डॉ. अब्दुल कलामांच्या शिष्याने त्यांच्या नावाची राजकीय पार्टी सुरु केली होती.

आपल्या देशात महापुरुषांच्या मृत्यू नंतर त्यांच्या नावाचा वापर करून घेण्याची परंपरा पूर्वा पार चालत आली आहे. महापुरुषांच्या नावाचा वापर करून घेताना काय चुकीचं अन काय बरोबर हे बघितलं जात नाही, बघितला जातो तो फक्त अन फक्त स्वतःचा फायदाच.

तर असाच प्रकार देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव वापरण्याबाबत झाला.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाला एक महिना झाला नाही तोच दिल्लीतील औरंगझेब रोडचे नामकरण करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम ठेवण्यात आले. पण हे एवढ्यावरच थांबत नाही. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २०१६ मध्ये डॉ. कलाम यांचे सल्लागार राहिलेले व्ही. पोनराज यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. पक्षाचं नाव ठेवलं, ‛अब्दुल कलाम व्हिजन इंडिया पार्टी’.

व्ही.पोनराज हे स्वर्गीय अब्दुल कलाम यांना त्यांच्या व्हिजन २०२० या योजनेसाठी मदत करत होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा पक्ष काढला.

पण गोष्ट कलाम यांच्या कुटुंबियांना खटकली. कलाम यांच्या नावाचा चुकीचा वापर होतोय असे त्यांना वाटले. कलाम यांच्या नावाचा वापर कुठल्याही राजकीय फायद्यासाठी व्हायला नको म्हणून त्यांनी या पक्षाला विरोध केला. पण ऐकतील ते भारतीय लोक कसले.

पक्ष स्थापन झालाच. तेव्हा चेन्नई हायकोर्टाने इलेक्शन कमिशनला याबद्दल प्रश्न उपस्थित केला. पण इलेक्शन कमिशनने सांगितले की कलामांचे नाव वापरण्यास आमचे नियम आड येत नाहीत. त्यांनी ना हरकत पक्ष स्थापनेला परवानगी दिली.

पण एकाच वर्षात पक्षाने आपला रंग दाखवला. राजीव गांधी यांच्या हत्येसमवेत असंख्य निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लिट्टे प्रमुख प्रभाकरण याचा वाढदिवस पक्षाने साजरा केला. त्यानंतर पक्षाला लगाम लागला.

याच काळात दिल्लीतील डॉ. कलाम यांच्या निवासाला नॉलेज सेंटर बनवण्यास केंद्र सरकारने नकार दिला म्हणून डॉ. कलाम यांचे भाचे व तामिळनाडू भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष एपीजे एम हजा इब्राहिम यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांनीही ‛देसीय जननायक काची’ पक्ष स्थापन केला. त्यावर ते बोलले की,

“कलाम यांच्या सोबत राहिलेले लोकं आता त्यांच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहेत. असे व्हायला नको म्हणून आम्ही हा पक्ष स्थापन केला आहे.”

अब्दुल कलाम व्हिजन इंडिया पार्टी अजूनही आहे पण तिच्याशी जोडल्या गेलेल्या वादामुळे त्यांना राजकीय अस्तित्व दाखवता आले नाही. व्ही.पोनराज समाजकार्य व व्हिजन २०२०चे काम थांबवले नव्हते.  आता काही वर्षांच्या विश्रांती ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होऊ पाहत आहेत. त्यांनी ह्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हैद्राबाद मध्ये पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षात प्रवेश केला आहे. पवन कल्याणला तेलंगणाची ब्ल्यू प्रिंट बनवण्यासाठी ते मदत करत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.