या सुशिक्षित तरुणाच्या पुढाकाराने यंदा १२० एकर द्राक्ष निर्यात होणार आहेत

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, पलूस, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी हा भाग म्हणजे द्राक्षांच माहेरघर. अगदी अमाप म्हणावं असं द्राक्षाचं उत्पादन इथं होत. मात्र ज्या प्रमाणात उत्पादन होत त्या प्रमाणात नफा इथल्या शेतकऱ्याला मिळतं नसल्याचं सांगितलं जात. इथला शेतकरी देखील हे म्हणणं नाकारत नाही.

त्याची कारण अनेक आहेत. त्यापैकी अवकाळी पावसानं घात करणं, खरेदीदार व्यापाऱ्यानं दर कमी देणं, काटा मारणं, मार्केट-व्यवहार अशा गोष्टींबद्दल अंदाज नसणं. आणि यासोबतच या अडचणी मांडण्यासाठी शेतकऱ्यांचं एकत्रीकरण नसणं अशी काही मुख्य कारण सांगितली जातात.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या याच अडचणींवर मात करण्यासाठी तासगावातील डोंगरसोनीमधल्या एका सुशिक्षित युवकाने पुढाकार घेतला आहे. अभिजित झांबरे असं त्याच नाव असून त्यानं तब्ब्ल ३०५ शेतकऱ्यांचं संघटन करत ‘द्राक्ष भूमी उत्पादक कंपनी’ची स्थापना केली आहे.

या कंपनीच्या माध्यमातून अभिजित आता त्यांच्या प्रश्नांची एकत्रित सोडवणूक करण्यासाठी मागील दिड वर्षांपासून प्रयत्न करत आहे.

सर्वसामान्यपणे असा एक समज असतो की, सुशिक्षित मुलं शेतीत येत नाहीत, शिकून डिग्री घेतात आणि चांगलं पॅकेज घेऊन पुणे – मुंबईत नोकरीसाठी जातात असं आपल्याकडे सर्रास म्हंटल जात पण अभिजितने मात्र या सगळ्याला फाटा देत उच्च शिक्षित असून देखील शेतीकडे वळला आहे. शेतीच्या प्रश्नांसोबत तो स्वतः देखील द्राक्षाची शेती करतो.

त्याच्या या कंपनीच्या पुढाकारातून तब्बल १२०० एकर मधल्या शेतकऱ्यांची द्राक्ष निर्यात होणार आहेत.

त्यामुळे या कंपनीविषयी आणि अभिजितच्या शेतीसंदर्भातील या नवीन प्रयोगाविषयी बोलण्यासाठी आम्ही अभिजीत झांबरे यांच्याशी संपर्क साधला.

ते ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

दीड वर्षांपूर्वी म्हणजे ३१ मे २०१९ मध्ये झाली. द्राक्ष शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पिक काढल्यानंतरच मार्केट. तो पिक घेत असतो पण अखेर पर्यंत त्याला माहित नसतं कि आपण द्राक्ष पिकवल्यानंतर विकणार कोणाला आहे. कोणतरी खाजगी खरेदीदार येतो, दर-कमी जास्त करतो.

द्राक्ष पीक काढणी झाल्यानंतर त्यासाठी त्वरित मार्केट मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे पर्याय नसल्याने शेतकरी देखील व्यापाऱ्याने सांगितलेल्या दराला विकून मोकळा होतो. यात त्याच्या विकलेल्या मालाचे, पिकाचे पैसे देखील हाती मिळत नाहीत. ४ किलोच्या पेटीमागं ३५० ते ४०० रुपये मिळणं अपेक्षित असताना त्याला १५० रुपयेच हाती मिळतात.

हि व्यापारी लूटच करत असतो. आणि हि लूट टाळण्यासाठी शेतकऱ्यांचं एकत्रीकरण गरजेचं होत. कारण एकटा शेतकरी या व्यापाऱ्यांपुढे टिकू शकत नाही.

ही कंपनी स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हाच होता कि शेतकऱ्यांना संघटित करून त्यांचा दबावगट तयार करणे. शेतकऱ्यांना हक्काचं मार्केट उपलब्ध करून देणं. आणि यात कंपनी काहीशी यशस्वी देखील झाली आहे.

यावर्षी कंपनीने महिंद्रा अ‍ॅग्रो सोल्युशन कंपनीसोबत करार केला आहे.

यासाठी कंपनीच्या माध्यमातून शेतकरी सभासदांनी १२० एकर इतक्या क्षेत्राची नोंदणी केली आहे.

आता या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला महिंद्राची हक्काची आणि खात्रीची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. सोबतच कंपन्यांचा आणखी एक फायदा म्हणजे कंपन्या आल्या तर स्पर्धा होईल, त्यातून जास्त दर मिळण्यासाठी मदत होईल. पुढच्या वर्षी गोदरेज, रिलायन्स, बिगबास्केट अशा कंपन्यांशी आम्ही बोलणार आहेत.

जर शेतकऱ्यांना कंपनीसोबतच्या करारामध्ये भाग घ्यायचा नसेल आणि आपली द्राक्ष निर्यात करायची असेल तर शेतकऱ्यांना द्राक्षबागेची नोंद कृषी विभागाकडे करणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच कारणांमुळे शेतकऱ्यांकडून ही नोंदणी होत नसल्याने पुढे द्राक्ष निर्यातीसाठी त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे ही नोंदणी वेळेवर पूर्ण व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या वेळेची व पशाची बचत व्हावी, त्यांच्या शेतीकामांचा खोळंबा होऊ नये यासाठी ‘द्राक्षभूमी शेतकरी उत्पादक कंपनी व तासगाव तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष निर्यातदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते.

या नोंदणी अभियाना अंतर्गत एकाच दिवशी सावळज परिसरातील २३८ शेतकऱ्यांचे जवळपास २८८ एकर इतके विक्रमी द्राक्ष क्षेत्राची नोंद झाली.

हीच गोष्ट जर संपूर्ण तालुक्याविषयी सांगायच झालं तर गेल्यावर्षी एकट्या तासगाव तालुक्यामध्ये निर्यातीसाठी एकूण ६०० एकरची नोंदणी झाली होती.

पण या अभियानांतर्गत यावर्षी जवळपास १२०० एकर द्राक्षबागांची कृषी विभागाकडे नोंदणी झाली आहे.  

अभिजीत पुढे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांना मार्केट मिळवून देण्यासोबतच शेतकऱ्यांचा शेतीमाल जास्तकाळ टिकावा यासाठी शीतगृह व प्री कुलिंग यंत्रणा उभारणे, शेती आधारित प्रक्रिया उद्योग निर्मिती करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणे ही उदिष्टे नजरेसमोर ठेवून कंपनी काम करत आहे.

सोबतच कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना हवामान बदलाची माहिती देणे, द्राक्षावर रोग येण्याआधी काय उपाय करायचे, जर रोग आलाच तर नेमकं काय करायचं, कोणती औषध परिणामकारक असतील आणि ती स्वस्त दारात कशी मिळतील याच देखील मार्गदर्शन अभिजित यांची कंपनी करती. 

‘द्राक्ष भूमी उत्पादक कंपनी’ आणि तालुका कृषी विभाग यांच्या सोबतीने द्राक्ष निर्यातीसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे, चर्चासत्रातून माहितीची देवाण-घेवाण करणे आणि सहलींचे आयोजन करून अधिकाधिक अद्ययावत ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे अशी देखील काम केली जातात.

त्याच बरोबर एखादा नवीन शेतकरी अनुभव नसल्यामुळे उत्तम शेती करण्यात कमी पडतोय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला देखील योग्य मार्गदर्शन मिळणं देखील आवश्यक असतं. अशा वेळी यशस्वी शेतकरी आणि नवीन शेतकरी यांच्यामध्ये ज्ञान-माहितीची देवाण-घेवाण होणे हे गरजेचं असतं. यासाठी द्राक्षभूमी शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने ‘शिवार संवाद’ या अभियानाचे आयोजन करण्यात येत.

या अभियानात द्राक्षशेती क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, अभ्यासू व अनुभवी शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी सहभागी होतात. दर शनिवारी सकाळी दहा ते चार या वेळेत वेगवेगळ्यात गावात हे अभियान आयोजित केले जाते, या अभियानांतर्गत प्रत्यक्ष पीक पाहणी सोबतच शेतकऱ्यांशी थेट चर्चा, संवाद व शेतीसंदर्भात तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाते.

उच्च शिक्षित अभिजित देखील शहरात आणि चांगल्या पगाराच्या नोकरीत रमू शकला असता, पण त्याने स्वतः शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.