नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्याची मागणी का होतेय ?

आताच्या राज्याच्या राजकारणात एकतर टीका आणि शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत किंवा मग नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. उमेदवारी मिळाली असतानाही अर्ज न भरल्यानं सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय. तर, सत्यजीत तांबे यांनी पक्षाने उमेदवारी दिलेली नसतानाही अपक्ष अर्ज भरुन एकप्रकारे बंड पुकारलंय असं बोललं जातंय.

आता सत्यजीत तांबे यांच्यावरही पक्ष कारवाई करेल असं बोललं जातंय. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच कॉंग्रेसमध्ये आणखी एक मोठी खळबळ म्हणजे नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी सुरु झाली आहे. 

काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहून, राज्यातली काँग्रेसची परिस्थिती बिकट असल्याचे दाखले देत पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणीही केली आहे.

त्यांनी पत्रात नेमकं काय मांडलंय ?

  • २०२१ ची विधानपरिषद निवडणुक

२०२१ साली झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांबाबतीत त्यांनी लिहीलंय की, नागपुर मतदार संघातून रविंद्र भोयर हे उमेदवार होते. असं असताना, अर्ज भरण्याच्या काही तास अगोदर काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि उमेदवार बदलला गेला. त्यामुळे, काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपच्या बावनकुळेंचा होता असं लिहीलंय.

  • २०२२ ची विधान परिषद निवडणुक

२०२२ साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीबद्दल देशमुख लिहितात कि, चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेससाठी नंबर एकचे उमेदवार होते. हांडोरे यांना निवडून आणाच असे पक्षाचे आदेश असतानाही भाई जगताप यांना हंडोरे यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली. त्यामुळे, हंडोरे यांचा पराभव झाला होता थोडक्यात देशमुखांनी प्रदेशाध्यक्ष यांना यासाठी कारणीभूत ठरवलं.

  • विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस काँग्रेसचे आमदार अनुपस्थित होते.

राज्यात सत्ता पालटली त्यावेळी ४ जुलै २०२२ ला शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी होती. या बहुमत चाचणीला काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दिकी, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहनराव हंबर्डे आणि शिरीष चौधरी या काँग्रेसच्या १० आमदारांनी उपस्थिती दर्शवली नव्हती तेंव्हा शंभरीही गाठता आली नव्हती. यामुळे इतक्या महत्वाच्या बहुमत चाचणीच्या वेळी १० आमदार गैरहजर राहतात ही मोठी गंभीर बाब होती.

नाना पटोलेंच्या कार्यकाळापासून स्ट्रॉंग असलेला विदर्भ काँग्रेसच्या हातून निसटतोय – आशिष देशमुख 

विदर्भ म्हणजे काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला आहे. मात्र, २०२१ मध्ये नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्रात काँग्रेसची पकड कमी होतेय. बालेकिल्ला असलेला विदर्भही काँग्रेसच्या हातून जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

  • सत्यजीत तांबे यांचं बंड.

सध्या राजकारणातला चर्चेचा विषय आहे तो सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचा. या बाबतीत देशमुख यांनी पत्रात लिहीलंय, तांबेंच्या बंडखोरीने राज्यात काँग्रेसची नाचक्की झाली आहे. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे.

हे असे सगळे दाखले देत देशमुखांनी या नाना पटोलेंची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. देशमुखांनी लिहिलेल्या या सगळ्या घटना या नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा भार स्विकारल्या नंतरच्या आहेत.

या सगळ्या घडामोडींमध्ये नाना पटोले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कशाप्रकारे फेल गेले आणि पक्षातली शिस्त संपत चालली आहे. त्यामुळे, पक्षाची स्थिती बिघडली असल्यानं,

“महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिति सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तत्काळ बदलण्याची नितांत गरज आहे”

असं त्यांनी पत्रात म्हटलंय.

हा झाला पत्राचा भाग, पण आशिष देशमुख यांनी या आधीही पक्षावर आणि विशेषत: महाराष्ट्र काँग्रेसवर आणि पर्यायानं नाना पटोले यांच्यावर नाराजी दाखवली आहे.

२०२२ मध्ये राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार होती त्यावेळी, काँग्रेसकडून इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली. इमरान प्रतापगढी हे काँग्रेसचे उत्तर प्रदेशातले नेते आहेत. त्यावेळी, महाराष्ट्राची राज्यसभेची जागा बाहेरच्या व्यक्तीला दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.

या पत्राचा सध्यातरी परिणाम म्हणून, सत्यजीत तांबेंच्या निलंबणाच्या चर्चांना कुठेतरी ब्रेक लागलाय. आता हे पत्र लिहिल्यामुळे, नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येतं की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच. असं असलं तरी, काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून शिस्तीचा अभाव दिसत होता, एकसंधता नव्हती आणि अशावेळी या पत्राने काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर वाचा फोडण्याचं काम केलंय अशी चर्चा सुरू आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.