त्याचा लंडनवरून एक कॉल यायचा आणि इकडं कराची पेटायची
महिना झालं इम्रान खानचं सरकार पडणार अशा वावड्या उठत होत्या. आता मात्र अविश्वास ठराव आणल्यानंतर आणि एक एक सहयोगी पक्ष सोडून जात असल्यानं इम्रान खानला जवळपास सत्ता सोडून जावंच लागणार असं आता फिक्स झालं आहे.
त्यात पाकिस्तानच्या राजकारणातील केंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MQM नेही पाठिंबा काढून घेतल्याने इम्रानला सत्ता सोडावीच लागेल असं म्हटलं जात आहे.
हे झालं करंट अफेअर. पण ही जी MQM म्हणजेच मुत्ताहिदा कौमी मूवमेंट चांगलीच इंटरेस्टिंग आहेत. नुसत्या कराची शहरातल्या ताकदीवर ही पार्टी किंगमेकर आहे. सध्या पार्टीचा कार्यक्रम तसा गंडला आहे पण एक काळ असा होता जेव्हा या पार्टीचा सिंधवर एकछत्री दरारा होता. आणि या दराऱ्यामागचं नाव होतं आग्र्याहून कराचीत स्थायिक झालेला अल्ताफ हुसेन.
या अल्ताफ हुसेनने कराचीवर जवळजवळ ३६ वर्षे राज्य केले आणि त्यापैकी २२ वर्षे तो लंडनमध्ये होता.
लंडनहून हुसेनचा एक फोन कॉल संपूर्ण कराची बंद असा त्याचा पॅटर्न होता. तो आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधायचा. आणि त्याचा हा मॅसेज पाकिस्तानातील मीडियाने दाखवणं कंपलसरी असायचं,आणि ज्यांनी केलं नाही त्यांचा MQM समर्थकांकडून खळखट्याकचा कार्यक्रम ठरलेला असायचा.
हुसेन हा पाकिस्तानातील उर्दू भाषिक अल्पसंख्याक मुहाजिरांचे प्रतिनिधी करण्यासाठी राजकारणात आला होता.
मुहाजिर या शब्दाचा अर्थ होते “स्थलांतरित”. उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीतील मुस्लिम जे फाळणीनंतर पाकिस्तानात गेले त्यांना मुहाजिर म्हटलं जातं. आज सिंध प्रांतात त्यांची मोठी संख्या आहे.
१९४७ मध्ये पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या फक्त 8 टक्के मुहाजिर होते, परंतु ते त्यांनी सत्तेचा मोठा वाट बळकवला होता. तथापि, पंजाबी भांडवलदार वर्गाचा उदय आणि पश्तून आणि पंजाबींच्या राजकीय वर्चस्व यांमुळे मुहाजिरांना उपेक्षित केले गेले. आणि याच परिस्थिती मुहाजिर लोकांना सत्तेत पुन्हा वाट मिळवून देण्यासाठी अल्ताफचं नेतृत्व उदयास आलं होतं.
हुसेन एक विद्यार्थी नेता म्हणून उदयास आला आणि १९७८ मध्ये कराची विद्यापीठात ऑल-पाकिस्तान मुहाजिर स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (APMSO) ची त्याने सह-स्थापना केली.
१९८४ मध्ये मग याच युनिअनचा त्यांनी एक पक्ष काढला MQM ज्याला त्यावेळी मुहाजिर कौमी मूव्हमेंट म्हटलं जायचं. MQM च्या विचारसरणीचा एक मुख्य पार्ट होता तो म्हणजे नेत्याशी १००% निष्ठा . अल्ताफ हुसेनवर टीका करणं पाप होतं. ते निंदा करण्यासारखे आहे, दोषी मृत्यूस पात्र आहे असा पक्षाच्या विचारसरणीचा भाग होता.
MQM च्या सदस्यांना जी “निष्ठेची शपथ” घ्यायला लागायची. त्यात लिहलेलं असायचं..
“मी माझ्या आईची शपथ घेतो की MQM किंवा अल्ताफ हुसैन यांच्या विरोधात कोणतेही कट, किंवा त्यांच्यासाठी हानिकारक कोणतेही कृत्य माझ्या माहितीत आले, तर मी अल्ताफ हुसेनला त्वरित कळवीन, जरी कट रचणारा माझा भाऊ असला तरी, बहीण, आई, वडील, कोणताही नातेवाईक किंवा मित्र.”
MQM हे मुहाजिरांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळविण्याचे व्यासपीठ बनले.
१९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत MQM ने हत्यारं पण जमा करण्यास सुरवात केली होती.
याची सुरवात झाली १९८५ मध्ये जेव्हा बुशरा झैदी या तरुण मुहाजिर विद्यार्थ्याची हत्या झाली आणि मुहाजिर-पश्तून यांच्यात दंगली उसळल्या.
त्याचवेळी सोव्हिएत-अफगाण युद्ध सुरू होते आणि अफगाण मुजाहिदीनसाठी अमेरिकन शस्त्रे कराचीमधून जात होती, ज्यामुळे एमक्यूएमला हत्यारं मिळवणं सोपं जात होतं. तरुणांची उपस्थिती आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रीकरणामुळे MQM आता एक जबरदस्त फोर्स झालं होतं. MQMने कराचीला “मुहाजिर सुबा” म्हणून घोषित करण्याची मागणी केली आणि त्यांच्या मागण्यांसाठी हिंसाचाराचा वापर करण्यात आला.
हुसेनवर राजकीय हत्येचे आदेश दिल्याचा आणि शेकडो हत्येसाठी जबाबदार असलेली अतिरेकी शाखा चालवल्याचा आरोप देखील झाला होता. MQM शी वाकडं घेणाऱ्यांचे मुडदे छिन्नविच्छन्न अवस्थेत पोत्यात बी हारून रस्त्यावर फेकून देणे हें MQM बदला घेण्याच्या पद्धतीने कराचीत या पक्षाची दहशत पसरली होती.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, MQM कराची आणि हैदराबाद शहरांच्या निवडणुका जिंकण्यात यशस्वी झाला आणि सिंध विधानसभेतही जागा मिळवल्या.
१९९० पर्यंत, हुसेन हा कराचीचा निर्विवाद नेता आणि डॉन म्हणूनही पुढे आला होता.
मात्र हुसेनच्या या दहशतीची आता पाक आर्मीने दाखल घेतली होती आणि त्याचा लवकरच गेम करण्याची तयारी आर्मीने केली होती. मग याची कुणकुण लागताच त्याने कराची सोडून लंडनची वाट धरली ती कायमचीच.
तिथून त्यानं मग पक्षाची सूत्र हलवायला सुरवात केली. २२ वर्षे तिथूनच त्याने आपला काराचीवर कब्जा ठेवला. पण १९९० च्या दशकात हुसेन आणि MQM साठी ते फारसे आनंददायी दिवस नव्हते.
पाकिस्तानी आर्मीच्या मोठ्या कारवाईनंतर, १९९२ ते १९९९ दरम्यान १०,००० हून अधिक MQM कार्यकर्ते मारले गेले.
हुसेन यांचे नशीबपुन्हा पालटले जेव्हा त्यांच्या पक्षाने १९९९ मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. MQM पुढे सरकारमध्ये सामील पण झाला आणि त्यांना बंदरे आणि जहाजबांधणी हे मंत्रालय मिळवलं जे कराचीच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं.
मात्र २००७ नंतर त्याच्या सत्तेला सुरुंग लागला. परवेझ मुशर्रफ याच्याबरोबर सत्तेत राहून त्याने त्यांच्या अनेक अत्याचारी धोरणांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे त्याची लोकप्रियता कमी झाली.
२०१० मध्ये हुसैन याच्यासोबत एमक्यूएमची स्थापना करणाऱ्या इम्रान फारुखवर लंडनमध्ये वार करण्यात आले होते. त्यानंतरच्या तपासात हुसेन हा प्रमुख संशयित म्हणून समोर आला. फारुख यांनी MQM सोडली होती आणि हुसेन यांच्याशी संभाव्य टक्कर देणारा नवीन पक्ष सुरू करणार अशी शक्यता होती. त्यानंतर त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला तो कायमचाच.
यामुळे त्याचं राजकारणातून लक्ष कमी झालं .
मधल्या काळात BBC सारख्या एजन्सीने त्याला भारताकडून फंडिंग होत असल्याचे आणि भारताच्या RAW शी त्याचे संबंध असल्याचे वृत्त छापले आणि त्याची विषासार्ह्यता अजूनच कमी झाली.
त्यात MQM पक्षातही अनेक फूट पडल्या. MQM ची संपूर्ण कराची-स्थित दुसऱ्या फळीतील नेते हुसेनपासून दुरावले. २०१८ च्या निवडणुकीत पाकिस्तान सरझामीन पार्टी (PSP) नावाच्या फुटलेल्या गटाने स्वतःचे उमेदवार उभे केले होते. त्याचे लष्कराशी असलेले संबंध स्पष्ट दिसत होते. पाकिस्तान सरझामीन पार्टी ने आता स्वतःला MQM-P म्हणवून घ्यायला सुरवात केली. या MQM ने फक्त सात जागा जिंकल्या होत्या.
आता सैरभैर झालेला हुसेन पाकिस्तानच्या विरोधात सरळ स्टेटमेंट देत सुटला. त्यानं कधी पाकिस्तानला जागचा कॅन्सर म्हटलं तर कधी भारताकडे पाकिस्तानच्या ताब्यातून सिंध आझाद करण्याची मागणी केली. मध्यंतरी भारताकडे आश्रय मागतल्यामुळे पण तो चर्चेत आला होता. बाकी ज्याला विचारल्याशिवाय कराचीत पान पण हालत नव्हतं त्या अल्ताफ हुसेन आज लोकांच्या चेष्टेचा विषय झाला आहे.
हे ही वाच भिडू :
- इकबाल बानो यांनी ‘हम देखेंगे’ गात पाकिस्तानी लष्करशहाच्या आदेशांना पायाखाली तुडवलं होतं…
- पाकिस्तानात नेहमीच लष्कर लोकशाही सरकारचा गेम करण्याच्या तयारीत असतं
- भारत पाकिस्तान मॅचमुळं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची चर्चा क्रिकेटच्या भाषेत झाली होती…