अवाबाईंनी भारतात कुटुंब नियोजन रुजवलं नसतं तर आज भारताने चीनला मागं टाकलं असतं

भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशात लोकसंख्या हा गंभीर प्रश्न बनला आहे. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र अजूनही त्यावर यश आले नाही. विशेषतः भारतात पुढच्या काही वर्षात लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनेल याचं काही सांगता येत नाही.

४० च्या दशकात भारतातच नाही तर जगभरात कुटुंब नियोजनावर बोलणं पाप समजलं जात असे. अशा वेळी वकील महिला पुढे येते आणि कुटुंब नियोजनावर काम करते.

या महिलेचं नाव आहे अवाबाई वाडिया. केलेल्या कामाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

१८ सप्टेंबर १९१३ रोजी कोलंबो येथे एका प्रगतीशील पारशी कुटुंबात अवाबाई वाडिया यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दोषजी मुनचेरजी हे शिपिंग अधिकारी होते आणि त्यांची आई पिरोजबाई अर्सेवाला मेहता गृहिणी होत्या. 

वयाच्या १९ व्या वर्षी अवाबाई वाडिया यांनी ब्रिटन मधील बार कॉऊन्सिलची परीक्षा पास झाल्या. अशा प्रकारची परीक्षा पास करणाऱ्या श्रीलंकेतील पहिल्या महिला होत्या. यानंतरच श्रीलंकेतील महिलांना कायदाचे शिक्षण घेण्यास परवानगी मिळाली. 

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अवाबाई वाडिया मुंबईत आल्या. 

अमेरिका, युरोप सारख्या देशांमधील अनेक महिलांना कुटुंब नियोजन आणि गर्भपात सारख्या गोष्टींसाठी अनेक वर्ष लढावे लागले. त्याच बरोबर त्यांना बराच विरोध सुद्धा झाला. मात्र भारतात अशा प्रकारची कुठलाही विरोध झाला नाही त्याचं कारण म्हणजे अवाबाई वाडिया. 

मुंबईत आल्यानंतर त्यांनी सामाजिक कामे करायला सुरुवात केली. मात्र त्यांना खरी ओळख ही कुटुंब नियोजनाचे काम केल्यानंतर मिळाली. एप्रिल १९४६ मध्ये अवाबाई यांचे बोमनजी वाडिया यांच्याशी लग्न झाले. तर १९४९ मध्ये त्यांनी फॅमिली ‘प्लॅनींग असोसिएशन ऑफ इंडिया’ (एफपीएआय) या संघटनेची स्थापना केली. त्यांनी ३४ वर्ष या संघटनेचं नेतृत्व केले. 

दुसरं म्हणजे अमेरिकेत कुटुंब नियोजन आणि गर्भपात या विषयावर काम करणाऱ्या मारग्रेट सेंगर यांच्या इंटरनॅशनल विमेन्स अलायन्स या संघटनेच्या त्या सदस्य होत्या. 

इंग्लंड सारख्या आधुनिक विचारांच्या देशात शिक्षण घेतल्याने अवाबाई वाडिया या स्वतंत्र विचाराच्या बनल्या होत्या. त्या लग्नाचा पारंपरिक बेडीत जास्त दिवस अडकून पडल्या नाहीत. १९५२ मध्ये त्यांचा गर्भपात झाला. जरी त्यांचा घटस्फोट झाला नसला तरीही त्या वेगळ्या राहत होत्या.

असं सांगितलं जात की, त्याकाळात भारतात फक्त ३ टक्के महिला उच्चशिक्षित होत्या. 

महिलांना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळत नव्हता. शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं याबद्दल आपले विचार मांडू शकत नव्हत्या.

१९५१ मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिली पंचवार्षिक योजनेची घोषणा केली.

त्यात कृषी, उद्योग, शिक्षा, आरोग्य आणि त्याच बरोबर अजून एक गोष्ट जोडली गेली ती म्हणजे कुटुंब नियोजन. अशा प्रकारचे घोषणा करणार भारत हा एकमेव देश होता. तर अमेरिकेसारख्या विकसित देशात कुटुंब नियोजना बाबत लढा सुरूच होता.

एफपीएआय ने लोकांमध्ये मिसळण्यासाठी झाडे लावण्यापासून ते रस्ते तयार करण्यापर्यंतची कामे केली. संघटनेतील सदस्य रेल्वेत भजन म्हणत. शहरी, ग्रामीण भागात भागात विविध कार्यक्रम आयोजित करत. यामुळे संघटनेबद्दल लोकांना विश्वास वाटू लागला होता. याच पहिलं उदाहरण म्हणून कर्नाटकातील मलूर येथील घेता येईल. 

कुटुंब नियोजन योजना लागू केल्यानंतर तेथील बाळ मृत्यूचे प्रमाण घटले आणि महिलांच्या साक्षरतेत वाढ झाली होती. 

वाडिया यांच्या मते, कुटुंब नियोजनासाठी कोणावरही जबरदस्ती करण्यात येऊ नये. लोकांनी ते आपल्या मर्जीने करायला हवे. मात्र १९७५-७७ आणीबाणी दरम्यान ही योजना लोकांवर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्याने बदनाम झाली. 

१९८० मध्ये वाडिया यांना एफपीएआयच्या अध्यक्ष म्हणून आणखी एक मोठे आव्हान समोर उभे राहिले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी गर्भपाताचं समर्थन करणाऱ्या संस्थानचं फंडिंग रोखलं होतं. त्यामुळे वाडिया यांच्या समोर आर्थिक अडचण निर्माण झाली होती.    

२००० साली महाराष्ट्र सरकार एक कायदा आणू पाहत होते. जर एखाद्या तिसरं अपत्य झाले तर त्याला रेशन आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा लाभ तिसऱ्या मुलाला देता येणार नसल्याची सांगितलं जाऊ लागलं होत. 

त्याला आवाबाई वाडिया यांनी विरोध केला.  लोकांना निराश करून कोणत्याही कामात यश मिळू शकत नाही त्यामुळे लोकांना विश्वात घेऊन निर्णय घेण्यात यावा असे सांगितले होते.

त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना १९७१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

त्यांनी केलेल्या कुटुंब नियोजनाच्या कार्याबद्दल त्यांना जगभर ओळखले जाऊ लागले. २००५ मध्ये त्यांचं मुंबईत निधन झालं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.