आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी झालेल्या ५ संघटना कोणत्या आहेत?

देशाच्या राजधानीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी मुंबईत पोहोचले आहेत. राज्यभरातील १०० पेक्षा अधिक संघटना ५ मंचांच्या माध्यमातून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत.

हे ५ मंच म्हणजे विविध शेतकरी संघटना, पक्ष, कामगार संघटना, विद्यार्थ्यी, युवक यांच्या संघटनांपासून बनले आहेत.

या ५ मंचांची थोडक्यात माहिती

१) अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र) 

अखिल भारतीय किसान सभा या पक्षासह विविध शेतकरी संघटना या संघर्ष समन्वय समितीमध्ये आहेत. शेतकरी कायद्याविरोधात एकत्र येत डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विविध भागात आंदोलन करत आहेत.

आज मुंबईत देखील नाशिक ते मुंबई शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च किसान सभेच्या नेतृत्वात आझाद मैदानात शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली आला आहे.

२) कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र)

राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटित आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी ही संघटना काम करते. इंटक, सिटू पुणे, आयटक, श्रमिक एकता महासंघ, घर कामगार संघटना, संरक्षण कामगार फेडरेशन, हिंद कामगार संघटना अशा विविध संघटना यात कृती समितीमध्ये सहभागी आहेत.

मुंबईतील आजच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मागील २ महिन्यांपासून या कृती समितीची तयारी चालू होते. डॉ. कैलास कदम आणि कॉ. अजित अभ्यंकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.

३) जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र) 

या संघर्ष समितीत शेतकरी कामगार पक्षासह विविध राजकीय पक्ष, कामगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या ८० संघटना सहभागी आहेत. मागील महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये पुण्यात हमाल पंचायतीत या संघर्ष समितीची स्थापना झाली होती.

प्रामुख्याने दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे, कामगार कायदे रद्द करणे अशा कारणांनी एकत्र येत या समिती स्थापना झाली होती.

४) हम भारत के लोग (महाराष्ट्र) 

देशात CAA आणि NRC या कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील वर्षी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने देशभरातील विचारवंत एकत्र आले होते. त्यावेळी “हम भारत के लोग’ या नावाने आंदोलन उभे राहिले होते. त्यानंतर हे आंदोलन पुढे चालू राहिले होते.

अलीकडेच  ‘भाजपने कृषी विषयक जे नवीन कायदे केले आहेत, ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे कोणतेही हित नाही’ असं म्हणत त्यांनी शेतकरी कायद्यांना विरोध सुरु केला होता. तसेच या कायद्यांच्या विरोधात त्यांनी राज्यभर जनजागृती करण्याच्या निम्मिताने दौरा केला होता.

५) नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र)

नेशन फॉर फार्मर्स ही दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेली संघटना आहे. शेती प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे यामागणीसाठी दिल्लीत यापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान या संघटनेची स्थापना झाली होती. देशपातळीवर जेष्ठ कृषी अभ्यासक पी. साईनाथ यांच्या पुढाकारातुन याच काम चालू झालं होतं.

या संघटनेचे भारत पाटील यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितलं की,

संघटनेचा मुख्य हेतू म्हणजे शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर अशा विविध घटकातील लोकांचा शेतकऱ्यांसाठी पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न करणे. या संघटनेला प्रमुख असा चेहरा नसून सर्वांना सोबत घेऊन काम करते.

शेतकरी कामगार मोर्चाच्या नेमक्या मागण्या काय आहेत? 

१. कंत्राटी कामगार प्रथा तसेच शेतकरी-कामगार विरोधी कायदे रद्द करणे.

२. शेतकरी विरोधी केलेले तीन काळे कायदे रद्द करा.

३. देवस्थान इनाम वर्ग ३ जमिनी खालसा करुन ७/१२ वरिल नावं पूर्ववत करा.

४. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा.

५. शेतमाला भाव देण्यासाठी हमी भाव कायदा करा.

६. शेतकरी विरोधी वीज बिलाचा कायदा मागे घ्या.

७. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.