नेटफ्लिक्स वर आलेल्या सिरीजमुळे चर्चेत आलेली “अक्कू यादव केस” काय होती..?
Indian Predator : Murder In Courtroom नावाची डॉक्युसिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे. लेखक व दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी कोणतिही एक बाजू न मांडता वास्तविक अक्कू यादवच्या प्रकरणात काय झालं होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 3 भागांचीच असणारी ही सिरीज पाहिल्यानंतर अनेक प्रश्न डोक्यात येतात.
कधीकधी नेमकं असचं झालं होतं, न्यायाची ही बाजू बरोबर होती का? या गोष्टीला जातीय किनार होती का? असे अनेक प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
वास्तविक अक्कू यादवची केस त्या वेळी संपूर्ण भारतात चर्चेत आली होती. या केसवरून राजकारणी लोकांनी पोळ्या देखील भाजून घेतल्या होत्या. पोलीसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. नेटफ्लिक्सच्या Indian Predator सिरीजच्या निमित्ताने का होईना पण अक्कू यादव पुन्हा चर्चेत आला आहे.
नेमकी घटना काय होती..
अक्कू यादव ऊर्फ भरत कालीचरण हा नागपूरच्या कस्तूरबा नगरमधला एक गुंड. झोपडपट्टी दादा जसे असतात तसाच हा दादा पण फक्त लुटमार किंवा मारामारी इतक्यापुरता तो मर्यादित नव्हता तर खून आणि बलात्कार प्रकरणात देखील तो आरोपी होता. पण त्यांच्यावरचे आरोप कधी सिद्ध व्हायचे नाहीत. काही दिवस जेलमध्ये काढल्यानंतर तो बाहेर पडायचा.
या आरोपीचा खून 100 हून अधिक कस्तूरबा नगरमध्ये राहणाऱ्या महिलांनी थेट कोर्टामध्ये घूसून केला होता. इतक्या क्रूर पद्धतीने हा खून करण्यात आला होता की या हल्ल्यात अक्कू यादवचं लिंग देखील कापून टाकण्यात आलं होतं. सुमारे दहा पंधरा मिनिटे हा हल्लाचा प्रकार झाला होता व यामध्ये अक्कूच्या शरिराची अक्षरश: चाळण करण्यात आली होती.
ही सगळी घटना घडली ती नागपूरच्या न्यायालयात. त्यातही असा हल्ला करणाऱ्या खून करणाऱ्या सर्वसामान्य घरातल्या महिला होत्या. त्यामुळे जुन्या हिंदी सिनेमाप्रमाणे हा बदला, प्रतिकार व एखाद्या व्हिलनचा अंत म्हणून या प्रकरणाकडे पाहिलं गेलं.
अक्कू यादव कोण होता.
अक्कू यादव हा मुळचा उत्तरभारतीय. पण कस्तुरबा नगर ही मराठी व इतर भाषिकांची संमिश्र वस्ती. अधिककरून दलित समाजाची वस्ती म्हणून कस्तुरबा नगर ओळखलं जातं. इथेच लहानाचा मोठ्ठा झाला तो भरत कालिचरण उर्फ अक्कू यादव. अक्कू यादव हा सुरवातीला एक फुटकळ गुंड होता. आठ दहा जणांची गॅंग करून किरकोळ पैशांवर डल्ला मारणं, दिवसभर पत्ते कुटत बसणं, व्यसनं करणं असली कामे तो करायचा.
पण हळुहळु त्याची गॅंग मोठ्ठी होवू लागली. अंगात जोर असणारा अक्कू महिलांना शिवगाळ करू लागला, त्यांच्यावर वाईट नजर ठेवू लागला. या काळात त्याला नडणारी महिला होती उषा. उषा ही कस्तुरबा नगरमध्ये दारूविक्रीचा व्यवसाय करायची. एक वेळ अशी आली की अक्कूचा मर्डर करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला.
यावेळी एका मित्राने स्वत:च रक्त देवून अक्कूचा जीव वाचवला होता. हा प्रयत्न उषाच्या माध्यमातून झाल्याचं बोललं गेलं. पण किरकोळ वादातून अक्कूने आपल्याचं मित्राचा खून केला. त्यानंतर काही महिने आत राहिलेला अक्कू बाहेर आला व त्याने उषाचा अत्यंत निर्घुणपणे खून केला. अस सांगतात की त्याने उषाचे प्रत्येक अवयव वेगळा केला होता.
त्यानंतर कस्तुरबा नगरमध्ये अक्कूची मोठ्ठी दहशत झाली. अक्कू व त्याची गॅंग वाटेल त्या घरात जाई व तिथल्या महिलांवर बलात्कार करत. अनेकदा भितीने केस होत नसे. झालं गेलं विसरून भितीपोटी महिला शांत बसतं. नवरा नांदवणार नाही म्हणून अतिप्रसंग घडूनही अनेक महिला शांत बसतं.
या मागे अजून एक गोष्ट सांगितली गेली ती म्हणजे अत्याचार झालेल्या अनेक महिला या दलित समाजातून येणाऱ्या होत्या. तर अक्कू व त्याची गॅंग ही उच्चवर्णीय होती. त्यामुळे या घटनेला जातीय किनार असल्याचं देखील बोललं गेलं..
13 ऑगस्ट 2004 रोजी काय झालं..
13 ऑगस्ट 2004 च्या काही दिवसांपूर्वी अक्कू यादव विरोधात पहिल्यांदा कस्तुरबा नगरमधील महिला एक झाल्या. झालेलं अस की एक तरुणी तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात अक्कू यादव वर पोलीस केस करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती मात्र पोलीसांनी तिची दखल घेतली नाही.
ही माहिती अक्कू यादवला समजल्यानंतर तो युवतीच्या घरी आपल्या गॅंगसह पोहचला. बाहेर ॲसिडची बाटली घेवून धमकी देवू लागला. आत्ता अक्कू अजून एक खून करणार याचा अंदाज कस्तुरबा नगरच्या लोकांना आला. पण यावेळी शांत न बसता सर्व कस्तुरबा नगरच्या महिला व पुरूष एक झाले ते पाहून अक्कूने पळ काढला. काही दिवसात तो पोलिसांना शरण गेला.
कोर्टात नेहमीप्रमाणे त्याला जामीन मिळणार याची कुणकुण कस्तुरबा नगरमधील महिलांना लागली होती. त्यामुळेच अनेक महिला साध्या वेषात हातात हत्यारे घेवून कोर्टात तळ ठोकून होत्या. अक्कू आल्यानंतर एका महिलेकडे पाहून अक्कूनो तिला शिवीगाळ केली.
शिवीगाळ करण्याचं निमित्त होताच सर्व महिला अक्कूच्या दिशेने धावून गेल्या. पोलीसांनी त्यांला सुरक्षित हलवण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. त्यानंतर सुमारे पंधरा ते वीस मिनीट अक्कूला मारहाण चालू होती. यामध्ये अक्कूचे लिंग देखील काढण्यात आलं इतक्या भीषण पद्धतीने हा खून करण्यात आला.
केसचा निकाल काय लागला.
पोलीसांनी कस्तुरबा नगरमधील महिलांना अटक केली. एकूण २२ आरोपी करण्यात आले. प्रकरणाने राजकीय रंग घेतला. सुमारे 10 वर्ष ही केस चालली. व पुराव्याअभावी अखेर सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.