अभिजित पानसे, सलाम मनसे !

मनसेतले लोक म्हणतात राजसाहेब आधीच म्हणाले होते, अभिजित हे लोक तुला फसवतील.

बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर वादाच्या भोवऱ्यात राहिले. त्यांचा सिनेमासुद्धा सारखा वादात अडकावा हे मात्र दुर्दैवी आहे. पण सिनेमाच्या बाबतीत एक फरक आहे. बाळासाहेबांच्या आयुष्यातले वाद हे नेहमी त्यांच्या विरोधकांनी निर्माण केलेले होते. सिनेमाच्या बाबतीतले वाद हे शिवसेनेने निर्माण केलेले आहेत.

पहिल्यांदा मराठीसाठी सचिन खेडेकर यांचा आवाज बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला. यावरून ठाकरेप्रेमी जनतेच्या प्रचंड तीव्र प्रतिक्रिया सोशल मिडीयावर आल्या. नंतर खेडेकर यांचा आवाज बदलून पुन्हा चेतन शशीतल यांच्या आवाजात डबिंग करण्यात आलं. या गोंधळात संवेदनशील अभिनेते सचिन खेडेकर यांची विनाकारण बदनामी झाली. खरंतर सचिन खेडेकर समंजस अभिनेते आहेत. त्यांनी आधीच या गोष्टीला नकार द्यायला हवा होता. पण शिवसेनेला नकार देणे ही गोष्ट अवघड असते हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आपण खेडेकर यांची अडचण समजू शकतो. 

ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत अभिजित पानसे. सिनेमाची घोषणा झाली तेंव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अभिजित पानसे पूर्वी सेनेत होते. आधी ते भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. त्यांनी एका वाहिनीवर बाळासाहेबांच्या विरोधात प्रहसन दाखवलं म्हणून हल्ला केलेला आहे. तेंव्हा ते रातोरात हिरो झाले होते. बाळासाहेबांवर त्यांची किती निष्ठा आहे हे सांगण्यासाठी हा प्रसंग पुरेसा आहे. पण काळाच्या ओघात आदित्य ठाकरे युवा झाले. मग त्यांच्या सोयीसाठी युवासेना स्थापन झाली.

हळू हळू अभिजित पानसे या तडफदार नेत्याचे पंख छाटायला सुरुवात झाली.

त्यानंतर आलेली चित्रपट सेनेची जवाबदारीही पानसेंनी उत्तम पार पाडली. स्वतः उत्तम कलावंत असलेले पानसे चित्रपट क्षेत्रात नवीन नाहीत. त्यांना संजय राउत यांनी संधी दिली असे म्हणणे अन्याय होईल. पानसेंनी दिग्दर्शित केलेला रेगे हा चित्रपट अनेक पुरस्कार प्राप्त आणि समीक्षक प्रेक्षकांनी एकदिलाने पसंती दिलेला आहे. स्वतःच्या चित्रपट क्षेत्रातल्या करिअरकडे दुर्लक्ष करत पानसे सेनेत सक्रीय होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या अंत्यविधीचं दृश्य सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल. त्यात ठाकरे कुटुंबा व्यतिरिक्त दोनच माणसं प्रत्यक्ष स्थळी दिसत होते. एक होते भैय्यू महाराज आणी दुसरे अभिजित पानसे. एवढी त्यांची ठाकरे कुटुंबाशी जवळीक. कदाचित हीच जवळीक त्यांच्या अंगलट आली असावी. कारण उद्धव ठाकरेंच्या जवळच्या लोकांनी पानसेंचा पत्ता कापायला सुरुवात केली. पानसे वैतागून मनसेत निघून गेले. 

अभिजित पानसे मनसेचे नेते आहेत. त्यांना शिवसेनेच्या संजय राउत यांची ननिर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करायला मिळावे ही आश्चर्याची गोष्ट होती. चित्रपट सेनेचा आणि दिग्दर्शक मनसेचा अशी परिस्थिती होती. हे कसं काय झालं अशी चर्चा सुरु झाली. पण चित्रपटाच्या टीझरच्या पहिल्याच कार्यक्रमात पानसेना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची झलक पहायला मिळाली. टीझर लौंच साठी नावाजुद्दिन सिद्दिकी येऊ शकला नाही. त्यामुळे स्टेजवर फक्त अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे आणि संजय राउत होते. पानसे तिथे उपस्थित असूनही त्यांना स्टेजवर बोलवण्यात आलं नाही. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्यांदा एखाद्या सिनेमाचं टीझर लौंच दिग्दर्शकाच्या अनुपस्थितीत पाहिला असेल. पण शिवसेनेपुढे अमिताभ तरी काय बोलणार? चित्रपट पूर्ण झाला. प्रमोशनचं काम सुरु झालं. संजय राउत आणी नावाजुद्दिन सिद्दिकी ही जोडी सगळीकडे मुलाखत देत फिरताना दिसू लागली.

पानसेंचा मात्र कुठे पत्ता नव्हता. प्रत्येक मुलाखतीत, पत्रकार परिषदेत अभिजित पानसेना जाणीवपूर्वक वगळण्यात आलं. दुर्दैव हे होतं की माध्यमाच्या लोकांनी सुद्धा कधी संजय राउत यांना विचारलं नाही की सिनेमाचे दिग्दर्शक कुठे आहेत? ते का आले नाहीत? कारण सिनेमा शिवसेनेचा आहे. 

मुलाखतीत बोलताना संजय राउत यांचा सूर असा असायचा की जणू काही त्यांनीच सिनेमा दिग्दर्शित केला. आणि सिनेमाच लोकसभेच्या निवडणुकीआधी प्रदर्शित होणं हेच सुचवतय की हा सिनेमा निव्वळ प्रचार म्हणून केला गेलाय. सिनेमात अभिजित पानसेना दिग्दर्शक म्हणून नेमकं काय करायला मिळालंय हे सिनेमा पाहून कळेल. पण संजय राउत यांनी आपलं म्हणणं सिनेमात रेटायचा प्रयत्न केलाय हे तर ते खुलेआम मुलाखतीत सांगत सुटलेत. या सगळ्या गोष्टीनंतर अभिजित पानसे गप्प कसे असा प्रश्न चित्रपटसृष्टीत होता.

पण सिनेमाच्या प्रीमियरच्या निमित्ताने पानसेंचा संताप बाहेर पडलाच.

बसायला पुढच्या रांगेत जागा दिली म्हणून पानसे रागावले. काही अति विद्वान यावर म्हणताहेत की पुढची जागा दिली तरी पानसेना रागवायचं काय कारण होतं. तर त्यांच्यासाठी सांगावं लागेल की चित्रपट म्हणजे सभा नसते. चित्रपटात मागची रांग प्रतिष्ठेची असते. महत्वाचे पाहुणे मागच्या रांगेत बसतात. खरंतर पानसे पूर्वीपासून संजय राउत यांच्या जवळचे मानले जातात. संजय राउत पानसेना स्वतःहून असं वागवतील असं वाटत नाही. यामागे नेमका कुणाचा राग आहे हे कळायला मार्ग नाही. पण एका दिग्दर्शकाला अशी वागणूक देणं अत्यंत वाईट आहे.

अभिजित पानसेनी आजवर शांत बसायला नको होतं. पण उशिरा का होईना ते व्यक्त झाले हे चांगलं झालं. याचा राजकीय फायदा तोटा काय हा प्रश्न महत्वाचा नाही. कलावंताचा एक आत्मसन्मान असतो. कलावंत राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचू लागले की सामान्य माणसांना त्रास होतो. अभिजित पानसेंनी उशिरा का होईना अरेरावी झुगारून स्वाभिमान दाखवला हे खूप बरं झालं.

बाळासाहेब असते तर त्यांना सिनेमा कितपत आवडला असता ते सिनेमा बघून कळेल. पण एका कलावंताला अशी वागणूक देणं खुद्द बाळासाहेबांना आवडलं नसतं. कारण ठाकरे घराणं कलावंताचं आहे. बाळासाहेब कलावंताला खूप मानाची वागणूक द्यायचे. शिवसेनेला या गोष्टीचा विसर पडता कामा नये. निदान स्वतः फोटोग्राफर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या काळात तरी कलावंताला सन्मान मिळायला हवा.

राज ठाकरे अशाच कारणाने सेना सोडून गेले. पानसे चित्रपटगृह सोडून गेले. बाळासाहेबांना कुणी अर्ध्यात सोडून जाणं हे लोकांना दुखावणार होतं. अगदी चित्रपटगृहातूनही. सेनेतल्या कुणामुळे माणसं सोडून जातात याचा विचार व्हायला हवा. बाकी स्वाभिमान दाखवून निषेध नोंदवणार्या अभिजित पानसे यांचं कौतुक करायला हवं. मनसेतले लोक म्हणतात राजसाहेब आधीच म्हणाले होते, अभिजित हे लोक तुला फसवतील.  

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.