८०० वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या जगप्रसिध्द नालंदा विद्यापीठाला डॉ. कलाम यांनी पुन्हा सुरु केले.

नालंदा विद्यापीठ. प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास सांगणारी वास्तु. ज्ञानदानाच्या चळवळीत जगाचं सारथ्य करण्याची निशंक क्षमता असलेलं हे विद्यापीठ ख्रिस्त पुर्व ६ व्या शतकात ज्ञानाचे केंद्र होते.

बिहार राज्यातील राजगीरच्या उत्तरेस असलेल्या या विद्यापीठाच्या स्थापनेचे व संवर्धनाचे श्रेय गुप्तवंशाच्या सहा राजांकडे जाते.

काही अभ्यासक हे श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन याचा शिष्य आर्यदेव यास देतात. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर ‘श्रीनालंदा महाविहार- आर्यभिक्षुसंघस्य’ असे लिहिलेले आहे व तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथचे धर्मचक्र आहे.

१२ व्या शतकात खिल्जीने हे साम्राज्य उद्धस्त करण्यापुर्वी जगभरातून आलेले जवळपास १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि त्यांना देशोविदोशीचे २००० शिक्षक शिकवीत होते. कोरिया, जपान, चीन, तिबेट, तुर्कीस्तान मधील ज्ञानवंत शिक्षक देखील या विद्यापीठाला लाभले होते. अभ्यासक्रमाध्ये  हीनयान व महायान पंथाचे तत्त्वज्ञान, वेदाध्ययन, अध्यात्म, व्याकरण, हेतुविद्या, आयुर्वेद, सांख्यदर्शन, धर्मशास्त्रे, ज्योतिष, व पाणिनीसूत्रे हे विषय शिकविले जात.

अफाट ग्रंथसंपदा :

रत्नोदधी, रत्नसागर, आणि रत्नरंजक असे तीन उपविभाग असलेले ग्रंथालय होते. यात कोट्यावधी अतिशय मौल्यवान, दुर्मिळ हस्तलिखीत ग्रंथसंपदा होती. जेव्हा बख्तियार खिल्जीने याला आग लावली तेव्हा जवळपास तीन महिने ही ग्रंथसंपदा जळत होती.

का केलं नालंदा नष्ट 

बख्तियार खिलजी एकदा खूप आजारी पडला. कोणत्याच औषधाने त्याला बर वाटत नव्हते. अशा वेळी त्याला नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे प्रमुख राहुल श्रीभद्र यांच्याकडून इलाज करवून घेण्याचा सल्ला मिळाला. मात्र हिंदू हकिमाकडून इलाज करवून घेण्यास त्याने स्पष्ट नकार दिला.

अनेक आढेवेढे घेवून, अटी शर्ती ठेवून अखेरीस खिल्जी इलाज करवून घ्यायला तयार झाला. आणि त्याला बरेही वाटू लागले.

मात्र हिंदू हकिमाकडून करवून घेतलेला इलाज त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याच रागात त्याने संपूर्ण नालंदा विद्यापीठच उध्वस्त करण्याचे ठरवले. आणि आपल्या सैनिकांना विद्यापीठाला आग लावण्याचा आदेश दिला. तसेच तेथील हजारो धार्मिक नेत्यांची आणि बौद्ध भिक्षूंची हत्या केली.

तेव्हा पासून पुढील ८०० वर्ष हे विद्यापीठ आपल्याला केवळ इतिहासाच्या पानांमध्येच आढळते. त्यानंतर अनेक सत्ता आल्या, इंग्रज १५० वर्ष राज्य करुन गेले, भारत स्वातंत्र्य झाला. मात्र नालंदाच वैभव दुर्लक्षितच राहिले. आपल्याला देखील अगदी पाचवी – सहावीच्या पुस्तकांमध्ये एखाद्या पॅराग्राध्ये याची तोंडओळख करुन दिली जात होती.

आता २००६ मध्ये 

यानंतर तब्बल ८०० वर्षांनंतर २००६ मध्ये विद्यापीठाला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्याचा विचार मांडला तो तत्कालिन राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी.

२००६ साली बिहार विधिमंडळामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. कलाम यांनी नालंदा विद्यापीठाची गौरवशाली परंपरा पुन्हा नव्याने सुरू करण्याचा सल्ला सरकारला दिला. नालंदा विद्यापीठाचे ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा विचारात घेत, त्याच दर्जाचे जागतिक पातळीवरील एक शैक्षणिक केंद्र म्हणून विद्यापीठ स्थापन व्हावे, त्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले होते.

पुढे ऑक्टोबर २००९ मध्ये पूर्व आशियाई देशांच्या समिटमध्ये नालंदा विद्यापीठ स्थापन करण्यास सर्वांनीच सहमती दर्शविली. एकूण १७ देशांनी नालंदासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले. यानंतर बिहार विधीमंडळानेही विद्यापीठ स्थापनेसाठी एक प्रस्ताव मंजूर केला आणि तो केंद्राला पाठविला.

मनमोहनसिंग  सरकारनेही २५ नोव्हेंबर २०१० साली नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेसाठीचा कायदा मंजूर केला.

तसेच एकूण २७०० कोटी रुपयांचा निधीही दिला. यानंतर बिहार सरकारने राजगीर जवळच ५०० एकरची जमिन उपलब्ध दिली. तर ५०० एकर जमिनीचे हस्तांतरण होणे जानेवरी २०२० पर्यंत बाकी होते.

सर्वसामान्यपणे भारतातील विद्यापीठे आणि केंद्रीय शिक्षण संस्था या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. परंतु नालंदा विद्यापीठाचा कारभार हा परराष्ट्रसंबंध मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. हे या विद्यापीठाचे इतर केंद्रीय विद्यापीठांच्या तुलनेमध्ये असणारे महत्त्वाचे वेगळेपण आहे.

पुढे कायद्यानुसार १ सप्टेंबर २०१४ पासून बिहारमधील राजगीर येथून प्रत्यक्ष शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली.

अगदी सुरुवातीला विद्यापीठात १५ विद्यार्थी व ११ प्राध्यापक होते. तर ३५ देशातून १४०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. सद्यस्थितीमध्ये इथे एकूण ३०० विद्यार्थी शिकत असून ३० प्राध्यापक आहेत. तर ५० संशोधक विद्यार्थी आहे.

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन हे या विद्यापीठाचे पहिले कुलपती होते.

मध्यंतरी कुलपतींच्या नियुक्तींवरुन अनेक वाद आणि राजकारण झाले होते. मात्र ८०० वर्षापासून शैक्षणिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेले हे विद्यापीठ डॉ. कलामांमुळे पुन्हा सुरु झाले असून लवकर त्यांच्या स्वप्नातील गतवैभव पुन्हा प्राप्त होईल ही आशा आहे. सध्या सुपर कॉंम्पुटरचे जनक डॉ. विजय भटकर हे कुलपती आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.