नाटक कंपनीत भांडी घासणाऱ्या या माणसाने पुढे अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवली

कोणत्याही माणसाला कधीही कमी लेखू नये. या जगात अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. उदाहरणार्थ, पूर्वायुष्यात चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान झाला आहे. असो !

मुद्दा हा आहे की, कोणाला उगाच नावं ठेवू नयेत. कोणाचं आयुष्य कधी बदलेल काही सांगता येत नाही. ही गोष्ट अशाच एका माणसाची. जो आधी घरच्या परिस्थितीमुळे नाटक कंपनीत उष्टी-खरकटी भांडी घासायचा. परंतु पुढे याच माणसाने स्वतःच्या अभिनयाने हिंदी – मराठी सिनेसृष्टी गाजवली.

हा कलाकार म्हणजे अनंत बळवंत धुमाळ. 

धुमाळ या आडनावाने ते सिनेसृष्टीत ओळखले जायचे. गंमत म्हणजे , हिंदी माणसांना ‘ळ’ चा ‘ल’ करायची सवय असल्याने त्यांना तिथे ‘धुमल’ या नावाने संबोधित केलं जायचं. उंचीने कमी, वजनाने काहीसे जास्त परंतु अभिनयात दर्जेदार असलेले धुमाळ अनेक वर्ष भारतीय सिनेसृष्टीत सक्रिय होते. 

धुमाळ यांचा जन्म १९१४ साली झाला. त्यांचे वडील बळवंत धुमाळ वकील होते. घराला आर्थिक आधार देणारे ते एकमेव होते. परंतु धुमाळ १० वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आत्ता मात्र घराची सर्व जबाबदारी धुमाळ यांच्यावर आली. घरातला कर्ता पुरुष गेल्याने काहीतरी नोकरी करणं त्यांना गरजेचं होतं. त्यामुळे मिळेल ती छोटी मोठी कामं ते करायचे.

त्या काळात मराठी रंगभूमीवर अनेक नाटक कंपनी होत्या. अशाच एका नाटक कंपनीत धुमाळ यांना नोकरी लागली. 

नाटक कंपनीमध्ये नोकरी लागल्याने तुम्हाला वाटलं असेल, की त्यांना एका नाटकात छोटी – मोठी भूमिका मिळाली असावी. पण असं झालं नाही. नाटक कंपनीत येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना पाणी देणं, त्यांची उठबस करणं अशी कामं त्यांना करावी लागायची.

त्यावेळी पद्धत होती की, नाटक कंपनीमध्ये जेवणाच्या पंगती उठत असत. त्यामुळे सर्वांची जेवणं झाल्यावर भांडी घासण्याचं काम धुमाळ यांच्याकडे असे. आपल्याला गरज असेल तर कोणतंही काम करायला लाज वाटत नाही. त्यामुळे धुमाळ सुद्धा अगदी न लाजता ही कामं करायचे. 

क्वचित नाटकामध्ये काम करणारा एखादा अभिनेता आजारपणामुळे येऊ शकला नाही, तर त्याची भूमिका  धुमाळ करायचे. इथून त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. अशाप्रकारे धुमाळ यांचं दैनंदिन आयुष्य ठीकठाक सुरू होतं.

काहीच दिवसांनी धुमाळ यांच्या आयुष्यात आलेल्या दोन व्यक्तींमुळे त्यांच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं.

त्या दोन व्यक्ती म्हणजे आचार्य अत्रे आणि नानासाहेब फाटक.

या दोघांमुळे नाटकात छोटी कामं करणाऱ्या धुमाळ यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या. त्या काळी ‘लग्नाची बेडी’ आणि ‘घराबाहेर’ नाटकात धुमाळ यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. नाटकांमध्ये काहीशा खलनायकी भूमिका धुमाळ रंगवायचे. 

मराठी रंगभूमीवर धुमाळ यांना ओळख मिळू लागली. आणि अशातच १९५२ साली आलेल्या ‘पेडगावचे शहाणे’ या मराठी सिनेमातून धुमाळ यांचा सिनेसृष्टीत प्रवेश झाला.

मराठीत सिनेसृष्टीत काम करणाऱ्या धुमाळ यांना हिंदी सिनेमाच्या ऑफर्स आल्या. ‘वो कौन थी’, ‘आँखे’, ‘गुमनाम’, यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये धुमाळ झळकले. मेहमूद, शोभा खोटे आणि धुमाळ हे त्रिकुट ‘ससुराल’ या हिंदी सिनेमात एकत्र दिसले.

हा सिनेमा सुपरहिट झाला. त्यानंतर या त्रिकुटाने अनेक विनोदी भूमिका करून एकत्र काम केले. धुमाळ यांचा मराठीत गाजलेला सिनेमा म्हणजे ‘आम्ही जातो आमुच्या गावा’.

धुमाळ यांचं लग्न झालं होतं. आपल्या बायकोने फक्त चूल आणि मुल अशा सांसारिक गोष्टींमध्ये न अडकता शिक्षण सुद्धा घ्यावं, अशी ठाम भूमिका लग्नाच्या वेळेस धुमाळ यांनी घेतली होती. तो काळ परंपरावादी विचारांचा होता.

त्यामुळे या काळात धुमाळ यांनी असा विचार केल्यामुळे समाजाच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु कोण काय बोलतंय, याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. घरच्या परिस्थितीमुळे धुमाळ यांना शिक्षण घेता आलं नाही.

त्यामुळे शिक्षणाचं महत्व ते जाणून होते. पत्नी आणि मुलांनी शिक्षणाच्या बाबतीत मागे राहू नये, एवढीच धुमाळ यांची इच्छा होती. 

विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांची दोन घटका करमणूक करणारे अनंत बळवंत धुमाळ यांनी रंगभूमी आणि सिनेमा दोन्ही क्षेत्रांमध्ये मुक्तपणे संचार केला. नाटक कंपनीत सुरुवातीला भांडी चकाचक करणाऱ्या धुमाळ यांनी स्वतःची अभिनय कारकीर्द सुद्धा लखलखीत केली. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.