इस्त्रायलची निर्मीती कशी झाली ? 

पॅलेस्टाईनच्या कट्टरपंथीयांकडून जेरूसलेमवर रॉकेट हल्ला करण्यात आला. मग इस्रायलकडून देखील हल्ला करण्यात आला. या राड्यात काही लोकं ठार झाली. अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही दिवसभर ऐकल्या वाचल्या असतील.

जागतिक बातम्या सांगायला मिडीया आहेच, त्यात आपण जास्त डीप जायची गरज नाही. त्यामुळं आपण बेसिक मुद्दे क्लियर करत राहू. तर मुद्दा हा आहे की,

इस्त्रायलची स्थापना कशी झाली… 

त्यापूर्वी इस्त्रायल भूतकाळात कसा होता. इतिहासात त्यांची स्थापना कोणी केलेली. त्यानंतर ज्यू लोकांना आपली मातृभूमी का सोडावी लागली या संबधातून माहिती घ्यावी लागते. 

ज्यू धर्माचा मूळ पुरूष म्हणून अब्राहमला ओळखले जाते. त्याला देवाने भूमी देण्याचे वचन दिले होते. देवाने ज्यू लोकांना दिलेली भूमी म्हणजे पूर्वीचं पॅलेस्टाईन आणि आजचे इस्रायल. यालाच ज्यू लोक देवदत्त भूमी म्हणतात.

प्राचीन काळात ज्यू लोकांनी इथे आपले राष्ट्र उभा केले. राजा डेव्हिड याने इथे राजधानी उभा केली. डेव्हिडचा मुलगा सालोमन याने जेरूसलेमध्ये ज्यूंचे पहिले मंदिर बांधले. या वंशाची सत्ता इसवी सन पूर्व १००० ते इस पूर्व १५८६ या काळात होती. 

मोझेसच्या दहा आज्ञा होत्या. या आज्ञांचे पालन केले तर तूम्ही सुरक्षित रहाल नाहीतर तूम्हाला मातृभूमी सोडून जावे लागेल. जगभर विखुरले जातं. हालअपेष्टा होतील अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. 

पुढे बॅबिलोनचा सम्राट नेबुचाड्रीझार याने या भूमीवर आक्रमण केले आणि तिथून ज्यू लोकांना हाकलवून देण्यात आले. त्यानंतर पर्शियन सम्राट सायरस याने जेरुसलेम जिंकले. त्याने पून्हा ज्यू लोकांना इथे आणले. हा भाग पर्थियन सम्राज्याचा घटक झाला. 

त्यानंतर रोमन सम्राज्याने इथे आक्रमण केले. त्यांनी पून्हा ज्यूंचे अत्याचार करण्यास सुरवात केली. ज्यू लोकांना गुलाम करुन युरोप-आशिया-आफ्रिका देशांमध्ये पाठवण्यात आले. आणि ज्यू लोक कायमचे आपल्या मातृभूमीला पोरके झाले. 

दिड दोन हजार वर्षांचा काळखंड सरला. ज्यू लोक जगभरात विखुरले गेले. पण त्यांच्या प्रार्थनेत नेहमीच पुढची प्रार्थना आपल्या मातृभूमीत अस येई. हजारों वर्ष ज्यू लोक आपल्या मातृभूमीत परत जाण्याची वाट पहात राहिले. 

मात्र झिवोनिस्ट चळवळ म्हणजे परत आपल्या मातृभूमीला जाण्याची चळवळ उभारली ती एकोणीसाव्या शतकात.

थिओडर हर्झल या व्यक्तीला ही चळवळ व्यापक करण्याचे श्रेय देण्यात येते. ज्यू लोकांचे अभ्यासक व नेते होते. त्यांनी पहिल्यांदा ज्यू धर्मीय लोकांचा प्रश्न हा सामाजिक नसून राजकीय आहे असे सांगितले. 

त्यांच्या या मताला तत्कालिन परिस्थिती झालेला आल्फ्रेड ड्रेफस खटला कारणीभूत ठरला. 

आल्फ्रेड ड्रेफस हा ज्यू होता. तो फ्रान्सच्या सैन्यात कॅप्टन होता. जर्मनीला सहकार्य करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याची जाहीर धिंड काढण्यात आली. त्याचे सर्व शौर्यपदके परत घेण्यात आली. ज्यू लोकांचा मृत्यू होवो अशा घोषणा देण्यात आल्या. ज्यू लोकांच्या विरोधात या घटनेमुळे असंतोष निर्माण झाला. 

मात्र आल्फ्रेड ड्रेफस पुर्णपणे निर्दोष होता. या घटनेत जर्मनीला फितूर असणाऱ्या दूसऱ्या अधिकाऱ्यांच नाव कालांतराने समोर आलं. त्यानंतर आल्फ्रेड ड्रेफस याची सुटका करण्यात आली. त्याला पून्हा मानसन्माने सैन्यात घेण्यात आले. 

पण या घटनेतून निघायचा तो बोध ज्यू लोकांनी घेतला. तो ज्यू होता म्हणून सर्व ज्यू लोकांवर गद्दार असण्याचा शिक्का मारण्यात आला. या घटनेनंतर झिओनिस्ट चळवळीला व्यापक स्वरूप येत गेले. 

ऑगस्ट 1897 साली झिवोनिस्ट चळवळीचे आयोजन पहिल्यांदा लंडन येथे करण्यात आलं. यामध्ये थिओडोर हर्झल यांनी तुर्की सुलतान, इंग्रज यांच्याकडून पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांच्या वसाहती निर्माण करण्यास परवानग्या मिळवल्या. आपल्या मातृभूमीच्या दिशेने ज्यू लोकांनी टाकलेले हे पहिले पाऊल होते. 

पण झोओनिस्ट चळवळीचा खांदा असणाऱ्या हर्झल यांच 1904 सालीचं निधन झालं. 

मात्र या पूर्वीच्या काळात देखील असंघटीतपणे का होईना ज्यू लोकांना आपली मातृभूमी खुणावत पाहिली. 19 व्या शतकापासून जगभरात विखुरलेले ज्यू इथे येऊ लागले होते. 1870 च्या दरम्यान इथे 17 हजार ज्यू लोक राहू लागले होते. 

ज्यू वेगवेगळ्या काळात इथे येऊ लागले. या सर्व घडामोडींना अलिया असे नाव देण्यात आले. पहिले अलिया एकोणीसाव्या शतकात झाले. त्यानंतर 1904 मध्ये रशियातून ज्यू लोक इथे येवू लागली त्याला दूसरे आली म्हणले गेले. 

त्यानंतरच्या काळात पहिल्या महायुद्धाला सुरवात झाली.

जगभर ज्यू लोकांची संख्या विखुरली गेली असली तरी ते महत्वाच्या पदांवर कार्यरत होते. अमेरिकेच्या सैन्यात निर्णय घेण्याच्या पातळीवर ज्यू लोक होते. पहिल्या महायुद्धात अमेरिकेचा पाठिंबा मिळावा म्हणून इंग्लडच्या परराष्ट्र सचिव आर्थर जेम्स बाल्फोर यांनी ज्यू नेते वाल्टर रॉथचाईल्ड यांना पत्र लिहले. यामध्ये त्यांनी युद्धानंतर ज्यू लोकांच्या होमलॅंण्डची मागणी मान्य करण्यात येईल असे सांगितले. 

पहिले महायुद्ध संपल्यानंतर ही भूमी इंग्रजांच्या ताब्यात आली आणि जगभरातून ज्यू लोकं पून्हा आपल्या मातृभूमीच्या दिशेने खेचले जाऊ लागले. 1919 ते 1939 या काळात सुमारे पाच लाख ज्यू लोकं पॅलेस्टाईन इथे आले आणि वर्षानुवर्षे राहणारे अरब व ज्यू धर्मीय यांच्यात संघर्ष उफाळून येऊ लागला. 

पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेन्शन्सने ज्यू लोकांच्या मातृभूमीस मान्यता दिली. 

पॅलेस्टानी अरब व ज्यू यांच्यात भूमीवरुन संघर्ष सुरू झाला. ज्यू लोकांना समुद्रात ढकलल्याशिवाय आपल्याला भूमी मिळणार नाही ही अरब लोकांनी भूमिका घेतली. तर पॅलेस्टाईन हे ज्यू लोकांचेच आहे अशी ज्यू लोकांची भूमिका होती. 

या संघर्षातून ज्यू लोकांनी अरबांचे आक्रमण थांबवण्यासाठी आपले संघटन मजबूत केले, त्याला नाव देण्यात आले हॅगन्ना. पहिल्या महायुद्धापासून दूसऱ्या महायुद्धापर्यन्तच्या काळात सुमारे 60 लाख ज्यू लोक मारले गेले. पण जगभरातील ज्यू लोक इथे येतच राहिले. अरबांचा कडवा प्रतिकार करत राहिले. 

1947 नंतर ब्रिटनने वसाहतीतून माघारी येण्याचे धोरण स्वीकारले त्यातूनच ब्रिटीशांनी या भूमीचा ताबा युनोकडे दिला. युनोने 29 नोव्हेंबर 1947 साली पॅलेस्टाईनची फाळणी करुन ज्यू साठी इस्त्रायल आणि अरबांसाठी पॅलेस्टाईन असा निवाडा केला. 

14 मे 1948 ला ब्रिटीशांनी आपला हक्क सोडला आणि इस्त्रायलच्या निर्मीतीची घोषणा झाली. अमेरिका व रशियाने या देशाला तात्काळ मान्यता देऊन टाकली. 

स्वातंत्र मिळाल्याच्या दूसऱ्याच दिवशी इजिप्त, सिरीया, जॉर्डन आणि इराकने इस्त्रायल नष्ट करण्यासाठी युद्धाची घोषणा केली. त्यात अरबांचा पराभव झाला आणि 7 लाख पॅलेस्टिनी निर्वासित झाले. 

ज्यू लोकांनी देखील वांशिक सफाईचे धोरण स्वाकरे आणि इस्त्रायलाच्या ताब्यातून पॅलेस्टिनी नागरिकांच्या कत्तली करण्याचे मिशन राबवले. पॅलेस्टिनी निर्वासित हा नवीन शब्द आधुनिक जगाला मिळाला. 

झिओनिस्ट चळवळीचे स्वप्न पाहिलेल्या हर्सल यांचे 1904 साली निधन झाले होते. त्यांना जिवंतपणी इस्त्रायल पाहता आला नाही. त्यांच्या अस्थी 1949 मध्ये इस्त्रायलमध्ये आणण्यात आल्या. आणि आधुनिक इस्त्रायलची निर्मीती झाली… 

संदर्भ : रक्तरंजीत मध्यपूर्व (रमेश पंतगे), इस्रायल छळाकडून बळाकडे (ना.ह.पालकर)

हे ही वाच भिडू

2 Comments
  1. Pravin dhepe says

    कोरोना झालेल्या लोकांसाठी केंदृ सरकारने प्रति वेकती 150000 रुपये देत आहे खरं आहे का?

  2. Tushar Patil says

    सर,
    हिटलर चा इतिहास, त्याने केलेली कामे, यावर एक पोस्ट लिहा..

Leave A Reply

Your email address will not be published.