प्रेतांचा खच पडला होता, तेव्हाच ठरवलं प्राण गेले तरी दुर्घटनाग्रस्तांना न्याय मिळवून द्यायचा

भोपाळ गॅस दुर्घटनेला जगातील सर्वात भीषण दुर्घटना समजले जाते. या भयानक दुर्घटनेत अब्दुल जब्बार यांनी आईवडील व मोठा भाऊही गमावला आणि त्यांना स्वत: लंग फायब्रोसिस आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणे यासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागला. परंतु तरीही त्यांनी तीस वर्षे आपला संघर्ष सुरुच ठेवला.

1984 सालच्या 2 आणि 3 डिसेंबरच्या त्या भयानक रात्री अब्दुल भोपाळवासियांच्या मनातून क्वचितच दूर जाऊ शकतील.

अब्दुल जब्बार हे भोपाळच्या राजेंद्र नगर परिसरात बांधकाम कामगार म्हणून काम करायचे. वय असेल २७-२८ वर्षे. कामाव्यतिरिक्त इतर वेळेत वेगवेगळ्या चळवळीच काम देखील करण्याची त्यांना आवड होती.  2 डिसेंबरच्या रात्री जेव्हा ते आपल्या घरी झोपले होते, तेव्हा अचानक जवळच्या युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड प्लांटमधून सुमारे 27 टन विषारी मिथाइल आइसोसायनेट गॅस बाहेर पडला.

अचानक सुरु झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण भोपाळमध्ये हाहाकार उडाला. हा वायू जीवघेणा होता. त्याच्यावर नियंत्रण करणे कोणालाही शक्य नव्हते.  जेव्हा विषारी गॅस कारखान्यातून बाहेर पडला आणि जब्बार भाईच्या घरापर्यंत पोहोचला, तेव्हा त्याने त्याच्या आईला झोपेतून उठवलं आणि आपल्या स्कूटरवर बसून सुमारे 40 किमी अंतरावर सुरक्षित ठिकाणी नेले.

सगळं गाव आपला जीव वाचवण्यासाठी भोपाळजवळच्या अब्दुल्ला गंजकडे पळाले. तो असा दिवस होता जेव्हा प्रत्येक माणूस आपल्या जीव वाचविण्यासाठी पळत होता. 

दुर्दैवाने सुरक्षित ठिकाणी नेऊनही जब्बारभाई  आपल्या आईला वाचवू शकले नाही आणि त्यांच्या वडील व मोठा भावानेही विषारी वायूमूळे दम तोडला. त्याच वेळी, जब्बार स्वतः विषारी वायूच्या कचाट्यात सापडले आणि लंग फायब्रोसिस आणि डोळ्यांच्या गंभीर समस्येने ग्रस्त झाले.

त्या रात्री जब्बार आपल्या घरी परत आले, तेव्हा त्यांनी दिसले की, चारही बाजूंनी मृतदेहच पडलेले होते. हा वेदनादायक देखावा पाहून जब्बारभाई हेलावून गेले होते. रडूही येत होत आणि संताप देखील होत होता.

या आक्रोशाला मात्र त्यांनी ज्या प्रकारे दिशा दिली आणि 30 वर्षांहून अधिक काळ त्यांनी ज्या प्रकारे आपल्या आतल्या या घटनेला शस्त्र बनवले, ते प्रत्येक भारतीयांना माहित असले पाहिजे.

सर्वत्र प्रेतांचा खच पडला होता. अनेकजण आपले अखेरचे श्वास मोजत होते. जब्बारभाईंनी पीडितांना जवळच्या रुग्णालयात नेले आणि सर्व मृतांना पोस्टमार्टमसाठी पाठविले. दिवसरात्र एक करून ते भोपाळ गॅस ट्रॅजेडीच प्रश्न त्यात झालेला हाहाकार देशावासियांच्या पर्यंत पोहचवण्याचं काम करू लागले. 

सुमारे 3 वर्षांनंतर 1987 मध्ये त्यांनी भोपाळ गॅस पीडित महिला उद्योग संस्थेची स्थापन केली. या गटात त्यांनी सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आणि मुख्य म्हणजे विधवांचा ज्यांनी सर्व काही गमावले अशांचा समावेश केला. आणि केवळ पोटगी व भरपाईच नव्हे तर रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

त्यांनी आपल्या या मोहिमेची सुरूवात आपल्याच भागातून केली, जेव्हा आपल्या आजूबाजूला अन्याय होताना दिसला. त्या कार्बाईड कारखान्यातून नफा मिळवणारे राजकारणी कोणीही त्यावेळी मदतीसाठी पुढे आले नाहीत. त्यानंतर पीडितांनी हे प्रकरण त्यांच्या हातात घेण्याचा निर्णय घेतला.

“खैरात नहीं, रोजगार चाहिए” हा त्यांच्या मोहिमेचा पहिला नारा होता.

सरकारने पुरवलेल्या त्या तुटपुंज्या रेशन सामग्रीवर जब्बार अजिबात समाधानी नव्हते. त्यांनी प्रत्येकाच्या क्षमतेनुसार रोजगाराची मागणी केली

इतक्या अथक प्रयत्नांनंतर 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि युनियन कार्बाईडला 470 दशलक्ष डॉलर्सची सेटलमेंट रक्कम देण्याचे आदेश दिले. 1,05,000 पीडितांना (अनौपचारिक आकडेवारी) नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, एका दशकानंतर, त्याच सर्वोच्च न्यायालयाने सरकारला 1,503 कोटी रुपये भरपाई देण्याचा आदेश जारी केला आणि त्यासोबतच पिडीत आणि योग्य दावेदारांची योग्य आकडेवारी (5,70,000) मान्य केली.

तीन दशकांहून अधिक काळ जब्बारने आपला निषेध सुरू ठेवला आणि पीडितांसाठी पुरेशा वैद्यकीय सुविधांसाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या. जब्बार आणि त्यांच्यासारख्या अनेक कष्टकरी कामगारांनी आवाज उठविला नसता तर पीडितांना काहीच मिळाले नसते.

या पीडितांसाठी त्यांनी केवळ कायदेशीर लढाई लढली नाही, तर त्यांना स्वावलंबी होण्यासाठी स्वाभिमान केंद्रही सुरू केले. या केंद्रात शिवणकाम, भरतकाम व झरीचे काम व संगणक प्रशिक्षण दिले जाते. या स्वाभिमान केंद्रात आतापर्यंत 5 हजार महिलांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनले आहे.

इतक्या अथक प्रयत्नांनंतरही सरकारने दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही आणि हि घटना ज्या कारखान्यात घडली त्या युनियन कार्बाईडचे चेअरमन वॉरेन अँडरसन यांना देशातून सुखरुप आणि जिवंत जाऊ दिले.

दर शनिवारी जब्बारची साप्ताहिक सभा यादगान-ए-शाहजहां पार्क येथे आयोजित करतात, ज्यात पीडित त्यांच्या समस्या सांगतात आणि एकमेकांच्या समस्या सोडवतात.

अब्दुल जब्बार यांनी मुलाखतीत म्हटले होते की,

“भोपाळ गॅस दुर्घटनेला युनियन कार्बाईडच जबाबदार नाही तर राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. शहराच्या मध्यभागी एक विषारी रासायनिक प्लांट स्थापित करण्यास मान्यता आणि नंतर त्याकडे लक्ष न देणे, युनियन कार्बाईडमधील अधिकाऱ्यांना अभय देणे आणि दुर्घटनेनंतरही त्यांना देशाबाहेर सहजपणे जाऊ देणे, त्यामुळे केंद्र सरकारही तितकेच जबाबदार आहे.

परंतु तिन्ही पक्षांनी आपल्या जबाबदारीवरून असे तोंड फिरवले की, जणू पीडितांनी मद्दाम विषारी गॅस घेतला. ”

पुरेशी नुकसान भरपाई व योग्य वैद्यकीय सुविधांसाठी लढा कित्येक वर्षे सुरू होता. भोपाळ गॅस दुर्घटना स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे कांड आहे, कारण सरकारने स्वतःच्या लोकांना इतरांच्या हेतूसाठी निराधार सोडले होते. एका अहवालानुसार दररोज 6 ते 7 जणांचा जीव जात होता.

जब्बार म्हणतात की,

आपले राजकारणी खूप कमकुवत आहेत. या दुर्घटनेला 35 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, परंतु कोणीही पिडीतांसाठी उभे राहिले नाही. परिणामी प्रत्येक पीडित आज वेदनादायक आयुष्य जगत आहे.

ही लढाई लढताना, जब्बार आपल्या वैयक्तिक आयुष्यात जास्त वेळ देऊ शकले नाही आणि यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्यही विस्कळीत झाले. शिवाय, गंभीर आजारांनी ग्रस्त झाल्यानंतरही जब्बारने पीडितांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवला आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला.

अब्दुल जब्बार यांनी 14 नोव्हेंबर 2019 रोजी गॅस दुर्घटनेतील पीडितांसाठी बांधलेल्या भोपाळ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.