शाळा सोडली.. डोकॅलिटी लढवली.. शेतीत प्रयोग केला अन भिडूनं पद्मश्री मिळवला

शेतकरी हा असा पेशा आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत असते. सगळी कामं ही डायरेक्ट फिल्डवर असतात, इथे ‘वर्क फ्रॉम होम’ अशी कोणतीही संकल्पना नसते. मात्र दिवस रात्र मातीत राबणाऱ्या या शेतकऱ्यांबद्दल कुणी जास्त विचार करत नाही. अगदी नवीन उपकरणं तयार करतानाही मोठ्या इंडस्ट्रीज विचार केला जातो, पण भारतातील सगळ्यात मोठा सेक्टर असलेल्या शेतीला यावेळी दुर्लक्षित केलं जातं.

मात्र एक असा व्यक्ती भारतात आहे ज्याने शेतकऱ्यांची ही  नेमकी गरज ओळखली. फक्त इतक्यावरच न थांबता या व्यक्तीने कुणावरही अवलंबून न राहता स्वतः ही उपकरणं तयार करायला सुरुवात केली. त्यांच्या या पोटतिडकीच्या जिद्दीचा आणि सच्चा मानाने केलेल्या मदतीचा परिणाम म्हणजे त्यांना यंदाच्या  ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या व्यक्तीचं नाव म्हणजे

‘अब्दुल खादर नदकत्तिन’

अब्दुल खादर नदकत्तिन हे कर्नाटकातील रहिवाशी असून ते स्वतः ही शेतीचं करतात.  मेकॅनिक हा त्यांचा छंद. या छंदामुळे ते गेल्या चार दशकांपासून शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत आहेत. आणि याची सुरुवात त्यांनी केली ती त्यांना वारसाहक्काने मिळालेल्या ६० एकर कोरडवाहू जमिनीत.

१९८० मध्ये त्यांनी त्यांच्या प्रयोगाला सुरुवात केली.  सर्वप्रथम त्यांनी आंबा, चिक्कूची लागवड करताना मिरची आणि बेर यांसारखे आंतरपिक घेतले. आणि त्यांच्या प्रयोगांना यश आलं ते १९९४ साली. जेव्हा त्यांनी ३ लाख रुपये आणि सहा महिने खर्च करून चिंचेच्या बिया वेगळ्या करण्यासाठी एक उपकरण विकसित केलं. एका दिवसात, हे उपकरण दररोज ५०० मजुरांइतकं काम करू शकते.

तसं तर अब्दुल खादर यांनी १९७४ मध्येच नवनवीन शोध सुरु केले होते, जेव्हा त्यांनी शाळा सोडली होती. याचं कारण म्हणजे एक तर त्यांना सकाळी लवकर उठायचं जीवावर यायचं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी शेतकरीच व्हावं. अशातच त्यांचा पहिला शोध ‘वॉटर अलार्म’ त्यांनी विकसित केला, जो सकाळी उशिरापर्यंत झोपण्याच्या स्वतःच्या स्वभावाचे निराकरण करण्याचा त्यांचा वैयक्तिक प्रयत्न होता. त्यांनी अलार्मच्या किल्लीच्या शेवटी एक पातळ दोरी बांधली होती, तसंच ही दोरी पाण्याने भरलेल्या बाटलीला बांधलेली होती. अलार्मची किल्ली पूर्णपणे बंद झाल्यावर बाटली वाकायची आणि पाणी त्याच्या तोंडावर पडायचं. 

अशाप्रकारे नंतर त्यांनी कृषी तंत्रज्ञान आणि अवजारे विकसित केली ज्याने आधुनिक शेतीशी सुसंगतता राखून स्थानिक लोकांच्या विविध गरजा पूर्ण केल्या.

देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांच्या प्रमुख नवकल्पनांचे कौतुक केलं आहे, जसं की चिंचेचे बियाणे वेगळे करण्याचं उपकरण, नांगरणी ब्लेड बनविण्याचं यंत्र, बियाणे आणि खत ड्रिलिंग मशीन, वॉटर-हीटिंग बॉयलर, स्वयंचलित ऊस पेरणी ड्रिलर आणि व्हील टिलर इ. शिवाय चिंचेशी संबंधित नवकल्पनांच्या पोर्टफोलिओमुळे, लोक त्याला “हुनसे हुच्चा” म्हणजेच चिंचेचा वेडा म्हणू लागले.

त्याची सुरुवात दुर्मिळ परंतु क्षारीय पाण्याने चिंच उगवण्याच्या यशाने झाली आणि पुढे झाडापासून चिंच काढण्याचे तंत्र आणि चिंचेच्या बिया वेगळ्या करण्याचं अत्यंत स्वीकृत यंत्र यासारखे प्रयोग त्यांनी केले. यामुळे चिंचेचे तुकडे करण्यासाठी मशीन विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. चिंचेच्या प्रयोगात यश मिळाल्यानंतर खोल नांगरणी, बियाणे पेरणे आणि इंधन-कार्यक्षम पाणी गरम करणारे बॉयलर यांसारख्या कृषी कार्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी नवनवीन शोध आणले.

त्यांनी १९७५ मध्ये विश्वशांती कृषी संशोधन आणि औद्योगिक संशोधन केंद्राची त्यांनी स्थापना केली. आता तर ‘नदकत्तिन‘ नावाची कृषी उपकरणे देशभर प्रसिद्ध आहेत.

२०१५ मध्ये, अब्दुल यांना ८ व्या राष्ट्रीय ग्रासरूट्स इनोव्हेशन समारंभात नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (NIF) द्वारे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात होत. यावेळी ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणी पायांनी गेले. ग्रासरूट्स इनोव्हेशन आणि शेतकऱ्यांच्या भावना दाखवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं होतं. 

त्यानंतरच त्यांना ‘बेअरफूट सायंटिस्ट’ असंही नाव देण्यात आलं.

अब्दुल यांच्या सर्व नवकल्पना टिकाऊ, कमी किमतीच्या आणि पर्यावरणपूरक आहेत. स्वत: शेतकरी असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन हे सर्व शोध लावले आहेत. त्यांच्या नदकत्तिन पेरणी तंत्राचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत. त्यांच्या शोधामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुकर झाले आहे.

अशा या अब्दुल खादर नदकत्तिन  यांना ग्रासरूट इनोव्हेशन श्रेणीतील त्यांच्या कामांसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मश्री अब्दुल खादर खूपच डाऊन टू अर्थ व्यक्ती आहेत. हे सिद्ध होतं त्यांच्या वागणुकीतून आणि त्यांच्या वक्तव्यातून ते म्हणजे…

“देश शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर चालतो, म्हणून मी त्यांच्यासाठी काम करतो.” 

अशा या शेतकरी इंजिनीयरला बोल भिडूचा सलाम.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.