गोष्टी कमळाच्या !
कमळ आपलं राष्ट्रीय फूल आहे. आणि आपल्या देशात सध्या कमळाची हवा पण फुल आहे. आपल्याला फुलापेक्षा बीजेपीची निशाणी म्हणून कमळ जास्त माहित आहे आजकाल. बाळासाहेब ठाकरे तर गमतीत बीजेपीला कमळाबाई म्हणायचे. पण या कमळाच्या अनेक intresting गोष्टी आहेत.
कमळ जेवढं आपल्या देशात जेवढं महत्वाचं आहे तेवढच गोंधळात टाकणारं आहे. कमळ एकाचवेळी खूप देवांचं आवडतं. बुद्धाचा एक पाय कमलावर टेकलेला असतो. असं म्हणतात की भगवान बुद्ध पाय टाकायचे तेंव्हा त्यांच्या पाउलखुणेत कमळ उमललेलं दिसायचं. एवढच नाहीतर मशिदीचा घुमट बघा. मशिदीच्या घुमटाभोवती कमळाच्या पाकळ्या असतात. हा घुमट उलट्या कमळासारखा असतो. कमळामध्ये कमळ म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी नेहमी स्वभावाने चंचल असते. पण कमळात मात्र ती कायमची स्थिरावली. त्याचं कारण काय माहित नाही ?
ब्रम्हदेव, शंकर, गौतम बुद्ध सगळ्यांच्या बाबतीत कमळ तेवढच महत्वाचं आहे. वृक्ष अभ्यासक आणी लेखक शा. प्र. दीक्षित यांच्या पुस्तकात कमळाच्या अनेक गोष्टी कळतात.
पहिली कथा विष्णूची. विष्णूला सगळ्यात जास्त आवडणारे फुल कमळाचे. विष्णू दररोज शंकराची कमळाच्या फुलाने पूजा करायचा. दररोज एक हजार कमळाची फुलं पाताळातून आणायची आणि शंकराची पूजा करायची असा विष्णूचा कित्येक वर्ष दिनक्रम होता. एकदा शंकराला विष्णूच्या भक्तीची परीक्षा पाहण्याची लहर आली. शंकराने विष्णूच्या पूजेच्या तबकातील एक कमल लपवून ठेवले. कमलपुष्पे वाहता वाहता एक कमल कमी असल्याचे विष्णूच्या लक्षात आले. पूजा अर्धवट टाकून परत पाताळात जावं तर पूजेत खंड पडेल असं विष्णूला वाटलं. त्यात पूजा करताना मधेच उठून जाणं शस्त्रसंमत पण नाही हे विष्णू जाणून होता.
शेवटी विष्णूने आपले नयनकमळ शंकराला वाहायचे ठरवले. धारदार तलवारीने डोळा काढला आणि शंकराला वाहिला. विष्णूची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाला. तो म्हणाला, विष्णू तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझी दृष्टी तुला परत तर मिळेलच, पण आणखी काही वर पाहिजे असल्यास एखादा वर माग.’
हे ऐकून विष्णू म्हणाला, प्रभू, आपण प्रसन्न झाल्यावर भक्ताला आणखी काय पाहिजे? तुम्ही आग्रहच करता आहात तर आपल्या जवळील सुदर्शन चक्र मला द्या. हे ऐकून शंकराने मोठ्या आनंदाने आपल्याजवळील सुदर्शन चक्र विष्णूला दिले.
कमळाच्या अशा अनेक गोष्टी आहेत. कमळ आपल्या देशातल्या इतर फुलांच्या मानाने जरा मोठे आहे. पण त्याचा आकार एकसारखा नसतो. आणि कमळाचा रंगही एक नसतो. कमळाच्या जातीप्रमाणे त्याचे रंग बदलतात. ऐकून आश्चर्य वाटेल पण काही कमळाची फुलं सकाळी उमलतात आणि रात्री मिटतात तर काही कमळाची फुलं रात्री उमलतात आणि सकाळी मिटतात. चिखलात फार कमी वनस्पती टिकून राहतात. त्यातलं एक म्हणजे कमळ. बरं कमळाच्या पानाचं अळवाच्या पानासारखं आहे. आपण म्हणतो ना आळवावरच पाणी. ते पानावर ठरतच नाही. तसंच कमळाचं आहे. त्याच्या पानावर पाणी ठरत नाही. एकप्रकारे हे कमळाचं अध्यात्म आहे. चिखलात राहूनही स्वच्छ. पाण्यात राहूनही नामानिराळे.
कमळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे फुल सहज मिळत नाही. बाकीची फुलं तुम्ही चोरून घेऊ शकता. तोडून घेऊ शकता. कमळाच्या फुलासाठी कष्ट असतात. तुम्ही पट्टीचे पोहणारे असला तर कमळ तुम्हाला मिळेल. नाहीतर मग पैसे देऊन कमळ मिळवण्याशिवाय पर्याय नाही.
अर्थात बहुतेक लोक पैसे देऊनच कमळ घेतात. ते सोपं आहे. आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं तर आपला गाजलेला १८५७ चा उठाव. हिंदू मुस्लिमांनी मिळून इंग्रजांविरुद्ध दिलेला हा लढा. या लढ्यात एक महत्वाचं प्रतिक होतं कमळ.
विष्णूसारखाच रावणसुद्धा शिवभक्त होता. विष्णूसारखाच रावणाचा पण देहदंड होता. रावणही रोज दहा कमळांनी शंकराची पूजा करायचा. अशीच पूजा करताना एक दिवशी त्याला आढळून आले की, पूजेत एक कमळ कमी आहे. ताबडतोब रावणाने आपले एक मुख कापून शंकराला वाहण्याची तयारी केली.
शंकर प्रसन्न झाले आणि पुढचा अनर्थ टळला. या प्रसंगाचा पुरावा आपल्याला वेरूळच्या लेणीत पहायला मिळतो.
हे ही वाचा –
- १५ ऑगस्टची जिलेबी खाताय तर मग हे खास तुमच्यासाठी आहे !
- कृषीसंस्कृतीचं एक गूढ रहस्य आनीपिनी.
- रेशीम मार्ग- फासियन आणि शुएन सांग