टाने आर्यनला जामीन मंजूर केला नाही. आणि २० ऑक्टोबरला निकाल दिला जाईल असं, न्यायाधीश पाटील यांनी सांगितले.

पुन्हा २० ऑक्टोबरला  तेच घडलं मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानला जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे आर्यन खानाला जमीन मिळणारचं नाही असं चित्र तयार झालं होत.

त्यांनतर २७  ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर जामीन याचिकेवर सुनावणी सुरू होती. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानकडून बाजू मांडली. त्यानंतर अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आणि मुनमुन धमेचा यांच्या वकिलांनी सुद्धा बाजू स्पष्ट केली.

या तिन्ही वकिलानंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग एनसीबीची बाजू मांडणार होते. पण वेळेचं बंधन असल्यामुळं कोर्टाने दुसऱ्या दिवशी त्यांची बाजू मांडणार असं सांगितलं.

त्यांनतर २७ ऑक्टोबरला पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.  पण त्यादिवशीही या प्रकरणाचा निर्णय झाला नाही आणि कोर्टाने पुढची म्हणजेच आजची २८ तारीख दिली. आणि आज अखेर आर्यन खानचा जमीन मंजूर झाला. मात्र त्याची सुटका अजून तरी झालेली नाही.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.