दंगलीनंतर डॉ. कलाम यांच्या गुजरात भेटीवरून देशभरात वादंग झाला होता…
२००२ चं साल चालू झालं आणि देशाचे बारावे राष्ट्रपती कोण होणार याचे वेध लागले होते. त्यासाठी निवडणूक मग त्यासाठी कोणता राजकीय पक्ष कुणाला उमेदवारी देणार याची उलटसुलट चर्चा चालू होती. मात्र या चर्चेत मिसाईल मान एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाची चर्चा मात्र कुठेच नव्हती.
पण अचानक एका रात्री कलामांना अटल बिहारी वाजपेयी यांचा फोन आला आणि कळवले कि,
“तुम्हाला सर्वानुमते राष्ट्रपती म्हणून निवडले आहे. आमची इच्छा आहे कि तुम्ही याला नाही म्हणू नये. त्यामुळे हा निर्णय रात्रीतच जाहीर करायचा आहे. मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. याचं उत्तर मला तुमच्याकडून ‘होय’ असचं हवंय”. आणि अशाप्रकारे सर्व राजकीय पक्षांच्या चर्चेनुसार कलामांना राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले.
राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेल्या कलामांनी लवकरच आपल्या कामातून ठसा उमटवण्यास सुरुवात केली.
कलम एक साधे व्यक्तिमत्व होते त्यांना बडेजावपणा, मान-पानाची गरज नसायची. ते सध्या कपड्यांमध्ये वावरायचे. स्वतःचे जेवण जेवण स्वतः वाढून घ्यायचे. स्वतः राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम सर्व राष्ट्रपती भवनचा ३३० एकरचा भाग पायी चालून पिंजून काढला होता.
ते स्वतः शास्त्रज्ञ असल्या कारणाने त्यांनी राष्ट्रपती भवनात ही संगणकीकरण आणले होते. हे सारे बदल होत होतेच आणि असतांनाच राष्ट्रपती डॉ. कलाम हे आपला कार्यक्रम ठरवत होते.
त्यातही त्यांनी त्यांचा पहिला दौरा म्हणून गुजरात राज्य निश्चित केले.
त्यांचा हा निर्णय झाला आणि केंद्रीय मंत्रीमंडळातील काही जण व काही नोकरशाहांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध होऊ लागला. हा दौरा रद्द व्हावा म्हणून हार एक प्रकारची खुसपटं काढणं सुरु झाला.
तेंव्हा काही जण असेही म्हणाले होते, कि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री कलामांच्या गुजरात दौऱ्यावर बहिष्कार घालतील.
राष्ट्रपतींना गुजरातमध्ये काही गट तीव्र स्वरूपाची निदर्शने करतील, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली होती. याबाबतची नोंद स्वतः डॉ. कलाम यांनी त्यांच्या टर्निंग पॉईंट या पुस्तकात केलीये कि, “खुद्द पंतप्रधान वाजपेयींनीही त्यांना या संदर्भात एक प्रश्न केला,
‘या आताच्या परिस्थितीत गुजरातला तुम्ही भेट देणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटते का?’
या प्रश्नावर डॉ. कलाम त्यांना म्हणाले,
‘गुजरातमधील दंगलग्रस्त भागातील लोकांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करणे, तेथील मदतकार्यास गती देणे या गोष्टी मला आवश्यक वाटतात. त्याचबरोबर दंगलीच्या वणव्यात होरपळून निघालेल्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रऐक्याची भावना निर्माण करण्याचीही गरज वाटते. राष्ट्रपतिपदाची शपथ घेताना याच गोष्टींवर मी भर दिला होता.’
राष्ट्रपतींचा हा दौरा होण्याच्या काही दिवस आधी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांनी गुजरातमधील वस्तुस्थिती पाहण्यासाठी स्वत: दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी वडोदराचे जिल्हाधिकारी व त्यांच्या प्रशासनावर खोटारडेपणाचा आरोप केला, त्यांना ‘बंच ऑफ जोकर्स’ म्हटले.
त्यांच्या अशा बोलण्यामुळे वातावरण अधिक तापले होते त्यात अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचा दौरा होत होता.
त्यामुळेच या वादग्रस्त दौऱ्यानंतर राष्ट्रपतींचा दौरा कितीपत यशस्वी होईल याबाबत शंका
घेतल्या जात होत्या.
मात्र प्रत्यक्षात कलामांच्या गुजरात दौऱ्यात असे काही वादग्रस्त घडलेच नाही. ना कुणी बहिष्कार घातला, ना कोणी या दौऱ्याकडे दुर्लक्ष केले.
स्वतः डॉ. कलाम यांनी आपल्या टर्निंग पॉईंटमध्ये याबाबत महत्त्वाची नोंद केली आहे. ते म्हणतात, ‘मी हा दौरा करण्याच्या निर्णयावर ठाम राहिलो. जेव्हा मी दौऱ्यावर गेलो, तेव्हा माझ्या स्वागताला केवळ मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच नव्हते, तर राज्याचे अवघे मंत्रीमंडळ हजर होते. सर्व आमदार, अधिकारीही उपस्थित होते.
राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या भेटीने प्रत्येकाच्या हृदयाची तार छेडली गेली, अशी
प्रतिक्रिया मुख्यमंत्री मोदींनी व्यक्त केली.
तेंव्हा कलामांनी गुजरातच्या १२ भागांना भेटी दिल्या होत्या. छावण्यांची पाहणी केली. नऊ दंगलग्रस्त भागांना भेटी दिल्या. या संपूर्ण दौऱ्यात मुख्यमंत्री मोदी कलामांच्या सोबतच होते. जिथे-जिथे ते गेले तिथे-तिथे लोकं त्यांना भेटायला आले होते. त्यांनी अर्ज, निवेदने दिली. आपल्या तक्रारी, चिंता त्यांच्या कानावर घातल्या. मुख्यमंत्री मोदींनी ही त्यावर त्वरित कारवाईचे आश्वासन दिले.
तरीही दौऱ्यानंतर एक टीका मात्र झालीच झाली
खरं तर या दौऱ्यात कलामांनी- राष्ट्रपतींनी कार्यकारी क्षेत्रात हस्तक्षेप केला, अशी टीका काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी, काही प्रसारमाध्यमांनी केली होती. त्यांनी लोकप्रतिनिधींशी चौकटीबाहेर जाऊन केलेली चर्चा विरोधकांना मान्य नव्हती.
यावर मात्र माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांनी तर उघडपणे या दौऱ्याचे समर्थन करत कलमांची बाजू घेतली. ते म्हणाले,
‘राष्ट्रपती हा राष्ट्रपती भवनाचा कैदी बनून राहू शकत नाही. मी माझ्या वेळीदेखील मंडल आयोगाच्या विषयावरून जो असंतोष निर्माण झाला, आंदोलन झाले, तेव्हा पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांना बोलावून घेतले होते. राष्ट्रपती अशा घटनांमुळे अस्वस्थ होऊ शकतो, त्याला चिंता वाटू शकते. राष्ट्रपती कलामांच्या दौऱ्यामुळे जनतेचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
थोडक्यात ह्या किस्स्यावरून सांगण्याचा उद्देश कि,
कलाम यांचा गुजरात दौरा शांततेत पार पडलाच. उलट अशा दौर्यांमुळे जनतेला दिलासाच मिळतो. जनता दुःखात असेल तर राष्ट्रपतीदेखील पुढे होऊन सर्व घटनात्मक चौकटी सांभाळून आदर्श प्रकारे कसा वागू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण डॉ. कलाम यांनी त्यांच्या दौऱ्यातून देतात.
संदर्भ : टर्निंग पॉईंट्स
हे ही वाच भिडू :
- चूक सरकारची होती पण राष्ट्रपती अब्दुल कलाम राजीनामा द्यायला निघाले होते.
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणाले, मी मक्केला जरूर येणार पण एकच अट आहे.
- कलामांच्या या फोटो मागची स्टोरी वाचून अख्ख्या भारताची कॉलर ताठ होईल.