नेहरूंनी काय केलं विचारणारे शहा जिथे ॲडमीट होतात ते एम्स हॉस्पीटल नेहरूंमुळे उभारलं गेल

भिडूनों एम्स हे हॉस्पिटल आहे तब्बल ६४ वर्षांपुर्वीच. म्हणजे पंडीत जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना त्यांनी निर्माण केलेलं. आपण त्यांच्या डोकलाम, काश्मिरचा प्रश्न या घोळातील गोष्टींवर वाद घालून लोड घेण्यापेक्षा भारताच्या नवनिर्माण करण्यासाठी मैलाचा दगड ठरलेल्या भाकरा नांगल धरण, रिहंद बांध, भिलाई आणि बोकारोचे स्टील कारखाने यांसारख्या त्यांनी केलेल्या विधायक कामाची माहिती घेवू.

तर अशाच अनेक विधायक कामांपैकीच एक आहे दिल्लीच ‘एम्स’ हॉस्पिटल. इथेच आज अगदी पंतप्रधानांपासून अनेक व्हीआयपी ॲडमीट होवून उपचार घेत असतात. तसेच अनेक प्रतिष्ठीत डॉक्टरांनी आपले पदव्युत्तर शिक्षण इथून पुर्ण केलं आहे.

साल होत १९४६. स्वातंत्र्याची पहाट लवकरच होणार होती. अशावेळी भारतीय लोकसेवक सर जोसेफ भोर यांच्या अध्यक्षतेखालील आरोग्य सर्वेक्षण आणि विकास समितीने स्वातंत्र्यानंतर देशातील आरोग्याच्या प्रश्नांसाठी सर्व सोयींयुक्त एक राष्ट्रीय वैद्यकीय उपचार आणि संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी शिफारस केली होती.

यामध्ये विशेष भर होता तो देशातील आरोग्य व्यवस्थेला उभं करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स घडवणं, पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रम विकसीत करणं, इत्यादी.

पुढे भारत स्वातंत्र्य झाला. पण ही शिफारस बासनात न गुंडाळता पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी देखील ही गोष्ट मनावर घेतली.

त्यांचे स्वप्न होते की दक्षिण पुर्व आशियामध्ये वैद्यकीय उपचार आणि संशोधनाची सर्वात मोठी संस्था भारतात व्हावी. त्यांनी हे स्वप्न राजकुमारी अमृत कौर यांना बोलुन दाखविले.

राजकुमारी अमृत कौर यांचा अमुल्य वाटा :

त्यावेळी आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या होत्या. त्या कॉंग्रेसवर देखील टीका करताना कोणाचाही मुलायजा ठेवतं नसतं. त्यामुळेच महात्मा गांधी यांच्या आग्रहावरुन त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली होती. कौर यांनी या संधीचे सोने केलं. आणि नेहरुंसोबत त्यांनी एक विस्तृत डिझाईन तयार केलं.

आता प्रश्न होता खर्चाचा. तर सर जोसेफ भोर यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारवर भारत सरकारकडून एक प्रस्ताव तयार केला गेला. या प्रस्तावाला न्युजीलंड, अमेरिका, जर्मनी या सरकारांचे समर्थन मिळाले आणि १९५१ च्या कोलंबो योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी कौर यांनी मदत मिळवली.

१८ फेब्रुवारी १९५६. राजकुमारी अमृत कौर यांनी लोकसभेमध्ये देशातील सर्वात मोठे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणारे आणि उच्च दर्जाचे चिकीत्सा करणारे आरोग्यकेंद्र उभं करण्यासंदर्भातील विधेयक मांडलं.

या भाषणादरम्यान आरोग्यमंत्री कौर म्हणाल्या,

“माझी इच्छा आहे की हे अद्भुत झालं पाहिजे, ज्याच्यावर भारताला गर्व असेल. आणि भारताने गर्व केलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे”

पहिल्यांदा ही संस्था कोलकाता येथे उभी रहावी असा प्रस्ताव नेहरुंनी दिला होता. मात्र पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांनी नकार दिल्यानंतर पुढे दिल्लीमध्ये ही संस्था उभी करण्याचे ठरलं.

आज एकुण ४२ विविध विभागातील ‘वैद्यकीय शिक्षण’ एम्समध्ये दिले जाते. तसेच २० राज्यांतील २३ शहांमध्ये ‘एम्स’ पोहचले आहे. सध्या २३ पैकी १५ एम्स रुग्णायल कार्यान्वित आहेत. तर ८ प्रलंबित आहेत.

कौर यांची दुरदृष्टी….

● १९५६ साली संसदेमध्ये एम्ससाठी विधेयक मंजुर करुन संस्थेला कायदेशीर दर्जा मिळवून दिला. त्याचसोबत संस्थेला राष्ट्रीय महत्व, स्वातंत्र्यता आणि स्वायत्तता मिळवून दिली.

● कौर यांच्या प्रयत्नांमुळेच १९५६ सालापासूनच प्रवेशासाठीची एन्ट्रान्स एक्झाम चालू झाली.

● यासोबतच कौर यांनी शिमला येथील आपले वडीलांचे मॅनरविला हे घर ‘एम्स’ला दान केले. याचे मुख्य कारण म्हणजे ‘एम्स’मधील नर्संना कामच्या तणावापासून आराम मिळावा.

● ‘एम्स’ची पायाभरणी करण्यासोबतच कौर यांनी भारतीय बाल कल्याण परिषदेची स्थापना केली आणि त्या पहिल्याच अध्यक्ष झाल्या.

●त्या भारतीय कुष्ठरोग असोसिएशन, क्षयरोग संघटनेच्या अध्यक्षा आणि आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटीच्या उपाध्यक्ष होत्या.

● यासोबतच त्यांनी चार वर्षे जागतिक आरोग्य संघटनेत डब्ल्यूएचओच्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले आणि १९५० साली डब्ल्यूएचओ असेंब्लीच्या अध्यक्षपदी त्या राहिल्या.

  •  ऋषिकेश नळगुणे 
हे ही वाच भिडू 
Leave A Reply

Your email address will not be published.