अल कपोन हा असा डॉन होता ज्याला अटक झाल्यानंतर त्याच्या गाडीवर राष्ट्राध्यक्षांनी डल्ला मारला

१९०९ चा काळ. अमेरिकेच्या गुन्हेगारी विश्वात इटालियन अमेरिकन क्राइम बॉस कोलोसिमो आणि त्याचा साथीदार जॉनी टोरियो या दोघांचा बोलबाला होता. इतका की त्यावेळी नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय पदाच्या निवडणूकीतील प्रचारात अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा आला की या दोघांचा नामोल्लेखाशिवाय संपायचा नाही.

दारुची तस्करी, वेश्या व्यवसाय, ब्लॅकमेलिंग करणे आणि इतर अवैध उद्योगांनी त्यावेळी शिकागो शहरात टोक गाठले होते.

पुढे १९२० मध्ये बॉस कोलोसिमोची नॉर्थ साईड गँगकडून हत्या झाली. बॉसच्या मृत्युनंतर जॉनी टोरियो याने स्वतःला शिकागोचा किंग म्हणून घोषित केले. त्याच्या नावाची ख्याती अगदी १४-१५ वर्षाच्या मुलापासून सगळ्या शिकागो आणि न्युयॉर्क शहरात होती.

अशातच १९२१ मध्ये एक २२ वर्षाचा एक पोरगा आपल्या बायकोला घेवून काही कामाच्या शोधात न्युयॉर्कवरुन शिकागोला आला. अलफोंसे ग्रैबियल कपोन आणि देयिरद्रे मैरी कपोन असं त्याचं नाव.

आल्यानंतर पुढच्या अवघ्या ५ वर्षांमध्येच अलफोंसेने टोरियोचीही जागा घेतली. आणि शिकागोचा नवा डॉन अल कपोन बनला.

ज्याच्या नावावर कमीत कमी २०० पेक्षा जास्त हत्या, दारुची तस्करी, वेश्या व्यवसाय आणि ब्लॅकमेलिंग असे बरेच उद्योग नोंद होते. १९२१ मध्ये शिकागोला मोकळ्या हाती आलेल्या कपोनचा या साऱ्या उद्योगातुनच आर्थिक महसूल ७१४ कोटी रुपयांच्या आसपास होता.

कसा होता कपोनचा प्रवास..?

कपोनचा गुन्हेगारी विश्वातील प्रवास जेमतेम ११ वर्षांचा असला तरी त्याचा गुन्हेगारीकडे ओढा तो १४ वर्षांचा असतानाच झाला होता. कपोनचे आई-वडील त्याच्या दोन भावांना घेऊन १८९४ न्युयाँर्क या शहरांमध्ये निर्वासित म्हणून स्थायिक झाले. त्याकाळी या शहरामध्ये घुसखोरीचे प्रमाण खूपच वाढले होते.

इटालियन, ज्यू ही लोक शहरांमध्ये अवैधरित्या येऊन वास्तव्य करत असत.

काही दिवसांनी तेरेसा हिला तिसऱ्या अपत्यासाठी दिवस गेले आणि तिने १७ जानेवारी १८९९ रोजी कपोनचा जन्म झाला. लहानपनापासूनच दारुच्या दुकानशेजारी राहिल्यामुळे त्या वातावरणाचा कपोनवर परिणाम झालाच. हुशार असूनही सतत नापास होण्यामुळे वयाच्या १४ व्या वर्षीच शाळेतुन काढून टाकले. इथेच तो जॉनी टोरियोच्या नाव आणि काम बघून प्रभावित झाला होता.

बारमध्ये सिक्युरिटी गार्ड

पैशांच्या चचणीमुळे तो न्युयॉर्कमधीलच एका बारमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागला. एक दिवस तिथं आलेली एक सुंदर मुलगी त्याला चांगलीच भावली. तिला डायरेक्ट जावून  “डॉल, यू हैव ए ब्यूटीफुल ऐस.” म्हणून आला. योगायोगाने नेमकी ती तिथला गुंड फ्रांक गुलसियोची बहिण निघाली. तिथेच बेदम हाणामारी झाली न् यातच त्याच्या चेहऱ्यावर जखम झाली. ही जखम भरण्यासाठी जवळपास ३० टाके पडले. त्यामुळे चेहरा खूपच विद्रुप दिसू लागला.

पण पुढे डॉन झाल्यावर तो जिवंत असेपर्यंत एकाची ही ‘हे टाके कसे पडले’ असं विचारण्याची हिंमत झाली नाही.

यानंतर त्याचे कुटुंबीय ब्रुकलीनमध्ये स्थायिक झाले. इथे ही तो एका क्लबच्या बाहेर सिक्युरीटी गार्ड म्हणून कामाला लागला. इथेच त्याला आणखी एक आयरीश मुलगी आवडली. दोघांची चांगली मैत्री होवून प्रेमातही पडले. त्यावेळी दोघांचही वय १७-१८ असचं होत. पण तरीही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

काही तरी काम करायच म्हणून १९२० – २१ च्या आसपास कपोन त्याची बायको आणि भाऊ फ्रैंक शिकागोला आला. आणि आल्या आल्या पहिल्यांदा भेट घेतली ती जॉनी टोरियोची.

त्याच्या ओळखीने कपोनला लेवी मध्ये एका वेश्या व्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी पुन्हा गार्ड म्हणूनच काम मिळाला. पण इथूनच त्याचा गुन्हेगारी विश्वातला प्रवास सुरु झाला.

गुरु सोबतची पार्टनरशिप

कपोनची कामातील गती बघून त्याला प्रमोशन मिळू लागले. १९२२ च्या शिकागो पेपरमध्ये पहिल्यांदा त्याच नाव समोर आलं, जेव्हा तो गाडी चावलताना खिडकीतुन बंदुक बाहेर काढून आणि पोलिसांचा नकली बैज लावून गाडी चालवत होता. सिगरेटची पाकिट चोरण्यासारख्या लहान गुन्ह्यांपासून झालेली सुरुवात त्याला आणि त्याच्या भावाला पुढील अवघ्या दोन वर्षात गुरु जॉनी टोरियोसोबतच्या पार्टनरशीप पर्यंत घेवून आली.

१९२३ मध्ये शिकागोच्या मेयरपदी विल्यम अमेट डेवर यांच्या निवडीनंतर त्यांनी शिकागोतील गँगस्टरवर दबाव आणून शहर सोडण्यास भाग पाडले. त्यामुळे कपोनने सिसिरोमध्ये जावून आपला कारभार नव्याने सुरु करण्याचा प्रयत्न केला.

पण त्यापुर्वी तिथला डॉन ओ’डोनेल आणि कपोन यांच्यात झालेल्या वर्चस्ववादामध्ये दोन्हीकडील जवळपास २०० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात कुविख्यात हैंगिंग प्रोसिक्यूटर” बिल मैकस्विगिंस याचाही समावेश होता.

१९२४ मध्ये शिकागोमध्ये पुन्हा मेयरपदासाठी निवडणूका जाहिर झाल्या.

या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट निवडणूका ओळखल्या जातात. याच निवडणूकीत कपोनने आपलाही उमेदवार उभा केला होता. मतदारांना खुलेआम धमकावणे, मारणे, अपहरण करणे असे प्रकार चालू झाले. यातुन त्याने आपला उमेदवार बहुमताने निवडून आणला. पण निवडून आल्यावर चारच महिन्यात तो पलटला.

या मेयरनी एका सभेत सांगितले की, थोड्याच दिवसात कपोन आणि त्याच्या साथीदारांना मी या शहरातुन हद्दपार करणार आहे. कपोनने दुसऱ्याच दिवशी मेयरची भेट घेवून टाऊन हॉलच्या पायरीवरच बेदम मारहाण केली.

सिसिरोमधील परिस्थिती इतकी बिकट झाली होती की शिकागो पोलिसांनी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक दिवस समन्स पाठविला. पण यावेळी झालेल्या चकमकीत कपोनच्या भावाचा मृत्यु झाला. कपोनसाठी त्यावर्षीचा सर्वात हा मोठा धक्का होता. या घटनेनंतर सिसिरोवर राज्य करणे ही त्याची जिद्द झाली होती. पुढे त्याने स्वतःसाठी देखील बॉडीगार्ड ठेवले.

सर्वेसर्वा कपोन

१९२५ साली नॉर्थ साईड गँगच्या हल्ल्यात कपोनचा गुरु आणि जोडीदार टोरियो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर आपला सगळा कारभार कपोनवर सोपवून तो इटलीला माघारी परतला. टोरियोच्या सर्व उद्योगांचा सर्वेसर्वा झाला आणि त्याची प्रगती सुरु झाली.

पुढच्या अवघ्या चार वर्षात वयाच्या २६ व्या वर्षी तो शिकागोचा नवा डॉन बनला. त्याने सिसिरोमध्ये ही दारुची दुकान, वेश्या व्यवसाय सुरु केला. यामुळे त्याचा वार्षिक महसूल वाढून १०० कोटींच्या घरात गेला.

कपोनने शहरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःबद्दल एक भीती निर्माण केलेली होती. काही दिवसांनी त्याने विचारपूर्वक अन्नछत्र चालू केली. ज्यामुळे गरिबांना मोफत अन्न पुरवले जाऊ शकेल. त्याच्या या कामामुळे त्याला लोक रोबिंनहुड म्हणून ओळखू लागले. तो सर्वसामान्यांची काम चुटकीसरशी करून देत असे. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरती विश्वास वाढत चालला होता.

याकाळात कपोनने ज्या स्पीडने व्यवसाय वाढवला त्याच स्पीडने शत्रु सुद्धा वाढवले. त्यामुळे हाईमी वीस आणि बग्स मोरान या नॉर्थ साईडर्स गँगमधील टोळक्यांनी त्याच्यावर अनेकदा हल्ले केले. २० सप्टेंबर १९२६ मध्ये हौथर्न हॉटेलमध्ये जेवत असताना अंदाधुंद फायरिंग केले. त्यावेळी या हल्ल्यात देखील तो वाचला.

अमेरिकेतील डॉनची पहिली बुलेट प्रुफ कार 

यानंतर त्याने आपल्यासाठी नवी अलिशान लिमोझिन खरेदी केली. सोबतच मध्ये बुलेटप्रुफ काचा, रन फ्लॅट टायर आणि पोलिसांचा सायरन लावून घेतला. त्याचे सात अंगरक्षक देखील सोबत असायचे.

१४ फेब्रुवारीचा नरसंहार

पुढील चार वर्षांमध्ये कपोनचा टर्नओव्हर ७०० कोटींच्या घरात गेला. १४ फेब्रुवारी १९२९ ला कपोनने आपल्या नकली पोलिसांना सोबत घेवून एका गोडावूनवर छापा मारला. इथे उपस्थित असलेल्या ७ जणांना त्याने हात मागे बांधून भिंतीकडे तोंड करुन उभे राहण्यास सांगितले. मात्र त्याच्या मनात कुठून विचार आला आणि या सगळ्यांना त्याने मशिन गणने अक्षरशः छिन्नविछीन्न पद्धतीने मारुन टाकले.

प्रत्येकाला कमीत कमी १६-१७ गोळ्या घालण्यात आल्या.

या नरसंहारानंतर त्याची ताकद वाढतच गेली. उद्योगपती, राजकारणी हे देखील घाबरुन राहू लागले. आपल्या गँगला त्याने शिकागोच्या बाहेरही नेले. मात्र तो तपास यंत्रणेंच्या रडारवर आला होता. १९२९ मध्ये ब्यूरोचे प्रोहिबिशन एजेंट एलियट नेस यांनी प्रोहिबिशन उल्लंघनाच्या आरोपाखाली कपोनच्या व्यवसायांची तपासणी सुरु केली.

या तपासात १९३१ मध्ये टॅक्स न भरल्याने तो दोषी आढळून आला आणि कपोनला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला मोठ्या दंडासह ११ वर्ष शिक्षा सुनावली.

आणि राष्ट्राध्यक्षांची गाडी….

१९३२ मध्ये ट्रेझरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची सगळी संपत्ती आणि अलिशान लिमोझिन जप्त केली. १९३३ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी फ्रँकलिन डी. रुझवेल्ट हे आले. ते एकदा एका समारोहासाठी या ट्रेझरी विभागात आले होते. त्यांनी ही गाडी पाहिल्यानंतर त्यांना देखील ती अलिशान गाडी वापरण्याचा मोह आवरला नाही.

पुढे सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि सुरक्षेचे परिक्षण करुन ही गाडी रुझवेल्ट यांची खाजगी गाडी म्हणून ताफ्यात दाखल झाली. विशेष म्हणजे रुझवेल्ट हे त्यावेळी पॅरलाईज होवून व्हिलचेअरवर होते.

जेलमध्येच जडला आजार

१९३२ मध्ये जेलमध्ये गेल्यावर पुढील अकरा वर्षात त्याला सुरक्षच्या कारणास्तव फेडरल जेल, लिंकन हाइट्स जेल, एल्काट्राज़ जेल, फेडरल करेक्शनल इंस्टीट्यूशन अशा विविध जेलमध्ये ठेवण्यात आले. याकाळातच त्याला सिफीलीस नामक दुर्धर आजाराने गाठले. आपल्या आयुष्यातील अंतिम वर्ष त्याने जेलच्या आयुष्यातच व्यतित केली. १९३९ मध्ये त्याला तब्येतीच्या कारणामुळे आणि उपचारासाठी पॅरोलवर सोडून देण्यात आले.

पण बाहेर आल्यावरही तब्येतीमध्ये विशेष सुधारणा झाली नाही. याच आजारात वयाच्या ४८ व्या वर्षी २५ जानेवारी १९४७ रोजी त्याचा मृत्यु झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.