रशियात देखील प्रसिद्धी मिळवलेले अण्णा भाऊ साठे एकमेव भारतीय साहित्यिक होते.

इयत्ता आठवीत ‘माझे माहेर वाघदरा’ हा धडा होता. धडा म्हणजे कथाच होती ती. ज्या पद्धतीने ती कथा सांगितली होती ते वाचताना डोळ्यासमोर त्या कथेतलं विश्व उभं राहिलं होतं. ते सिनेमॅटिक होतं. रांगडं होतं. गावाकडचं अस्सल वातावरण त्यात उभं राहिलं होतं.

त्या कथेत सांगितलेला परिसर पश्चिम महाराष्ट्रातला, सांगली जिल्ह्यातला आहे. तिथे एका डाकूनं थैमान घातलेलं असतं. एक सासुरवाशीण एकटीच माहेरी जायला निघालेली आहे. रानातून, कुरणांतून, जंगलातून ती जात असते. तिला खरं तर खूप भीती वाटत असते. आणि ज्याची ज्याची असते तेच घडतं. तो डाकू तिला गाठतो. पण तो तिला लुटत तर नाहीच उलट कसलाही त्रास न देता सुखरूप माहेरी पोचवतो.

घरी गेल्यास ती त्याच्याबद्दल सांगताना म्हणते की हा कुणी डाकू नसून माझा भाऊ आहे. आणि माझं माहेर हे नसून त्याचं वाघदरा हे गाव माझं माहेर आहे.

पुढं दहावीत ‘स्मशानातील सोनं’ हा अजून एक भारी धडा होता.

भीमा मुंबईत काम शोधायला आलेला आहे. पण त्याला कुठेच काम मिळत नाही. काही दिवसांनी त्याला मुंबईच्या बाहेर एका खाणीत काम मिळतं. सहा महिन्यांनी ती खाण ही बंद पडते. बेकारीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे पुन्हा काम शोधताना त्याला एका ओढ्याशेजारी मढं जाळलेलं दिसतं. त्या राखेत काहीतरी चमकतं. ती सोन्याची अंगठी असते. त्याला आनंद होतो. ती अंगठी विकून तो घर चालवतो. त्याला पैसे मिळवण्याचा मार्ग सापडतो. तिथून पुढं तो दररोज रात्री स्मशानात जायला सुरुवात करतो.

जाळलेले, पुरलेले मढे उकरून त्यातलं सोनं मिळवून ते विकून त्यावर घर चालवायला सुरुवात करतो. पण त्याची बायको या प्रकाराला घाबरलेली असते. ती हे असलं काम थांबवायला सांगते. तेंव्हा तो म्हणतो की,

“मसणवट्यात भुतं असतात असं तुला कोणी सांगितलं ? अगं ही मुंबई भुतांचा एक बाजार आहे. खरी भुतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवट्यात कुजतात.
भुतांची पैदास गावात होते, रानात नाही.”

भीमा हे काम पुढे चालू ठेवतो का? त्याचं काय होतं? हे जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण गोष्टच वाचलेली बरी.

या कथा वाचत असताना त्यातल्या पात्रांचं जग आपल्यासमोर उभं राहतं. सिनेमा पाहिल्यासारखं वाटतं.

या कथांमधील बोचरी थंडी आपल्याला जाणवते. आपण माळरानावर, कुरणांतून चालत असतो. स्मशानात पोचलेलो असतो. स्मशानातलं सोनं या कथेचा शेवट तर एवढा गुंतवून ठेवणारा आहे की पुढच्या क्षणाला काय होईल याची उत्सुकता लागून राहिलेली असते. अंगावर काटा उभा राहतो. आपण दचकतो. एवढं भारी लिखाण वाचून आपण लेखकाच्या प्रेमात पडलो नाही तरच नवल.

शाळेच्या वाचनालयातून खुळंवाडी, बरबाद्या कंजारी हे कथासंग्रह मिळवून वाचले. यातल्या एकेक कथा म्हणजे गावरान मेवा आहेत. भाषाशैली ओघवती आहे. त्या वयात अशा प्रकारच्या लिखाणाला सामोरं जाणं हा अदभूत अनुभव होता. ते कथासंग्रह झटपट संपवून टाकले.

पुढं अजून शोधाशोध केल्यास ‘फकिरा’ कादंबरी हातात आली.

गावातील जत्रा, जोगण्यांचा इतिहास,जोगण्या मिळवण्यासाठी दोन गावात असलेली स्पर्धा, त्याबाबतचे राजकारण, त्यासाठी खेळलेले डावपेच, जोगण्या मिळवण्यासाठी राणोजी मांगाचं साहस हे सारंच अफाट आहे.

1930 च्या दरम्यान वाटेगावातील एका मैदानावर बापू साठेंचा तमाशा चालू होता. त्या तमाशाच्या मैदानात अचानक क्रांतिसिंह नाना पाटील आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी मोठं भाषण केलं. हे भाषण चालू असताना अबलख घोड्यावरून पोलीस आले आणि त्यांनी लाठीमार सुरू केला. त्यांनी नाना पाटलांना पकडायचा प्रयत्न केला. गर्दीत पळापळ झाली. दहा हजार पेक्षा जास्त लोक होते.

नाना पाटील त्या गर्दीतून पळत सुटले. ते पोलिसांना सापडले नाहीत. दोन तीन किलोमीटर पळून आल्यानंतर कुणी लहान मुलगा त्यांच्या पाठीमागे धावत येतोय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी थांबून त्याला कोण आहेस, माझ्यामागे का धावतोयस असं विचारल्यास त्यानं सांगितलं की तो त्यांना वाट दाखवायला आलाय. त्यांना कौतुक वाटलं.

त्याला घेऊन ते जंगलात धावत सुटले. त्या मुलाने त्यांना पुढं डोंगरातली वाट दाखवली आणि त्यांची फकीरराव राणोजी मांग यांच्यासोबत भेट घडवून आणली. त्याचं नाव विचारलं असता त्यानं सांगितलं,

तुकाराम !

तुकाराम शरीरानं बलदंड होता. पैलवानासारखी शरीरयष्टी होती. तो खेळाडू होता. दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता. दोन्ही हातांनी दांडपट्टा खेळत असताना बाहेरून शाईमध्ये भिजलेली वाळू मारली जायची. त्यातले कमीत कमी कण ज्याच्या अंगावर उडायचे तो चांगला खेळाडू असं समजलं जायचं. त्यात या पठ्याचा कायम पहिला नंबर यायचा.

ते पोर फक्त दीड दिवसाची शाळा शिकलं असं म्हणतात. पुढं मोठं झाल्यावर भावंडं त्याला ‘अण्णाभाऊ’ म्हणू लागली. तेच त्यांचं नाव झालं

अण्णाभाऊ साठे.

पोटापाण्यासाठी वाटेगाव सोडून त्यांना मुंबईची वाट धरावी लागली. तब्बल दोनशे सत्तावीस मैलांचा पायी प्रवास करून हे कुटुंब मुंबईत पोचलं. मुंबईत उदरनिर्वाहासाठी हर प्रकारचं काम केलं. कल्याणला कोळशाच्या वॅगन खाली करण्याचं काम केलं. लेबर कॅम्पमध्ये येऊन मजुरी केली. डोक्यावर कपड्यांचे गठ्ठे घेऊन कपडे विकण्याचं काम केलं.

पुढं मोरबागच्या गिरणीत कामगार म्हणून लागले तेंव्हा ते घाटकोपरच्या चिराग नगरमध्ये राहायला गेले.

तिथं त्यांनी लिखाणाला सुरुवात केली.

गिरणीत कामगार म्हणून काम करताना ते युनियनमध्ये सहभागी झाले. तिथून ते लाल बावटा कला पथकात सामील झाले. शाहीर अमर शेख, शाहीर दत्ता गवाणकर यांच्यासह त्यांची कला बहरली.त्यांनी पोवाडे, वग, नाटकं यांचं लिखाण करून सादरीकरण सादर केलं. एकीकडे कला पथकात काम करत असताना दुसरीकडे त्यांचं साहित्याचं लिखाण सुरू झालं होतं.

‘चित्रा’ ही त्यांची पहिली कादंबरी.
या कादंबरीनं त्यांना बर्लिनपर्यंत पोचवलं. यानंतर क्रमशः सुलतान, गुलाम, बरबाद्या कंजारी या पुस्तकांचं जर्मन,रशियन,फ्रेंच, झेक,पोलिश ई.भाषांत अनुवाद झाले.

1948 साली पॅरिसमध्ये आयोजित विश्व साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रण आलं.

परिस्थितीमुळं त्यांना या संमेलनात सहभागी होता आलं नाही. पुढं ते आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ ई. पुस्तकांच्या लेखनात गुंतले. तमाशा करताना हे शाहीर लोक त्यातून प्रबोधनाचं काम करत. त्यातून बऱ्याचदा सरकारला डोकेदुखी होई. म्हणून सरकारनं तमाशावर बंदी घातली. अण्णाभाऊंनी एका कार्यक्रमात आपण तमाशा करणार नसून ‘लोकनाट्य’ करणार आहोत असं सांगितलं. सरकारची गोची झाली. तेंव्हापासून तमाशाला लोकनाट्य संबोधलं जाऊ लागलं.

दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनानं जोर धरला होता. शिवाजी पार्क मध्ये आयोजित केलेल्या शाहिरी जलशात त्यांनी ‘माझी मुंबई’ हे लोकनाट्य सादर केलं. त्याला तुफान प्रसिद्धी मिळाली. त्यातील ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ ही छक्कड आजही लोकांच्या ओठांवर रुंजी घालते.

यात नवरा बायकोच्या विरहातून सादर होणारी गोष्ट शेवटी फारच कल्पकतेने मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुद्द्यावर येऊन थांबते.

अण्णा भाऊंच्या लेखनातून कष्टकरी, कामगार, वंचित लोकांचे विषय डोकवायला लागले होते. त्यांच्या साहित्यात जगण्याचा संघर्ष होता. स्वतःच्या अनुभवातून तावून सुलाखून आलेलं त्यांचं लेखन कागदावर उतरत होतं. मुंबईवर अनेक कवींनी, लेखकांनी, शाहिरांनी लिहिलं पण अण्णाभाऊंना दिसलेली मुंबई वेगळीच होती.

तिथं त्यांना विरोधाभास दिसतो. ते लिहितात,

‘मुंबईत उंचावरी। मलबार हिल इंद्रपुरी।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती।

दुसरीकडे,

परलात राहणारे। रात्रंदिस राबणारे।
मिळेल ते खाऊन घाम गाळती।

हा विरोधाभास दिसण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. शेतकरी आणि खेड्यातल्या माणसांसाठी ते लिहितात,

‘दौलतीच्या राजा, उठून सर्जा
हाक दे शेजाऱ्याला रं,
शिवारी चला…
रातदिस राबून साल न साल,
किती पिढ्या आम्ही काढायचं हाल ?
रोवू आता बांधावर बावटा लालं,
एकजूट करून, नीट नेम धरून
आखरीचा माराया पल्ला रं,
शिवारी चला…

बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा,कामगार चळवळीवरील एकजुटीचा नेता ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तीसेना’ हे गौरवगान, महाराष्ट्राच्या परंपरेपासून स्टॅलिनग्राडच्या परंपरेपर्यंत विररसात्मक पोवाडे, अकलेच्या गोष्टीपासून ‘माझी मुंबई’ पर्यंत दहाच्यावर लोकनाट्य,’इनामदार’, ‘पेंद्याचे लगीन अशी दोन नाटकं, ‘चित्रा’, ‘वारणेच्या खोऱ्यात’, ‘फकिरा’, ‘वैजयंता’, ‘माकडीचा माळ’ ई.पस्तीस कादंबऱ्यांचं लेखन, ‘कृष्णाकाठच्या कथा’, ‘बरबाद्या कंजारी’, ‘खुळंवाडी’ ई. पंधरा कथासंग्रह, माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णन अशी अण्णा भाऊ साठेंची विपुल साहित्य संपदा आहे.

बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर श्रद्धांजली वाहताना ते म्हणतात,

‘जग बदल घालुनी घाव। सांगून गेले मज भीमराव।
गुलामगिरीच्या या चिखलात। रुतून बसला का ऐरावत।
अंग झाडूनी निघ बाहेरी। घे बिनीवरती घाव।
सांगून गेले मज भीमराव।

1958 साली झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उदघाटन अण्णा भाऊंच्या हस्ते झालं होतं. त्या साहित्य संमेलनात त्यांनी बोललेलं वाक्य कामगारांचं महत्व अधोरेखित करतं. ते म्हणतात,

‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून शेतकरी, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.’

शोषितांचं, कामगारांचं दुःख प्रभावीपणे मांडणाऱ्या अण्णांचं समाजवादी रशियात फार कौतुक झालं. 1961 साली इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीने त्यांना रशियात येण्यासाठी निमंत्रण दिलं. रशिया भेटीत खुद्द तिथल्या पंतप्रधानांनी त्यांचा सत्कार केला. त्या काळात राज कपूर नंतर रशियात प्रसिद्धी मिळवलेले अण्णा भाऊ साठे एकमेव भारतीय होते.

अण्णा भाऊ साठेंनी जवळपास दहा चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. वारणेचा वाघ, फकिरा, डोंगरची मैना, अशी ही साताऱ्याची तऱ्हा, टिळा लावते मी रक्ताचा, बारा गावचे पाणी, मुरळी मल्हारी रायाची ही त्याची काही उदाहरणे होत.

मॅग्झिम गॉर्की, दोस्तोवस्की, अँटोन चेकोव्ह ई. रशियन लेखकांची काही पात्रे आणि अण्णा भाऊ साठे यांची पात्रे यांच्यात बरंच साम्य आढळते. ही पात्रे शोषित, श्रमिक वर्गातून आलेली, परिस्थितीशी लढणारी, अन्यायाचा प्रतिकार करणारी आहेत म्हणून रशियन लोकांना अण्णा भाऊ साठेंचं साहित्य भावलं असावं.

आपल्यालाही रशियन साहित्य आवडण्याचं कारण हेच असावं. अण्णा भाऊ साठेंना मॅग्झिम गॉर्की ऑफ महाराष्ट्रा म्हटलं जातं ते बहुतेक यामुळेच. त्यांच्या साहित्याला मातीचा गंध येतो. सह्याद्रीचा राकटपणा त्यांच्या लेखणीत आहे. इथल्या थंडीचा बोचरेपणा त्यात आहे. गोधडीची ऊब आहे. त्यात मुंबईच्या वातावरणातील दमटपणा आहे. अण्णा भाऊ साठे लेखक होते, कवी होते, शाहीर होते, गायक होते, कार्यकर्ता होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं, मराठी साहित्यातलं त्यांचं योगदान महाराष्ट्र विसरणार नाही.


– नारायण शिवाजी अंधारे. ( 9766935585) 

हे हि वाच भिडू.

2 Comments
 1. Sunil kasabe says

  Very nice it’s very useful information

 2. Raghunath Wankhade says

  Wow!!!!
  From first word to last word I can not stop me.
  Finally It is amazing information.
  Thanks for it.

Leave A Reply

Your email address will not be published.