पुण्याच्या गरवारेंनी ब्रिटिशांना कामाला ठेवलं आणि त्यांच्या राजकुमाराची कार विकत घेतली

इंग्रजांनी भारतावर जवळपास १५० वर्षे राज्य केलं. या काळात त्यांनी अख्खा देश लुटून इंग्लंडला नेला. ब्रिटिशांचं राजघराणे आजही ऐषोआरामात जगतय ते तेव्हा केलेल्या भारताच्या लुटीमुळेच. या लूटीला आपण काही करू शकत नाही. पण आपल्या झालेल्या अपमानाची कसर छोट्या छोट्या गोष्टीतून काढता येते.

असंच केलं होत पुण्याच्या एका उद्योजकाने. त्याने आपली कंपनी इंग्लंडमध्ये सुरु केली इतकंच नाही तर थेट ब्रिटिश राजकुमाराची गाडी विकत आणली आणि  संपूर्ण लंडनमध्ये अभिमानाने फिरवली देखील.

मुंबईमध्ये एका गॅरेजमध्ये एक भालचंद्र नावाचा चुणचुणीत मुलगा काम करत होता. मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा. घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षण सहावीनंतरच सोडायला लागलेलं. पण व्यवहारात राहून आयुष्याची शाळा चांगलीच शिकायला मिळाली होती.

पूर्ण नाव भालचंद्र दिगंबर गरवारे. सगळे आबाच म्हणायचे.

कोणाच्या तरी मदतीने मुंबईला आला. खिशात एक रुपया नव्हता किंवा गहाण ठेवायला लोटा देखील नव्हता. कसबसं गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्तीचं काम शिकून घेतलं. काही दिवसातच त्यात पारंगत बनला. जात्याच हुशार होता शिवाय त्यात जिद्दीपणाची भर पडली. आयुष्यभर ग्रीसमध्ये हात काळे करायचे नाहीत हे ठरवून आला होता.

गॅरेजमध्ये राहून गाड्यांची पारख त्याला आली होती. वयाच्या सतराव्या वर्षी जुन्या गाड्यांच्या खरेदी विक्रीचा एजन्ट बनला.

नुकताच भारतात चारचाकी मोटारीचे पेव फुटले होते. अजून आपल्या इकडे कार बनत नव्हत्या. युरोपमध्ये बनणाऱ्या गाड्या विशेषतः सेकंड हँड कारलाच प्रचंड मागणी होती. गरवारे यांनी हे मार्केट सर्वात आधी ओळखलं होतं. तोंडात साखर आणि अपार मेहनत करायची तयारी यामुळे अगदी थोड्याच दिवसात या सेकंड हँड गाड्यांच्या विक्रीमध्ये जम बसवला.

सहावी नापास भालचंद्रला आता सगळे आबासाहेब गरवारे म्हणून ओळखू लागले. आबासाहेबांनी मुंबईत गिरगावमध्ये  डेक्कन मोटार एजन्सी स्थापन केली. गाड्या विकता विकता सोबत मोटारीचे स्पेअरपार्ट टायर वगैरेची विक्री सुरु केली.

प्रामाणिकपणा सर्व्हिसची खात्री यामुळे मोठमोठ्या उद्योगपतींपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकजण कार घ्यायची झाली तर आबासाहेबांकडे येऊ लागले. धंदा प्रचंड वाढला. पुढे पुढे तर महाराष्ट्रातील सगळे संस्थानिक राजे महाराजे आलिशान गाड्या गरवारेच्या कडून घेत असत. आबासाहेबांनी १९३७ साली गरवारे मोटर्स लिमिटेड नावाची कंपनी देखील  स्थापन केली.

मुंबईत तेव्हा गुजराती पारसी मारवाडी उद्योगपतींचा वरचष्मा असलेल्या काळात पहिल्यांदाच एक मराठी माणूस आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने छाप पाडत होता.

१९३३ मध्ये एक इंग्लिश ऑफिसर त्यांच्याकडे गाडी खरेदी करण्यासाठी आला.. येथील सेकंडहॅन्ड गाड्यांच्या किमती पाहून त्याने आश्चर्य व्यक्त केले नि तो सहज म्हणाला,

 “भारतात सेकंडहॅन्ड गाड्यांच्या किमती फारच आहेत. इंग्लंडमध्ये अशा गाड्यांच्या किमती यापेक्षा खूपच कमी आहेत नि ऑफ सीझनमध्ये या किमती आणखी उतरतात. “

आबासाहेबांनी आपले कान टवकारले. या गि-हाइकाच्या बरोबर बोलून त्यांनी इंग्लंडमधील सेकंडहॅन्ड मोटर गाड्यांच्या मार्केटसंबंधी पुरेशी माहिती मिळविली. आबासाहेबांनी ह्या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले नि पुढील काही महिन्यांतच प्रवासाची तयारी करून बोटीने तडक लंडन गाठले. जॅग्वार आणि लॅगोन्डास सारख्या परदेशी बनावटीच्या गाडय़ा युरोपातून आयात करणारे गरवारे यांना एकदा प्रत्यक्षात तिथे जाऊन ते मार्केट पाहण्याची इच्छा होती. त्यांचं नाव मुंबईत मोठं झालं होतच आता इंग्लंडवारी करायचं त्यांच्या डोक्यात आलं.

एकवेळ मुंबईला येण्यासाठी खिशात पैसे नसलेले आबासाहेब सेकंड हँड गाड्या खरेदी करण्यासाठी लंडनला निघाले.

इंग्लंडमध्ये ते ज्या लँडलेडीकडे उतरले होते, तिच्या भावाचीच गाडी पहिल्या दिवशी ४० पौंडात त्यांनी खरेदी केली व त्यालाच शोफर म्हणून नेमून ते नवीन गाडी घेऊनच लंडनच्या बाजारात फिरु लागले. स्वतःची शोफरसकट गाडी असलेल्या भारतीयाचे साहजिकच लंडनच्या बाजारात चांगले स्वागत झाले नि या सेकंडहॅन्ड गाड्यांच्या बाजारात आबासाहेबांनी अल्पावधीतच चांगले बस्तान बसविले. इंग्लंडमध्ये त्यांनी गरवारे मोटर्स कंपनीची स्थापना केली व तेथून नवनवीन नमुन्याच्या जुन्या मोटारी ते आयात करू लागले. या व्यापारात त्यांनी भरपूर मिळविला. गरवारे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी स्थापून हप्तेबंदीने मोटारी विकण्याचा उपक्रमही केला. असा उपक्रम हे त्या वेळचे नावीन्य होते. 

आबासाहेबांनी लंडनला आपले बस्तान एवढे चांगले बसविले की १९३४ साली त्यांनी सरे व ससेक्स  परगण्यात ३ एकर जमीन त्यावर एक फार्महाऊस, नोकरांसाठी स्वतंत्र घर, घोडी, घोड्याचा तबेला अशी मोठी मालमता २२०० पोंडाला खरेदी केली. या मालमत्तेच्या मालकालाच आबासाहेबांनी आपल्याकडे नोकरीस ठेवले नि तो माणूस पुढील काही वर्षे आबासाहेबांचे लंडनमधील व्यवहार पहात असे. ब्रिटिशांचे राज्य ऐन भरभराटीत असताना एका ब्रिटिश माणसालाच आपल्या पदरी नोकर म्हणून ठेवणारा असा हा महत्त्वाकांक्षी मराठी उद्योजक होता.

आबासाहेबांनी जे जे उद्योग केले त्यांत अगदी उत्तम काम केले. त्यात सर्वोच्च स्थान मिळविण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरवातीला त्यांनी जेव्हा मोटार खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांनी १९३२ मध्ये इंग्लंडच्या राजपुत्राचीच गाडी विकत घेतली, बनेंस्टी मलाइन नावाची ही खास गाडी विविध तऱ्हेच्या सोई केलेली अशी होती. ही गाडी काही करून विकत घ्यायचीच असा आबासाहेबांनी चंग बांधला. त्यासाठी पडेल ती किमत दिली.

देताना त्यांनी स्वतःचे छायाचित्र बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन काढून घेतले. ही गाडी व गोरा शोफर घेऊन आबासाहेब लंडनभर फिरले. गरवारे मोटार्सच्या शोरूममध्ये ठेवलेली ही मोटर म्हणजे मोटारीच्या धंद्यातील सर्वांच्या दृष्टीने एक मानचिन्ह होते. सामान्य भारतीय नागरिकांपासून तो व्यापारी आणि परदेशी पाहुणे ही गाडी पाहाण्यासाठी मुद्दाम शोरूमला भेट देत. मुंबईच्या एका मोठ्या व्यापाऱ्यास ही गाडी नंतर आबासाहेबांनी विकली, पण विकताना एक अट होती, त्या व्यापाऱ्याने वापर झाल्यावर पुन्हा ती गाडी दुसऱ्या कोणास विकता कामा नये, अशी ही अट होती. तीही त्याने आनंदाने स्वीकारली.

आपण प्रिन्स ऑफ वेल्सची गाडी का घेतली असे त्यांना कोणी तरी बोलता बोलता विचारले. त्यांनी त्यामागची प्रेरणा सांगितली. त्या वेळी लंडनमध्ये अनेक ठिकाणी “भारतीय नि कुत्री यांना प्रवेश नाही” अशा पाट्या असत. आबासाहेबांना हे अपमानास्पद वाटले म्हणून ते बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेले, तेथे स्वतःचा राजपुत्राबरोबर फोटो काढून घेतला नि राजपुत्राचीच गाडी विकत घेऊन त्यातून ते फिरू लागले.

एका भारतीयाने केवळ आपली अस्मिता राखण्यासाठी हा उद्योग केला होता.

तो काळ दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीचा होता. हिटलरच्या जर्मनीचा जोर वाढला होता. इंग्लंडची प्रत्येक फ्रंट वर पीछेहाट होत होती. धंदे बसले होते. मोठी मंदी सुरु होती. फक्त आणि फक्त मिलिट्रीला सप्लाय करणारे कारखाने सुरु होते. मध्यमवर्गीय लोक देशोधडीला लागले होते. मोठ्या प्रमाणात सेकंड हँड गाड्या विक्रीला आल्या होत्या.

चाणाक्ष आबासाहेब गरवारे यांनी यातला फायदा ओळखला. त्यांनी सेकण्ड हँड गाड्या तर घेतल्याचं शिवाय तिथल्या प्लास्टिक बनवणाऱ्या उद्योगपतींकडून कंपन्या देखील विकत घेतल्या. अतिशय कमी भावात हा व्यवहार झाला. यात गरवारे यांनी प्रचंड नफा कमवला.

नफ्यापेक्षाही इंग्रजांच्या गुलामीत अडकलेल्या भारतातला एक उद्योगपती त्यांच्या देशात येऊन त्यांच्याच कंपन्या विकत घेतोय हे पहिल्यांदाच होत होत होतं.

आबासाहेब गरवारे प्लस्टिक उद्योगात उतरले.

प्लॅस्टिकचा तेव्हा नुकताच उदय होत होता. भारतात अजून प्लॅस्टिकचा प्रवेश म्हणावा तितकाझाला नव्हता. दूरदृष्टीच्या आबासाहेबांनी यातही आपले व्यवसाय कौशल्य सिद्ध केले व प्लॅस्टिक उद्योग एक दुरोगामी उद्योग म्हणून ठरविला.

दुसऱ्या महायुद्धात नौदलासाठी लागणारी प्लॅस्टिकची बटणे तयार करण्यास सुरुवात केली. यात प्रचंड फायदा झाला. मात्र आबासाहेब इथे थांबले नाहीत. त्यांनी या उद्योगाचा अभ्यास  करून वेगवेगळे प्रॉडक्ट बनवता येतील का याचा प्रयत्न सुरु केला. त्यांच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट मधून नायलॉन यार्न, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट, पॉलिस्टर फिल्म्स, सिंथेटिक रोप्स, प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग आणि ब्लो मोल्डिंग इत्यादी प्लॅस्टिक उद्योगाशी संबंधित अनेक वस्तूंचे त्यांनी उत्पादन सुरू केले.

गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.

एकीकडे दुसरे महायुद्ध सुरु होते आणि सोबतच भारताचा स्वातंत्र्यलढा देखील तितक्याच जोरात सुरु होता. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सारा भारत देश स्वातंत्र्यप्राप्तीसाठी रस्त्यावर उतरला होता. देशात चाललेल्या या क्रांतीपासून स्वतःला रोखणे आबासाहेब गरवारे यांना शक्य नव्हते. गांधीजींच्या विचारांचे पयिकत्व त्यांनी स्विकारलं होतं.

गांधीजींनी सांगितलेल्या  स्वदेशी आणि कामगारहिताचे त्यांनी आपल्या कंपनीत कटाक्षाने पालन केले. भारतातील उद्योगपतींनी मालक होण्यापेक्षा कंपनीचा ट्रस्टी बनून काम पहावं हा संदेश आबासाहेबांनी तंतोतंत पालन केला. स्वतः अत्यंत कष्टातून आलेले असल्यामुळे सर्वसामान्य कामगारांबद्दल त्यांना सदैव सहानुभूती होती.

नफ्यात मिळालेला मोठा हिस्सा त्यांनी सार्वजनिक संस्थांना विशेषतः शैक्षणिक कार्यासाठी खर्च केला. ७४ पेक्षाही जास्त ट्रस्ट बनवून शाळा, महाविद्यालये, प्रयोगशाळा, ग्रंथालये, व्यायामशाळा इत्यादींसाठी त्यांनी अनेक देणग्या दिल्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोलाचे राहिले आहे.

त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई विद्यापीठांतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ करिअर एज्युकेशन डेव्हलपमेंट आणि महिलांसाठी सांगली येथील श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालय. अशा अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आल्या.

पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला त्यांनी भरीव आर्थिक मदत दिली. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून संस्थेने आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि श्रीमती विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे दिली.

स्वातंत्र्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन १९५९ साली त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्‍ती झाली. भारतीय स्टेट बॅंक, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन यासारख्या संस्थांचे आणि परदेशातील अनेक प्रतिनिधीमंडळांचे नेतृत्व करण्यासाठीही त्यांची निवड झाली. भारतीय बिझनेस व फायनान्स क्षेत्रात त्यांचा शब्द महत्वाचा मानला जायचा.  त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे उद्योगरत्न देखील प्रदान करण्यात आला.

परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या आबासाहेब गरवारे यांना पुणे विद्यापीठाने १९८९ साली सन्मानीय डी. लिट. ही पदवी प्रदान केली.

यापूर्वी भारत सरकारने त्यांना  पदमभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे उभारलेल्या पुलाला देखील त्यांचे नाव देण्यात आले आहे.

२ नोव्हेम्बर १९९० रोजी त्यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय डाक विभागाने त्यांचे टपाल तिकीट जारी केले. गॅरेजमध्ये काम करणारा माणूस एक प्रचंड मोठा उद्योग समूह उभारू शकतो आणि फक्त पैशानेच नाही तर कर्तृत्वाने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा उचलण्याची ताकद निर्माण करू शकतो हे आबासाहेब गरवारे यांच्याकडे पाहून पटते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.