गरिबा-घरचा पोरगा पुढे जंगली कुत्री पाळून गर्भ नाहीसा करणारा डॉक्टर होईल अस वाटलं नव्हतं

परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र. बीड जिल्ह्याची ओळख खूप मोठ्ठी आहे.

शेती आणि दुष्काळ पाचवीला पुजल्याने शिक्षण हाच एक पर्याय पाहून अनेकांनी आपल्या पिढ्यांनपिढ्यांच्या गरिबीवर मात केली. कोण डॉक्टर झालं, कोण इंजिनियर झालं, काही राजकारणात गेले तर काही पत्रकार झाले.

पण या जिल्ह्याचं पाणी अस की इथली लोकं जिथेही गेले तिथे टॉपचे झाली.

असाच गरिबीतून पुढे आलेला डॉक्टर म्हणजे सुदाम मुंडे. साऱ्या परिसरातला हूशार विद्यार्थी म्हणून डॉक्टर प्रसिद्ध होते. शांत आणि संयमीत असा विद्यार्थी. राजकारणाच्या राड्यात न पडलेला की पोरांच्या हाणामारीत दिवस न काढलेला हा पोरगा. पुढे आपल्या हूशारीच्या बळावर डॉक्टर झाला. परिसरातच प्रॅक्टिस करु लागला. दिवसांमागून दिवस सरले आणि डॉक्टरची गरिबी गेली. 

बसस्टॅण्डच्या चौकातच तीन मजली हॉस्पीटल उभा राहिलं. डॉ. सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे ही जोडगोळी पंचक्रोशीत फेमस झाली. डॉ. सुदाम मुंडेला शिकवणाऱ्या शिक्षकांना या पोराचा हेवा वाटू लागला. डॉक्टर राजकारण पण पाहू लागला. बाहेरच्या अंगाने का होईना सर्व गटतट संभाळून राहू लागला. लोकांना एक चांगला माणूस म्हणूनच तो माहित होता. 

पण… 

कधीकधी स्टोरीतला पण हा खूप मोठ्ठा असतो. सुदाम मुंडेच्या आयुष्यातला हा पण देखील मोठा होता. रात्रीअपरात्री त्यांच्या हॉस्पीटलमध्ये गर्दी वाढे. आंध्रप्रदेश, कर्नाटक पासिंगच्या नंबरप्लेट असणाऱ्या गाड्या त्यांच्या हॉस्पीटलबाहेर थांबत. एका रात्रीतचं अशा गाड्या गायब व्हायचा. यायच्या आणि जायच्या असा काय तो खेळ. गुंडासारखी माणसं दवाखान्याच्या पायऱ्यांवर दिसायची. कधीकधी ती लोकांना आत जायला मज्जाव करायची.

बोलणारे अनेक होते पण त्याहून अधिक मानणाऱ्यांच प्रमाण होतं. डॉक्टर सगळ्यांनी चांगल बोलून असायचे. प्रगती झालेला माणूस असला की बोलणाऱ्यांची संख्या वाढतच असते त्यामुळे त्याच्यावर होणारे आरोप देखील तिथल्या तिथे संपून जात असत. 

अशातच मे २०१२ साली एक घटना झाली. विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपात करत असताना मृत्यू झाला. घरच्यांच्या दबावाने या महिलेला गर्भपात करावा लागला. सदरची महिला ऊसतोड कामगार होती. 

सुरवातीला ही घटना स्थानिक पातळ्यांवर दाबण्याचे प्रकार देखील झाले मात्र राज्यभरात वार्तांकन करणाऱ्या न्यूज मिडीयाने हे प्रकरण उचलून धरलं. प्रकरण पेटू लागलं तशी दबक्या आवाजात डॉक्टरबद्दल होणारी चर्चा खुलेपणाने होऊ लागली. एकमागून एक प्रकरण चर्चेत येऊ लागली. कारवाईच्या भितीपोटी सुदाम मुंडे फरार झाला. 

सुदाम मुंडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर त्याच्या मुलाचे बॅंक अकाऊंट गोठवण्यात आले. महसुल विभागाकडून त्याच्या संपत्तीवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. त्यांच्या संपत्तीची माहिती गोळा करण्यात आली तेव्हा १६० एकर जमीनीसह दोन प्लॅट व बेहिशोबी संपत्ती असल्याची माहिती मिळाली. 

प्रकरण पेटू लागल्यानंतर सुदाम मुंडे पोलीसांसमोर हजर झाला. पोलीसांसमोर हजर होताच त्याच्या कर्माचा पाठा पुढे येऊ लागला. 

साधं विक्रीडील या गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच प्रमाण तपासण्यात आलं तेव्हा समजलं की बीड जिल्ह्यात एकूण जितकी औषधे लागत होती त्यापैकी ७० टक्याहून अधिक औषधे त्यांच्या दवाखान्यात जात असत. बाहेरच्या राज्यातून इथे गर्भपात करण्यासाठी महिलांना, कुमारी मातांना आणलं जात असे.

हे कनेक्शन इतर डॉक्टरांच्या संपर्कातून निर्माण करण्यात आलं होतं. बेकायदेशीर गर्भपातासाठी बीडचे मुंडे डॉक्टर मदत करतात ही गोष्ट बाहेरील राज्यात गेली होती पण इथल्या प्रशासनाला त्याबद्दल माहित नव्हते अस म्हणणं हास्यास्पदच ठरू शकत होतं. 

मुंडे याच्या हॉस्पीटलला प्रत्यक्षात १० खॉटांची परवानगी देण्यात आली होती मात्र ६४ खोल्यांचे आणि ११७ खॉटांचे सुसज्ज असे हॉस्पीटल त्याने उभारले होते. चौकशीत समोर आलं की, मुंडे गर्भ संपवण्यासाठी कुत्र्यांचा वापर करत होता. त्यासाठी त्याने खास कुत्री पाळली होती मात्र या गोष्टीचा पुरावा पोलीसांच्या हाती लागू शकला नाही. 

दोन वर्षांच्या कालावधीत या हॉस्पीटलमध्ये ३ हजार ९४० इतक्या विक्रीडील औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. 

आत्ता तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की एक केस झाल्यानंतरच इतकं सगळं प्रकरण बाहेर आलं का? यापूर्वी डॉक्टरवर काहीच कारवाई झाली नव्हती का? 

तर तसं नव्हतं. यापूर्वी देखील डॉक्टरवर कारवाई झाली होती. १९ सप्टेंबर २०१० रोजी त्यांच्या हॉस्पीटलवर एका वृत्तवाहिनीमार्फत स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या सोनोग्राफीची परवानगी रद्द देखील करण्यात आली होती. त्यानंतर एका मोठ्या डॉक्टरांचे शपथपत्र वापरून पून्हा सुदाम मुंडे सोनोग्राफी करु लागला.

त्याच्या गर्भपात केंद्रातील अनियमततेमुळे त्याला नोटिस बजावण्यात आली होती. त्याला उत्तर न दिल्याने १५ मे २०११ पासून त्याच्या गर्भपात केंद्राचा परवाना देखील रद्द करण्यात आला होता. तरिही अशी प्रकरणं स्थानिक पातळ्यांवरच दाबली गेली. 

या प्रकरणात एकूण १७ जणांना आरोपी करण्यात आलं. त्यापैकी तपासादरम्यान ४ आरोपी मृत झाले तर निकाल लागला तेव्हा १० आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. तीन आरोपींना शिक्षा देण्यात आली. २०१९ साली कोर्टाने स्त्री भ्रूणहत्या रोखणारा पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार हे तिघांना दोषी ठरवले होते. भारतीय दंड विधानाच्या ३१२,३१३,३१४,३१५,,तसेच ३१८ एम टी पी ऍक्ट ३,५ कलम नुसार या तिघांना दहा वर्षे शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड ठोठावली. 

आत्ता या गोष्टीचा दूसरा पार्ट सुरू झाला. 

कोर्टाने दहा वर्षांची शिक्षा दिली ती २०१९ साली. यापूर्वी सुदाम मुंडे याने ७ वर्ष कारागृहात काढल्याने त्याला पुढची फक्त ३ वर्ष पूर्ण करायची होती. सहा महिन्यांपूर्वी सुदाम मुंडेने सुप्रीम कोर्टातून जामीन घेतला आणि पुन्हा परळीत आला. 

त्यानंतर गावाच्या बाहेर त्याने हॉस्पीटल सुरू केले. त्यानंतर मागील आठवड्यात ५-६ सप्टेंबर २०२० रोजी  बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सुनियोजित पद्धतीने कारवाई करून तपास केला. 

त्याचा परवाना रद्द करण्यात आल्यानंतर देखील तो दवाखाना टाकून बसला होता. आरोग्य विभागाला तिथे पुन्हा गर्भपाताचे साहित्य मिळाल्याची माहिती माध्यमांकडून सांगण्यात येत आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.