अब्दुल रझ्झाकच्या मूर्ख बडबडीमुळे शाहीद आफ्रिदी देखील लाजला होता !!

तर झालंय अस की पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाकने परवा एका मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या अकलेचे तारे तोडले. तो म्हणाला की,

“मी माझ्या कारकिर्दीमध्ये ग्लेन मॅकग्रा, वासिम अक्रम सारख्या महान गोलंदाजांना खेळलो आहे. त्यामानाने भारताचा सध्याचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह अगदी बेबी बॉलर आहे. त्याची गोलंदाजी मी सहज ठोकून काढली असती.”

फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातील इंटरनेट अब्दुल रझाकच्या या डायलॉगबाजीमुळे वेडे झाले. त्याला ट्रोल केले गेले, त्याच्यावर मिम आणि जोक बनवण्यात आले. आता त्याला वाचाळपणाबद्दल माफी मागायला लावण्यात येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी अहमद शेहजाद सचिन आणि सेहवाग पेक्षा भारी प्लेअर आहे अस म्हणून त्याने इंटरनेट भरपूर शिव्या खाल्ल्या होत्या. पण कितीही झाले तरी आपल्या जिभेवर ताबा ठेवणे त्याला जमत नाही. 

तर असा हा अब्दुल रझ्झाक. तो होता तसा बरा खेळाडू पण त्यापेक्षा त्याची बडबड खूप मोठी असायची. याच बडबडीमुळे निवृत्त होण्यापूर्वी अनेकदा ग्राउंडवर देखील तो अडचणीतदेखील आला होता. त्याच्या स्लेजिंगमुळे अख्ख्या पाकिस्तानी टीमला भुर्दंड बसायचा. सगळी टीम त्याच्यावर वैतागायची.

असाच एक किस्सा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीने सांगितला आहे मात्र तो किस्सा मैदानाबाहेरचा आहे.

झालं अस होतं की पाकिस्तानी टीम एकदा दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. गोष्ट २००४-२००५ ची असावी. ऑस्ट्रेलियन टीम एकदम भरात होती. रिकी पोंटिंग, हेडन गिलख्रिस्ट हे बॅटिंग मध्ये तर मॅकग्रा गिलेस्पी शेन वॉर्न बॉलिंग मध्ये सगळ्या जगभर धडकी निर्माण करून ठेवले होते.

त्याकाळी सुद्धा पाकिस्तानी टीमचे परदेशी दौरे जास्त होत नसायचे.  नुकताच झालेल्या वासिम अक्रम, वकार युनुस यांच्या निवृत्तीनंतर पाक टीम कमजोर झाली होती. 3 टेस्टच्या सिरीजमध्ये तिन्ही मॅच मध्ये त्यांना जोरदार पराभव स्वीकारावा लागला.

अतिशय मानहानिकारक या पराभवामुळे सगळे खेळाडू अतिशय नाराज होते. एक जण सोडून. अब्दुल रझ्झाक. 

दौरा संपला होता, दोन दिवसांनी परत जाण्यासाठी फ्लाईट होती. त्यापूर्वी एकदा एका ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या रझ्झाकच्या दूरच्या नातेवाइकांनी त्याला जेवायला घरी बोलावलं.  रझ्झाकने जाताना शाहीद आफ्रिदीला सुद्धा सोबत येणार का विचारले. तो देखील ऑस्ट्रेलियन जेवण खाऊन वैतागला होता. अस्सल पाकिस्तानी बिर्याणी वगैरे खायला मिळेल म्हणून तो तयार झाला.

दोघे त्या यजमानाच्या घरी आले. आगत स्वागत झालं. थोड्याफार गप्पा  झाल्या. मग तिथल्या काकुनी या दोघांना सांगितलं की जेवण तयार आहे.

 डायनिंग टेबलवर आल्यावर शहीद आफ्रिदीने पाहिलं की त्यांनी खूप कष्टाने जेवण बनवलं होतं.

आधीच ऑस्ट्रेलिया मध्ये आपल्या इकडच्या भाज्या, मसाले मिळत नाहीत तरी त्यांनी कुठून कुठून काय काय गोळा करून सातआठ डीश बनवले होते. बटरचिकन, बिर्याणी असा जबरदस्त बेत होता.

आफ्रिदीच्या पोटात कावळे कोकलत होते .हात धुवून जेवायला बसणार एवढ्यात त्याला दिसल की अब्दुल रझ्झाक टेबलवर काय काय आहे याच निरीक्षण करतोय. त्याला काही तरी आवडलेलं नव्हत. आफ्रिदी काही तरी बोलणार एवढ्यात त्याने तोंड उघडलं,

“ये सब तो ठीक है मगर पालक नही बनाया है?”

त्या काकू देखील कमी नव्हत्या. त्यांनी फटाक करून उत्तर दिल,”its not a bloody restaurant !!” 

आफ्रिदी लाजून मेला. आधीच बिचाऱ्या काकुनी मेहनतीने जेवण बनवलं होतं आणि त्यात हा गडी अगदी घरी असल्याप्रमाणे ऑर्डर सोडत होता. त्यानंतर त्याने कसबस जेवण केलं. रझ्झाकला शेवटपर्यंत कळाल नाही की आपली चूक काय झाली आहे ते. तो निर्लज्जाप्रमाणे जेवत होता.

आफ्रिदीने शेवटपर्यंत मान वर केली नाही. कुणाशी काहीही न बोलता त्याने जेवण संपवलं आणि बाहेर आल्यावर रझ्झाकला अस्सल उर्दू मधल्या ठेवणीतल्या शिव्या घातल्या. आजही तो आपल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा जरूर सांगतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.