शिकलेली पिढी शेतीत आली अन् १० लाख शेतकऱ्यांचा समुह उभा राहिला…

आज आम्ही काही एका कार्यकर्त्याची ओळख करून देतोय…

हा कार्यकर्ता कुण्या ‘साहेबांचा’ कार्यकर्ता नाही बरं का, अहो कार्यकर्ते काय फक्त राजकारणातच असतात असं कोण म्हणलंय? शेतीमधील कार्यकर्ता कधी ऐकला का?

‘होय आम्ही शेतकरी’ म्हणत शेतीच्या क्षेत्रात दमदारपणे पाउल ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या भन्नाट टीमची आज आम्ही ओळख करून देणार आहोत.

खरं तर हि टीम आहे डॉक्टर शेतकऱ्यांची.

शिकलेले,अभ्यासू, संशोधन केलेले प्रगतशील डॉक्टर शेतकरी. ‘होय आम्ही शेतकरी’ हा समूह महाराष्ट्रात अलीकडे शेतकऱ्यांसाठी खूप मदतीचा ठरतोय. महाराष्ट्रातील प्रमुख पिके आणि त्याची लागवडीपासून ते बाजारात विकण्यापर्यंतच्या प्रक्रियेची इत्यंभूत माहिती या शेतकरी मित्रांकडे मिळते.

या ‘होय आम्ही शेतकरी’ चे मुख्य संस्थापक डॉ. अंकुश चोरमुले आणि अमोल पाटील हे उच्च शिक्षित प्रगतशील शेतकरी आहेत.

डॉ.अंकुश हे कीटकशास्त्रात पीएचडी असून उस उत्पादन शेतकरी आहेत. तर अमोल पाटील यांनी व्यवस्थापन पदवीत्तर आणि वकिली शिक्षण घेतले आहे. सातत्त्याने एकरी १०० टन उस उत्पादन ते घेत असतात. तर अंकुश यांच्याबद्दल एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये मका पिकात लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची सर्वप्रथम नोंद केली आहे. सध्या ते लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे करावे या बाबत संशोधन करीत आहेत.

तसे ते मुळचे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील आहेत. साधारण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले. वडील निरक्षर. १० एकर शेती राखत कुटुंब चालयचे. कुटुंबातील अंकुश यांची आत्या शिक्षित असल्यामुळे शिक्षणाविषयीचे महत्व कुटुंबाला पटले आणि मुलांना चांगले शिक्षण मिळाले.

१२वी ला सायन्स घेऊन अंकुश पास झाला आणि आता पुढे काय करायचे म्हणून मोठा प्रश्न पडला. त्यावेळेला इंजिनिअरच वारं जोरात असतांना अंकुशने मात्र वेगळा मार्ग निवडायचं ठरवलं, त्याला पशुचिकित्सक किंवा अग्रीकल्चर फिल्ड मध्ये जायचं होतं.

वेटरनरीला चांगला स्कोप असून ते क्षेत्र न निवडण्याचे कारण म्हणजे, जनावरांचा डॉक्टर म्हणलं कि, घरच्यांची ते मान्य करण्याची मानसिकता दिसत नव्हती म्हणून शेवटी बीएस्सी ॲग्रीला, कराड ला ॲडमिशन घेतले. त्यानंतर पोस्ट ग्रजुएशन कोल्हापूरला पूर्ण करून राहुरीतून पीएचडी पूर्ण केली. ‘कृषी कीटकशास्त्र’ या विषयात. राहुरीतील नानासाहेब म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली पिकांवर पडणाऱ्या किडीचे व्यवस्थापन कसं करायचं या विषयावर पीएचडी पूर्ण केली.

सोबतच अंकुशने शेती विषयक लेखन करायला सुरु केले.

आणि नेमकच what’s app आणि facebook लोकप्रियता वाढायला लागली, सोशल मिडीयावर शाळेचे, कॉलेजस चे ग्रुप्स बनायला लागले आणि अंकुश त्याचे लेख सर्वत्र वाचनासाठी पाठवत राहायचा. त्यातूनच आत्मविश्वास आणि अभ्यास दोन्ही वाढायला लागला. यातूनच त्याला कल्पना सुचली कि,

असाच एखादा शेतकऱ्यांचा ग्रुप बनवावा जेणेकरून योग्य ती माहिती, योग्य आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल.

अशापद्धतीने २०१३ ला ‘होय मी शेतकरी’ हा फेसबूक ग्रुप बनवण्यात आला. सुरुवातीला गावाच्या, तालुकाच्या आजूबाजूच्या लोकांना ग्रुप मध्ये ऍड करण्यात आले. त्यावर सांगली मधील मुख्य पीक हळद ऊस यावर चर्चा व्हायची. पीक उत्पादनात येणाऱ्या अडचणी, पीकवाढ, कीटकनाशके हा मुख्यत्वे विषय चर्चेचा असायचा.

सुरुवातीला अंकुश आणि अमोल पाटील यांनी मिळून २०१४ मध्ये होय आम्ही शेतकरी या नावाने पेज सुरु केले. त्या पेजच्या माध्यमातून रोज शेती विषयावर बोलले लिहिले जात होते. कधी लिखित माहिती तर कधी इतर संशोधकांनी दिलेली, पुस्तकातील माहिती, बातमीपत्रात आलेले लेख असे सर्व मिळून त्यावर पब्लिश केले जायचे. असे करत हळूहळू शेतकरी वर्ग सोशल मीडियावर या पेज ला पसंती देऊ लागले.

शिवाय समूहातील सदस्यांना शेतीविषयक पीएचडी केल्याचा उत्तम फायदा ही माहिती देताना व्हायचा. सोबतची पीएचडी करणारी सहकारी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ इत्यादींना या ग्रुप ला जोडून घेतले. त्यांच्या माहितीचा अभ्यासाचा उपयोग शेतकऱ्यांना होत गेला. तसेच पिकांच्या संबंधित फोटोज ही या पेज द्वारे शेअर करायला लागले.

सोबतच ऍग्रोवनचे लेख, इतर काही माहितीपर लिंक, तसेच शेती विषयक प्रशिक्षण कृषी विषयक प्रदर्शन इत्यादी पेज वर पोस्ट केल्या जात असायच्या.

‘होय आम्ही शेतकरी’ समुहाचा हा ग्रुप सोडून इतरही काही ग्रुप सोशल मीडियावर ॲक्टिव आहेत. उस उत्पादन विषयचा ग्रुपला तर जवळपास साडेचार लाख सदस्य आहेत. त्यावर संबंधित उत्पादनाच्या पन्नास ते शंभर पोस्ट रोज असतात. आठवड्यातून दोन वेळेस या समूहाचे फेसबुक लाईव्ह केले जाते. त्यावर फक्त उत्पादनाविषयी चे चर्चासत्र आयोजित केलेले असते. उदाहरण, काळानुसार चे नियोजन, आता जून महिना लागणार तर मग लागवडीची तयारी कशी करायची, बियाणांची निवड कशी करावी इत्यादी मार्गदर्शन त्यात केले जाते.

‘होय आम्ही शेतकरी’ या समूहाला जवळपास जमा एक दीड लाख फॉलोवर्स झाले. व्याप वाढायला लागला. शेतकरी वर्गाचे असंख्य प्रश्न येत होते. आणि म्हणून २०१८ ला विचार केला की, समूहाचं एक सर्वसाधारण पोर्टल, वेबसाईट असावी. म्हणून एक होय आम्ही शेतकरी नावाने डोमेन विकत घेतलं. मुबलक खर्चात ही प्रक्रिया पार पाडावी म्हणून डॉक्टर अंकुश यांनी, युट्युब वर पाहून स्वतःच पोर्टल तयार केलं. त्यासाठी त्यांनी सांगितलं की, इतर पोर्टल्सच्या काही तांत्रिक गोष्टींचे निरीक्षण करून तसा बदल त्यांनी त्यांच्या पोर्टलमध्ये घडवला.

२०१६- १७ च्या दरम्यान अगदी सोळा, सतरा हजार सबस्क्राईब असणारे डॉ.अंकुश यांचे यूट्यूब चॅनल त्यांनी ‘होय आम्ही शेतकरी’ ला जोडून घेतले. त्यासाठी त्यांनी रोजच्या पोस्ट पब्लिश करण्यासाठी, तसेच सोशल मीडिया हँडल करण्यासाठी पूर्णवेळ काम करणारी एक पगारी व्यक्ती ठेवली.

सुरुवातीला अमोल व अंकुश या दोघांनी सुरू केलेली संस्था विस्तारत गेली आणि आता एकूण 16 व्यक्ती या संस्थेचे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. ‘होय आम्ही शेतकरी’ला एक फाउंडेशन म्हणूनच नोंदणी करण्यात आली. त्याद्वारे समाजोपयोगी कामे करता यावी हे यामागचे उद्दिष्ट होते.

एक सामाजिक संस्था म्हणून चालवीत असताना अंकुश यांनी वैयक्तिक एक ‘गन्ना मास्टर’ नावाची कंपनी २४ नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरू केली. त्याद्वारे त्यांनी कृषिविषयक उत्पादने विक्री करणे सुरू केले. या कंपनीवर एकूण पाच लोक डायरेक्टर आहेत. प्रॉडक्ट डेव्हलप करणे, त्याचे इवोल्युशन करणे इत्यादी या कंपनीमध्ये काम केले जाते.

ऊस, हळद, आले, कांदे, केळी आणि बाकी भाजीपाला यांसाठी वाढवर्धक पोषक संप्रेरकांचे उत्पादन या कंपनीमध्ये केले जाते. कंपनीची स्थापना केल्यापासून ते आजतागायत १५ हजार एकर पर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचवल्याची माहिती त्यांनी दिली.

या व्यवसायात उतरण या अगोदर संपूर्ण समूहाचा चेहरा हा सामाजिक दृष्टिकोनातून पाहिला जायचा. थोडक्यात ही लोकं शेतकऱ्यांना विनामूल्य मदत करतात, अशा समजाला तडा न जाऊ देता त्या प्रसिद्धीचा फायदा न घेता, प्रामाणिकपणाने ते या व्यवसायात उतरल्याचे सांगतात. तरीही होय आम्ही शेतकरी या व्यासपीठाचा फायदा व्यवसायाला 100% झाला हेही ते स्पष्ट करतात. सोशल मीडियाचा वापर करत लॉकडाउनच्या काळातही गन्ना मास्टर कंपनीचे अनेक प्रॉडक्ट विकल्या गेले.

प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रतिनिधी नेमताना विशेष करून शेतकरीच निवडला गेला, गन्ना मास्टर चे प्रतिनिधी म्हणून त्या शेतकऱ्यांना काही टक्क्यांमध्ये कमिशन देखील दिले जाते.

शेतकरीवर्ग तंत्रज्ञानाच्या बाबतीत थोडा फार आधुनिक झाला तरी सोशल मीडियाच्या बाबतीत तितकासा ॲक्टिव्ह नाही. मग विशेष करून याच वर्गाला कॅप्चर करण्यासाठी होय आम्ही शेतकरी ने शेतकरी वर्गातील तरुण पिढीला जोडून घेतलं आणि हळूहळू सर्वच वयोगटातील शेतकरी सोशल मीडियावर यायला लागला त्यामुळे विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता पडली नाही.

डॉक्टर अंकुश च्या पीएचडी च्या काळात बातमीपत्रात सातत्याने लिखाण व्हायचं त्यामुळे ही त्यांचा संपर्क वाढत गेला. तसेच त्यांनी स्वतःचे ‘कृषी रसायने पीकनिहाय सल्ला व सुरक्षा’ हे पुस्तक पब्लिश केले. त्याच्याही पंधरा-वीस हजार प्रती विकल्या गेल्या. त्यामुळे त्यांचं नाव होत गेलं आणि त्याचा रिस्पॉन्स हा फेसबुक द्वारे वाढत गेला.

तसेच कोटींची उलाढाल म्हणून काही शेतीउत्पादने, पशुपालनाचे मृगजळ दाखवले जाते, कुण्या कंपनीने कोटींची उलाढाल म्हणून आकर्षणाला बळी न पडता शेतकऱ्यांनी स्वतः त्याचा अभ्यास, विचार केला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे या उद्देशाने त्यांनी मध्यंतरी एक मोहीम राबवली.

मार्केटचा अभ्यास कसा करावा कोणते उत्पादन घ्या व इत्यादी जाणीव-जागृतीचे अभियान त्यात होते.

राज्याचा अर्थसंकल्पातील कृषी विषयक तरतुदी शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, कृषी विषयक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे इत्यादी ची माहिती देण्यासाठी लाईव्ह केले जाते. उदाहरणार्थ, उसाची FRP आत्ता कारखान्यातून एक रकमी दिली जाते, असा कायदाच आहे. परंतु नीती आयोगाने केंद्र सरकारकडे शिफारस केली कि, ऊसाची FRP एक किंवा दोन तुकड्यांमध्ये द्यावी. याला सर्व शेतकऱ्यांचा आणि शेतकरी संघटनांचा विरोध आहे.

ही माहिती त्यांना तेव्हा समजली जेव्हा काही शेतकरी समूह संघटना या शिफारसी बद्दल कायद्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण करू लागल्या. त्यात ‘होय आम्ही शेतकरी’ने देखील राजू शेट्टींना लाइव्ह मुलाखत करत शेतकर्‍यांपर्यंत ती माहिती पोहोचवली.

‘होय आम्ही शेतकरी’ समूह नाविन्यपूर्ण गोष्टीही चालवतो, अलीकडे त्यांच्यामार्फत ‘फळे व भाजीपाला केक’ स्पर्धा चालविण्यात आली होती. याचा उद्देश हाच होता की आरोग्याच्या दृष्टीने फळे तर चांगलीच आहेत आणि सोबतच एक जागृतीही होईल की शेतकऱ्यांच्या फळ मालाचे मार्केटिंगही होईल आणि त्याला भावही चांगला मिळेल.

ॲग्रोवन मध्ये लेखमाला लिहित असल्याने त्याचा इकडेही फायदा ‘होय आम्ही शेतकरी’ समूह चालवताना झाला. तसेच लष्करी आईच्या नोंदीमुळे डॉक्टर अंकुश यांचे नाव परदेशातही पोहोचले. जगभरातल्या शास्त्रज्ञासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

बिल गेट्स व मिलिंडा फाउंडेशनचा पंचवीस लाख रकमेचा एक प्रोजेक्ट २०१९ मध्ये त्यांना मिळाला होता.

ज्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव व्हायच्या आधी जे,पतंग पिकांवर येतात, त्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना आधीच सावध केले जाईल आणि त्यावर नियंत्रण आणण्याचा उपाय योजना केल्या जातील अशी एक सिस्टीम त्या प्रकल्पांतर्गत बनवली गेली. आणि त्याचा प्रयोग प्रथम झांबिया या देशात यशस्वीरित्या झाला. त्यांचे हे यश भारतासाठी महाराष्ट्रासाठी निश्चितच कौतुकाची बाब आहे.

२०१८ मधील हैदराबाद येथे झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये जवळपास २२ देशातील शास्त्रज्ञ हजर होते. त्यामध्ये डॉक्टर अंकुश यांना देखील त्यांचे संशोधन सादर करण्याची संधी मिळाली होती.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.