IAS अधिकाऱ्याच्या खूनासाठी जन्मठेप भोगत असलेल्या बाहुबलीच्या मुलीचं लग्न गाजतंय…

जवळपास सगळ्या माध्यमांमध्ये एक नाव दिसतंय, ते म्हणजे आनंद मोहन. नाव नुसतंच दिसत नाहीये तर, त्यामागचं कारण सुद्धा माध्यमांमध्ये आहे. ते कारण म्हणजे आनंद मोहनच्या मुलीचं सुरभीचं लग्न. आता लग्न तर रोज १०० होत असतील की! त्यातल्या त्यात हे लग्न होतंय ते बिहारमध्ये. तरीही या लग्नाची चर्चा आपल्याकडे का होतेय? बरं अगदी सेलिब्रेटीजच्या लग्नाबद्दल सुद्धा माध्यमांमध्ये इतकी चर्चा शक्यतोच दिसते. मग या लग्नात असं काय विशेष आहे?

या लग्नात काही विशेष नाहीये. विशेष आहे तो या लग्नाचा मेन्यू.
माध्यमांमध्ये बातम्या आहेत त्या या लग्नातल्या पंगतीबद्दल. ही पंगत काय आहे? तर, या पंगतीला १०० पेक्षा जास्त पदार्थ असणार आहेत. यात व्हेज-नॉनव्हेज अशा दोन्ही पदार्थांची सोय आहे. फक्त नॉन-व्हेजचा विचार केला तरी, एकूण ५० क्विंटल नॉन व्हेज बनवलं जाणार आहे. २५ क्विंटल मटण, १५ क्विंटल चिकन आणि १० क्विंटल मासे अशी ही व्यवस्था असणार आहे.

ही इतकी तगडी तयारी केली असली तरी, आनंद मोहन यांचा जावई मात्र शाकाहारी आहे.
आता जावयाचा मान मोडून कसं चालेल? म्हणून शाकाहारी माणसांसाठीही विशेष सोय करण्यात आलीये. जवळपास ३ लाख रसगुल्ल्यांची सोय आहे. तर, या शाही लग्नसोहळ्यासाठी तब्बल २०,००० जणांची सोय करता येईल अशी व्यवस्था करण्यात आलीये.

ही सगळी झाली सुरभीच्या लग्नाची एक वर-वरची माहिती… या शिवाय या शाही लग्न सोहळ्यात आणखी काय काय असेल हे सांगता येणं कठीणच आहे. पण ज्यांच्या लेकीचा विवाह सोहळा म्हणून ही जय्यत तयारी केली जातीये ते आनंद मोहन कोण आहेत? हे मात्र सांगितलं जाऊ शकतं.

१९५४ साली बिहार मध्ये आनंद मोहन सिंग तोमर यांचा जन्म झालाय. राम बहादूर सिंग तोमर हे स्वातंत्र्य सैनिक आनंद मोहन यांचे आजोबा.

वयाच्या २० व्या वर्षी राजकारणाशी आनंद मोहन यांचा संबंध आला. आता राजकारणाशी थेट संबंध आला असंही म्हणता येत नाही. कारण , १९७४ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात ते सहभागी झाले होते. अगदी आणीबाणीच्या काळात त्यांना तब्बल २ वर्षे तुरूंगातही राहावं लागलं होतं.

आजोबांप्रमाणेच स्वातंत्र्य सैनिक असलेले आणि प्रखर समाजवादी नेता परमेश्वर कुंवर हे आनंद मोहन यांचे राजकीय गुरू असल्याचं बोललं जातं. आपल्या राज्यातलं राजकारण हे जात आणि ताकदीभोवती फिरतं हे लक्षात यायला त्यांना काही फार वेळ लागला नाही आणि त्यांनी स्वत:ची ओळख ही राजपूत समाजाचा नेता अशी बनवली आणि राजकारणाला सुरूवात केली.

आनंद मोहन यांची राजकारणातली पहिली चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे, १९७८ साली त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं भाषण सुरू असताना आनंद मोहन यांनी काळे झेंडे दाखवले होते.

१९८० साली मग त्यांनी एका समाजवादी क्रांती सेना या संघटनेची स्थापना केली. मुळातच ही संघटना जातीयवादी असल्यामुळे आणि आक्रमक असल्यामुळे मग त्यांचं नाव हे गुंडांच्या यादीत जोडलं गेलं आणि त्यांच्या नावाची दहशत पसरू लागली. या काळात त्यांनी निवडणूकही लढवून पाहिली पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

राजकारणात खऱ्या अर्थाने एन्ट्री केली ती १९९० मध्ये.

१९९० मध्ये जनता दलकडून त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं. या तिकीटावर निवडणूक लढवताना त्यांचा विजयही झाला. आता ते आमदार झाले असले तरी, त्याकाळातली माध्यमांधली कात्रणं बघितली तर हे लक्षात येतं की, आमदार झाल्यानंतरही त्यांची स्वत:ची अशी एक टोळी होती.

ही टोळी काय करायची? तर, आरक्षणाला समर्थन करत असलेल्या व्यक्तींवर हल्ला करायची.

ते आमदार असताना एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये २७ टक्के आरक्षणाचा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला जनत दलतर्फे पाठिंबा देण्यात आला. आता मुळातच आरक्षणाविरोधी काम करणाऱ्या आनंद मोहन यांना हे पटण्याजोगं नव्हतं. त्यामुळे, त्यांनी १९९३ साली जनता दल सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी स्वत:चा नवा पक्ष सुरू केला.

१९९३ साली त्यांनी बिहार पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना केली. या पक्षाकडून १९९४ साली आनंद मोहन यांच्या पत्नी लवली आनंद यांनी वैशाली लोकसभा मतदार संघातून पोटनिवडणूक लढवली आणि विजयसुद्धा मिळवला.

एक वेळ अशी होती की, लोकांमध्ये या बिहार पीपल्स पार्टीची क्रेझ वाढली होती. अगदी भविष्यातले मुख्यमंत्री म्हणून लोक आनंद मोहन यांच्याकडे बघत होते. १९९५ सालच्या निवडणुकीत नीतीश कुमारांच्या समता पार्टीपेक्षाही आनंद मोहन यांच्या पक्षाची कामगिरी होती. पण तीन वेगवेगळ्या मतदार संघातून निवडणूक लढवलेले आनंद मोहन मात्र पराभूत झाले.

त्यानंतर १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ते तुरूंगात होते. तरीही त्यांनी निवडणूक लढवली आणि शिवहर लोकसभा मतदार संघातून ते विजयी झाले.

राजकारणात यशस्वी वाटचाल करत असताना १९९९ साली त्यांचा एक निर्णय फसला, १९९९ मध्ये त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. तिथे अपयश आल्यावर मग त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, पण हे सगळं गंडलं. त्यांच्या राजकीय आयुष्यात १९९५ सारखा सुवर्णकाळ पुन्हा आला नाही.

सध्या अटकेत आहेत आनंद मोहन.

१९९४  साली झालेल्या एका घटनेचा निकाल २००७ साली देण्यात आला. घटना होती दलित आयएएस ऑफिसर जी कृष्णैया यांच्या हत्येची. खरंतर त्यांची हत्या ही जमावाकडून करण्यात आली होती. या जमावाला भडकावल्याचे आरोप मात्र आनंद मोहन यांच्यावर होते.

याच प्रकरणात २००७ साली हायकोर्टाने निकाल देत आनंद मोहन यांना दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा दिली. काही काळाने ही फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

आताही आनंद मोहन हे याच गुन्ह्यांतर्गत तुरूंगात आपली शिक्षा भोगतायत. सध्या मात्र ते १५ दिवसांच्या पेरोलवर तुरूंगातून बाहेर आलेत आणि आपल्या लेकीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडताना दिसतायत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.