अपयशाने खचलेल्या डॉ. कलामांच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले.

साल होत १९७९ स्थळ श्रीहरीकोटा. रोहिणी उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तयारी चालली होती. भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण यान म्हणजेच सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (SLV-३) चा वापर पहिल्यांदाच होणार होता. करोडो भारतीयांचे डोळे या प्रक्षेपणाकडे लागले होते.

 हे SLV-३ रॉकेट बनवण्यासाठी गेली आठ नऊ वर्षे भारतीय संशोधक मेहनत घेत होते.

या पूर्वी आर्यभट्ट हा आपला उपग्रह सोडण्यासाठी भारताला रशियामधून त्यांच्याच कॉसमॉस या उपग्रह वाहक यानाची मदत घ्यावी लागली होती.  उपग्रह वाहक यान हे पूर्णपणे स्वदेशी असावे ही महत्वाकाक्षा पंतप्रधान इंदिरा गांधीनी जाहीर केली होती.

विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली इस्रो मध्ये हा प्रोजेक्ट सुरु ही झाला पण दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले.

भारतीय अंतराळ तंत्रज्ञानातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे विक्रम साराभाई यांच्यानंतर इस्रोची अवघड जबाबदारी उचलणार कोण याची चर्चा होती. त्यावेळी एक नाव पुढ आल डॉ.सतीश धवन.

Satish 1982 ISRO

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे डायरेक्टर आणि जेष्ठ वैज्ञानिक डॉ. सतीश धवन हे तेव्हा अमेरिकेत संशोधनाच्या कामासाठी गेले होते. पंतप्रधानानी स्वतः फोन करून त्यांना इस्रोचे चेअरमन आणि पंतप्रधानाचे अंतराळविषयक सल्लागार या पदासाठी तुमची नियुक्ती करण्यात आली आहे आणि लवकर परत या असे सांगितले.

सतीश धवन यांनी आंध्रप्रदेश मधील श्रीहरीकोटा हे बेटाला उपग्रह प्रक्षेपण केंद्र म्हणून रुपांतरीत करण्यासाठी महत्वाचा वाटा उचलला. रोहिणी उपग्रह मालिकेचे काम ही जोरात सुरु होते. पण उपग्रह वाहक यानाचे करायचे काय हा प्रश्न होता.

सतीश धवन यांनी तरुण संशोधक डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांना SLV-३ रॉकेटचे प्रोजेक्ट हेड बनवले. 

अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे हे यान बनवण्याचे तंत्रज्ञान त्या काळात फक्त काहीच देशांकडे होते. प्रत्येकवेळी आपले उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी कोणत्याही परिस्थितीत एसएलव्ही यान बनणे महत्वाचे होते.

अब्दुल कलाम आपल्या सहकाऱ्याबरोबर रात्रंदिवस कष्ट करत होते. अखेर यान आपल्या उद्दिष्टाच्याही अगोदर तयार झाले. कलामांना आपल्या SLV-३ यानाबद्दल आत्मविश्वास होता. त्यांनी रोहिणी उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तारीख ठरवली १० ऑगस्ट १९७९ . 

प्रक्षेपणाच्या दिवशी स्वतः अब्दुल कलाम प्रोजेक्ट डायरेक्टर असल्यामुळे कंट्रोल रूम मध्ये गेले. इस्रोचे चेअरमन आणि इतर अधिकारी मोठ्या स्क्रीनवर प्रक्षेपण पाहात होते.

पूर्ण भारताबरोबरच अमेरिका, रशिया सारख्या महासत्तांची सुद्धा हा गरीब देश उपग्रह प्रक्षेपक यान कसा बनवू शकतो याबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे अनेक परदेशी पत्रकारसुद्धा श्रीहरीकोटा मध्ये हजर होते.

उपग्रह लॉंच करायला फक्त चार मिनिट बाकी होते तेव्हा कलामना कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवर काही तरी एररचा संदेश दिसू लागला. कुठेतरी इंधन गळती होत होती म्हणून कॉम्प्यूटरने प्रक्षेपण होल्डवर नेले होते. आता काय करणार?

प्रोजेक्ट लीडर म्हणून कलामांना तिथल्या तिथे निर्णय घ्यायचा होता. एकेक क्षण महत्वाचा होता. कलामनी आपल्याशेजारी उभ्या असलेल्या तज्ञ सहकाऱ्यांच्या सल्ल्याने ठरवले प्रक्षेपण थांबवायचे नाही.
डॉ. कलामनी कॉम्प्यूटर ऐवजी मॅन्युअल मोड सुरु केला आणि प्रक्षेपणाचे बटन दाबले. दहा सेकंदाची उलटी गणती झाली आणि एसएलव्ही यान रोहिणीला घेऊन आकाशात झेपावले. पहिला टप्पा व्यवस्थित पार पडला.

मात्र दुसऱ्या टप्प्यात रॉकेटमध्ये गडबडी दिसून आली. आणि अवघ्या ३१७ सेकंदात बंगालच्या उपसागरामध्ये एसएलव्ही यानाने जलसमाधी घेतली. कित्येक वर्षाची मेहनत पाण्यात गेली होती.

काही तरुण संशोधकाना तिथेच रडू कोसळले. अब्दुल कलाम यांचे सुद्धा हात पाय गळाले. पूर्ण जगभरापुढे देशाला नामुष्की सहन करावी लागणार होती. प्रोजेक्ट हेड म्हणून पूर्ण जबाबदारी त्यांचीच होती. तेव्हा चेअरमन आणि त्यांचे गुरु सतीश धवन त्यांना भेटायला तिथे आले.

“Dont worry young man.यावेळी आपल्याला अपयश आले पण आपण पुन्हा प्रयत्न करू. माझा माझ्या टीम वर पूर्ण विश्वास आहे. पुढच्या वर्षी आपलं रॉकेट नक्की अंतराळात पोहचेल हा माझा विश्वास आहे. “

प्रक्षेपणाच्या अपयशानंतर लगेचच पत्रकार परिषद झाली. अपयशामुळे इस्रोवर जोरदार टीका झाली. संबंधित संशोधकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. पण सतीश धवन आपल्या सहकाऱ्यांच्या मागे ठाम होते. त्यांनी रॉकेटच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी चेअरमन म्हणून स्वतःवर घेतली.

डॉ.अब्दुल कलाम यांच्या सकट कोणत्याही संशोधकाला प्रोजेक्टवरून हटवले नाही.

main qimg 9ab1020ae948ca8a08ab79579ec479c7
ए पी जे अब्दुल कलाम आणि सतीश धवन

आपल्या वरिष्ठांचा आपल्यावरील विश्वास बघून कलाम परत एसएलव्ही बनवण्याच्या मागे लागले. यावेळी कोणतीही सुट्टी न घेता सगळी टीम रात्रीचा दिवस करु लागली. एसएलव्हीच्या अपयशाला एक वर्ष व्हायच्या आत १८ जुलै १९८० साली रोहिणी परत प्रक्षेपण ठेवण्यात आले.

यावेळी मात्र कोणतीही गडबड न होता श्रीहरीकोटा वरून पहिल्या भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपण यानाच्या म्हणजेच एस एल व्ही ३ च्या साहायाने रोहिणी पृथ्वीची कक्षा तोडून अंतराळात पोहचली.

अख्ख्या भारतासाठीच नव्हे तर तिसऱ्या जगातल्या प्रत्येक देशासाठी हा अभिमानाचा प्रसंग होता. मोठ्या देशांची मक्तेदारी मोडली गेली होती. पूर्ण देशभर हे यश साजरे करण्यात येत होते. यावेळच्या पत्रकार परिषदेला झाडून सगळी माध्यमे हजर होती. तेव्हा सतीश धवन अब्दुल कलाम यांच्या कडे आले. ते म्हणाले की ही पत्रकार परिषद तू घ्याचीस.

डॉ.अब्दुल कलाम म्हणतात,

यानाच्या अपयशाची जबाबदारी सतीश धवननी स्वतःवर घेतली मात्र यशाच्यावेळी पूर्ण टीमला पुढे करून स्वतः बॅकसिटवर राहिले. मी शिकलेला व्यवस्थापनाचा सर्वोत्तम धडा पुस्तक वाचण्यापासून माझ्याकडे आला नाही तर तो अशा अनुभवातून आला.

सतीश धवन हे खरे लिडर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने अनेक अविश्वसनीय कामगिरी पार पाडली. देशाची कॉलर ताठ करणरा पण कधीही आपल्या कार्याचा गवगवा न करणारा हा विलक्षण संशोधक ३ जानेवरी २००२ साली अनंतात विलीन झाला.

त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटाच्या उपग्रह प्रक्षेपण केंद्राचे नाव “सतीश धवन अंतराळ केंद्र” असे करण्यात आले. 

हे ही वाच भिडू.

 

3 Comments
  1. Damodar Sule says

    हि-याची किंमत खरा रत्नपारखीच जाणे ! ते ऐरागबाळ्याचे काम नोहे !

Leave A Reply

Your email address will not be published.