टॉलिवूडचं सगळं मार्केट या दोन फॅमिलीच्या बापजाद्यांचं आहे…

बॉलिवूडमध्ये काम मिळवायचं असेल तर तुमच्या ओळखी असणं गरजेचं असतं. ढीगभर टॅलेंट असेल तरी काय फायदा नाही कारण मुंबईच्या आरामनगरला गेल्यावर हीच टॅलेंटेड लेकरं बारीक तोंड करून ऑडिशन देताना दिसतात आणि मग आपल्याला जाणवतं की, बॉलिवूडमध्ये काम करायचं असेल तर वशिला पण महत्वाचा आहे. जितका तुमच्यात दम असेल तितका वेळ तुम्ही लढू शकता.

मग यावरूनच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे घराणेशाहीचा. आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर यांना लोकांनी काय भयानक प्रमाणात ट्रोल केलं होतं हे आपण याची देही याचि डोळा पाहिलं आहे. नेपोटिझम, बॉयकॉट असे हॅशटॅग त्यावेळी जोरदार ट्रेंड झाले होते.

कपूर, खान या मंडळींवर लोकांनी जे काही तोंडसुख घेतलं होतं ते पाहून अनेकांचे धाबे दणाणले होते आणि त्याचमुळं अनेकांना मनातला संताप व्यक्त करता आला होता. 

आपण आता इकडं खान, कपूर यांच्या बॉलिवूडवर असलेल्या मक्तेदारीवरून बोलतो पण एकदा आपल्या सध्याच्या आवडत्या म्हणजे साऊथ इंडियन सिनेमावर नजर टाकली… तर कळेल की या लोकांनी इतर कोणाला त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये घुसुच दिलेलं नाही.

फक्त दोनच कुटुंबांनी सगळं तेलगू सिनेविश्व आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळं टॉलिवूड बॉलिवूडवर फक्त सिनेमातच नाही तर घराणेशाहीच्या बाबतीतही भारी पडतं.

तर आपण बेसिक पासून सूरवात करूया. या घराण्यानी त्यांची इंडस्ट्री खऱ्या अर्थानं मोठी केली आणि आज घडीला साऊथ इंडियन सिनेमा काय उंचीवर पोहचलेला आहे ते आपण पाहतोच आहोत. या दोन फॅमिलीमुळे तेलगू सिनेमा आज टॉलिवूड इंडस्ट्री म्हणून ओळखला जातो.

तर इथं असलेल्या मेन फॅमिली म्हणजे, अल्लू फॅमिली आणि चिरंजीवी फॅमिली.

पहिली आहे चिरंजीवी फॅमिली. माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं त्याचप्रमाणे चिरंजीवी फॅमिली ही मेगास्टार चिरंजीवी पासून सुरू होते. चिरंजीवी, नागेंद्र बाबू आणि पवन कल्याण असे हे तिघे भाऊ आहेत. मोठा भाऊ म्हणून चिरंजीवीपासून ही फॅमिली सिनेइंडस्ट्रीत आली. हे आधी कोनिडेला म्हणून ओळखले जायचे.

पुढे चिरंजीवीला तीन मुलं झाली ती म्हणजे सुश्मिता, श्रिजा आणि राम चरण. राम चरण हा काय लेव्हलचा हिरो आहे हे काय सांगायला नकोच. तेलगू सुपरस्टार म्हणून त्याची ओळख आहे. नागेंद्र बाबुला २ मुलं आहेत, वरुण तेज आणि निहारिका कोनीडेला. वरुण आणि नीहारीका दोघेही तेलगू सिनेमांमध्ये काम करतात. पवन कल्याणबद्दल आपण काय बोलणार. टॉलिवूडचा पॉवर स्टार म्हणून पवन कल्याण ओळखला जातो.

दुसरी फॅमिली आहे ती म्हणजे अल्लू फॅमिली.

चिरंजीवीची बायको सुरेखा ही अल्लू रामलिंगा याची मुलगी आहे. आता तुम्ही म्हणाल की भिडू, आता ह्यो अल्लू रामलिंगा कोण आहे ? तर अल्लू रामलिंगा हे तेलगू सिनेमातले जुने हिरो होते आणि सोबतच स्वातंत्र्यसैनिकही होते. सुरेखा या अल्लू अरविंद यांची बहीण आहेत.

अल्लू अरविंद यांना कोण ओळखत नाही. त्यांनी बॉलिवूडला पहिला शंभर कोटींचा सिनेमा दिला तो म्हणजे गजनी. बॉलिवूड मधले मोठे प्रोड्युसर म्हणून अल्लू अरविंद यांचा दबदबा आहे. त्यांना तीन मुलं ती म्हणजे अल्लू बॉबी, अल्लू अर्जुन आणि अल्लू शिरीष.

या तिघांपैकी अल्लू अर्जुन आणि अल्लू शिरीष हे अभिनेते आहेत. सध्याचा पुष्पा असेल किंवा एक काळ गाजवणारा आर्या… 

अल्लू अर्जुन थिएटरवर आला की बॉक्स ऑफिसवर राज्य करतो.

चिरंजीवी आणि अल्लू अरविंद हे त्यांच्या फॅमिलीमुळे एकदम जवळचे नातलग आहेत. आपल्याला राम चरण आणि अल्लू अर्जुन एकदम भाऊ भाऊ वाटतात पण ते खरंच भाऊ आहेत.

हे सगळे एकमेकांचे भावंडं आहेत आणि त्यांनी आज त्यांची इंडस्ट्री खऱ्या अर्थाने मोठी केली आहे. आजही टॉलिवूडमध्ये आलेला सिनेमा चालला की पैसे मिळतात ते याच फॅमिलीला, कारण सगळं मार्केट त्यांचंच आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.