इंडियन आयडॉल ते शिवसेना असा भन्नाट प्रवास असलेला अभिजित सावंत कुठं गायब झाला ?

रियालिटी शो मध्ये तेव्हा रियालिटी दाखवली जायची, रियल टॅलेंट दाखवलं जायचं त्यामुळे लोकं जास्तीत जास्त टॅलेंटवर लक्ष द्यायचे. जज लोकं फालतूचा मेलोड्रामा करत नसायचे आणि स्पर्धक हा टिव्हीवर फक्त गायला यायचा ना की गरिबी दाखवायला. सगळं ओरिजनल असायचं आणि लोकांना तेच जास्त भावायचं.

पण मग अलीकडच्या काळात रियालिटी शो मध्ये काय चालतं हे बघितलं तर आपसूक तोंडातून शिवी बाहेर येते म्हणजे येतेच. पण आजचं वास्तव नाकारता येत नाही पण तेव्हा इंडियन आयडॉल नवीनच सुरू झालं होतं आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय झालं होतं. यातला प्रत्येक स्पर्धक लोकांच्या घरातला घटक झाला होता यातच होता मराठमोळा अभिजित सावंत.

अभिजित सावंत म्हणल्यावर इंडियन आयडॉल ओघाने येतच. इतक्या भव्य दिव्य शोचा पहिला वहिला विजेता असं बिरूद अभिजीत सावंतच्या नावापुढे लागलं होतं. पण वेळ कधी बदलेल सांगता येत नाही त्यामुळे अपग्रेड होतं राहता आलं पाहिजे.

अभिजित सावंत भारताचा फेवरेट सिंगर होता शिवाय प्रियांका चोप्रा त्याची विशेष फॅन होती. एका वेळेला प्रत्येक मेहफीलीची शान म्हणजे अभिजित सावंत असं समीकरण झालं होतं पण मग नेमकं काय झालं आणि इंडियन आयडॉल नंतर अभिजित सावंत गायब झाला.

७ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात अभिजित सावंत जन्मला. लहानणापासूनच अभिजीतला संगीत विश्व खुणावू लागलं होतं याला कारण होतं अभिजीतचे काका. ते एका संगीत पार्टीचे सहकारी होते आणि स्टेज शो मध्ये गायचे. त्यांचं बघूनच अभिजित या क्षेत्राकडे वळला. घरच्यांना अभिजीतने सांगितलच नव्हतं की मला संगीत क्षेत्रात काम करायचं आहे. 

घरचे त्याला सपोर्ट करतील याबद्दल काहीच शाश्वती नव्हती पण अभिजितच्या काकांनी त्याला या क्षेत्रातले बारकावे आणि संधी दाखवून दिल्या होत्या. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये अभिजित दणकेबाज गायचा, मुलाचं वेड बघून वडिलांनी अभिजीतला सपोर्ट करायचा निर्णय घेतला. संगीत क्लास वैगरे सगळं केलं आणि अभिजितला या क्षेत्रात काम कर म्हणून प्रवृत्त केलं.

कॉमर्स मधून अभिजीतने डिग्री मिळवली तोच इंडियन आयडॉलचे ऑडिशन सुरू झाले होते. ऑडिशन दिलं आणि अभिजित त्यात सिलेक्ट झाला. सामान्य मुलांसारख आयुष्य जगणाऱ्या अभिजित सावंतच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

इंडियन आयडॉलमध्ये अभिजित शेवटपर्यंत टिकून होता आणि तो शेवटी विजेताही ठरला. अमाप प्रेम, प्रसिध्दी त्याला मिळाली. मुंबईत साधं आयुष्य जगणारा अभिजित सावंत आता स्टार झाला होता, तो जिथं जाईल तिथ लोकांची गर्दी उसळत असे.

पूढे अभिजित सावंतचा एक अल्बम आला तो होता आपका अभिजित…. अल्बम मधील मोहबते लुटाऊंगा आणि लफजो मे केह ना सकु ही गाणी प्रचंड हिट झाली. हा अल्बम गाजला आणि यावरूनच अभिजीतला सिनेमात गाणी गाण्याची संधी मिळाली.

आशिक बनाया आपने या सिनेमात असलेल्या मर जांवा, मिट जांवा हे गाणं अभिजितच्या आवाजाने सुपरहिट झालं. २००७ साली अभिजीतचा दुसरा अल्बम आला जूनून पण हा अल्बम विशेष काही चालला नाही. पण मग नंतर अभिजीत परत रियालिटी शो कडे वळला, जिंकलाही.

पूर्ण आशियात गाजलेल्या आशिया आयडॉलमध्ये अभिजीतने ३ रा क्रमांक पटकावला होता.

फक्त गायन नाही तर अभिजीतने अभिनय, डान्स, अँकरींग, कॉमेडी सर्कस असं बरच काम केलं. लॉटरी या सिनेमात तो लीड हिरो होता पण हा सिनेमा दणकून आपटला. पण केवळ गायनावर फोकस न करता अभिजीत जिकडे नजर जाईल त्या त्या क्षेत्राकडे जात राहिला आणि त्याचा सुर हरवला.

ना अभिनयातून काही करता आलं ना गाणे गाजत होते. अभिजीतची कोंडी झाली होती. एका मुलाखतीत तर तो सांगतो की मी पैशाच्या मागे पळत होतो. पण बॉलीवुड मधे काम त्याचं लोकांना मिळतात ज्याचं लॉबिंग आहे, बाहेरील लोकांना तिथं संधी दिली जात नाही.

अतिफ अस्लमवर सुद्धा अभिजित सावंतने आरोप केले होते की तो कोणत्या अँगलने प्ले बॅक सिंगर वाटतो. त्याचे बॉलिवुडमध्ये लागेबांधे आहेत आणि म्हणून तो विरोधी देशाचा असूनही त्याला बॉलिवूडमधे काम मिळतं.

पूढे अभिजित सावंत शिवसेनेमध्ये गेला. शिवसेनेने त्याला तिकीटही दिलं होतं कारण तेव्हा अभिजीत सावंतची भरपूर क्रेझ होती जेणेकरून तरुण लोकं शिवसेनेकडे वळतील. पण अभिजित तिथंही विशेष काही करू शकला नाही.

अभिजीत सावंतचा फकिरा नावाचा आलेला अल्बम विशेष जादू दाखवू शकला नाही. इतक्या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता तेव्हा पासून अभिजीतने कानाला खडा लावला की परत तो कुठल्याही रियालिटी शोमध्ये दिसणार नाही.

म्हणून आपल्याला अभिजीत सावंत कुठेही दिसून येत नाही. पण त्याचे कट्टर फॅन अजूनही त्या जुन्या अभिजित सावंतच्या गाण्याची वाट पाहत आहेत. अशा आहे की अभिजित सावंत परत एकदा परतावा तेही हिट अल्बम आणि गाणी घेऊन….

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.