बंटी पाटील मोठ्ठे व्हायला महाडिक देखील तितकेच मोठ्ठे होते हे सांगण गरजेचं आहे…

आप्पा हे वासेपूरचे रामाधीरसिंह होते. आप्पांना बाहुबली समजणाऱ्या दोन पिढ्या कोल्हापूरमध्ये आजही आहेत, हेच आप्पांच राजकारण होतं. बाकी बंटी पाटील मोठे व्हायला महाडिक देखील तितके मोठे होते हे सांगण गरजेचं होतं.

‘इन्सान जो है वो दो नसल के होतें है, एक हरामी और दुसरे बेवकूफ। और ये सारा खेल इन दोनों का हीं है। बासेपूर कि कहाणी थोडी टेढी है बाहर सें देखो तो सीधे साधे लोंगो कीं बस्ती है बासेपूर, पर अंदर आओ तो एकसे बढकर एक…’

गॅंग ऑफ वासेपूर सिनेमातला सुरुवातीचा हा सीन..

बदला घेण्याची तीव्र इच्छा, एक विरूद्ध दूसरा. या सिनेमाची गोष्ट सोडली तर अगदी सेम टू सेम किस्से कोल्हापूरच्या राजकारणात सुरु आहेत. एका बाजूला आहेत सतेज उर्फ बंटी पाटील आणि दूसऱ्या बाजूला आहेत आप्पा महाडिक. आज सिनेमाच्या क्लायमॅक्सची पाटी पडली अन त्यावर लिहिलं होत,

गोकुळ गेलय, पण आप्पाचं नाव उरलय..!!!

या आधीचा पार्ट वन येवून गेला, कोल्हापूरच्या वासेपूरातला फैजल कोण, सरदार कोण, शाहीद कोण, सुलतान कोण या सगळ्या परिस्थितीजन्य गोष्टी. प्रत्येकाचा आपला पिक्चर चालू आहे. पण या स्टोरीत कधीही अनेक पिढ्यांना पुरून उरणारा रामाधीरसिंह मात्र एकच आहे.

आणि ते म्हणजे अप्पा महाडिक..

रामाधीरसिंह पिक्चरमध्ये निगेटिव्ह वाटू शकतो. पण जरा खोलात गेलं की कळतं रामाधीरसिंहने स्वत:हून कधीच कुणाच्या शेपटावर पाय दिला नाही. पण ज्याने दिला त्याला डसल्याशिवाय तो राहिला नाही. काहीस असच अप्पा महाडकांच राजकारण..

तर झालं असं कि,

महाडिक आणि बंटी पाटील वाद तसा जुनाच. पण याला पार्श्वभूमी २००४ पासूनची आहे. २००४ च्या लोकसभा इलेक्शन मध्ये मुन्ना महाडिक शिवसेनेच्या तिकिटावर उभे होते. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर सदाशिवराव मंडलिक उमेदवार होते. यामध्ये नवख्या मुन्ना महाडिकांनी मात्तब्बर मंडलिकांना घाम फोडला. मुन्ना महाडिकांना १४,००० हजारांचा निसटता पराभव स्वीकारावा लागला.

यावेळी शरद पवार म्हणाले होते कि,

“कौन है यह मुन्ना?”

२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मुन्ना महाडिक इच्छुक होते. पण ऐनवेळी पवारांनी मंडलिकांसह मुन्ना महाडिकांना ही तिकीट नाकारलं अन बाजी मारली ती कोल्हापूरच्या संभाजी महाराजांनी. महाडिकांच्या कार्यकर्त्यांमध्ये असं म्हंटल जात कि मुन्ना महाडिकांना तिकीट न मिळू देण्यात बंटीचाच हात होता. आणि यावेळी बंटी पाटलांनी आघाडीचे उमेदवार म्हणून संभाजी महाराजांच्या पाठीमागे आपली ताकद ही लावण्याचा संकल्प केला. या पाडापाडीच्या राजकारणात बंटी पाटलांची मदत न झाल्याने महाडिक गट नाराज झाला होता.

२००९ ते २०१४ या कालावधीत पुलाखालून बरचसं वाहून गेलं…

पाटलांनी जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असताना अमल महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्ष होता येऊ नये यासाठी खो घातला होता. यामुळे पराभवाचे उट्टे काढण्याची संधी महाडिक गट अजिबात सोडणार नव्हता. २०१४ ला राजकीय समीकरण बदलू लागली. मोदी लाट असतानाच राष्ट्रवादीने कोल्हापूरातून मुन्ना महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली.

पण अशा वेळी बंटी पाटलांनी सर्वांना आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला, तो म्हणजे मुन्ना महाडिकांना खासदारकीसाठी मदत केली. महाडिकांनी खासदार व्हायचं आणि आपल्याला आमदारकीला मदत करायची.

झालं… गंगेत घोड न्हालं… मुन्ना खासदार झाले.

पण आपल्या मुलाला जिल्हापरिषद अध्यक्ष होऊ दिल नाही याची सल मात्र आप्पा महाडिकांच्या मनात होती. जे बंटी पाटील एकेकाळी महादेवराव महाडिक उर्फ आप्पा महाडिक यांच्या सोबत असायचे त्यांच्याकडून झालेल्या या वरचढपणाच्या किश्श्याकडे डोळसपणे बघितल्यावर इथे रामाधीरसिंगचा तो डायलॉग आणि सीन आठवतो..

सरदार खानला ड्रायव्हर म्हणून ठेवल्याने मुलाच्या कानाखाली खाडखाड लावत रामाधीर सिंग म्हणतो,

“साला इतने दिनोसे साप पाल रखे थे हम”..

सर्व काही डोक्यात ठेऊन शांततेत आप्पांनी बंटीचा कार्यक्रम केला. २०१४ च्या लागलेल्या विधानसभेलाच १४ दिवसांतच आपल्या मुलाला आमदार केले. आणि जिल्हापरिषद हातात आल्यावर सुनेला जिल्हापरिषद अध्यक्ष केले. आप्पांनी इथे बंटी पाटलांचा कार्यक्रम केला असं वाटत, पण पिक्चर संपला नाही.

पार्ट १ च्या क्लाईमॅक्सला इथूनच सुरवात झाली…

१. बंटी पाटलांनी पहिला घाव घातला तो विधानपरिषदेच्या आमदारकीवर.
२. एकावेळी घरात तीन पक्ष ठेवणारे महाडिक होते. असा आरोप केला
३. आणि हुकमी एक्का बाहेर काढला ते म्हणजे .. आमचं ठरलय… !!

या सगळ्या जिरवाजिरवीच्या खेळात दावणीला बांधलेली खासदारकी गेली पण आप्पा शांत
आमदारकी गेली, जिल्हा परिषद गेली पण आप्पा शांत.. !!

पण गोकुळ हा आप्पांचा किल्ला होता.. 

कारण गोकुळात रसद मिळते, जिरवाजिरवीच्या राजकारणासाठी लागणाऱ्या मलाईची. गेली तीस वर्षे एक हाती सत्ता ठेवणारे महाडिक या संस्थेवर कब्जा करून होते. गोकुळ दूध संघाची सुरुवात ही करवीर तालुका दूध संघातून झाली. सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते एन. टी. सरनाईक यांनी १६ मार्च १९६३ ला या संघांची स्थापना केली.

या संघाचे कार्यालय दसरा चौकातून व्हिनस कॉर्नरकडे जाताना लक्ष्मी पेट्रोल पंपाच्या शेजारील इमारतीत आजही आहे.सरनाईक हे राजाराम महाराज यांच्या मंत्रिमंडळात पुरवठा मंत्री होते. पुढ याच करवीर तालुका संघाच मिल्क फेडरेशन झाले.

साधारणत: १९६७ च्या सुमारास संघात दिवंगत नेते आनंदराव पाटील चुयेकर यांचा गोकुळमध्ये प्रवेश झाला. पुढे १९७० ला तेच अध्यक्ष ही झाले. त्यांनी एका तालुक्यापुरता मर्यादित असलेल्या या संघाचे कार्यक्षेत्र जिल्हाभर वाढविले. त्यांना दूध धंद्याचे गमक सापडले होते. त्यामुळे चुयेकर यांच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल दमदारपणे सुरु झाली.

गोकुळच्या माध्यमातून चुयेकर यांचा जिल्ह्याच्या राजकारणातही दबदबा तयार झाला. यातूनच त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला धुमारे फुटले. त्यातून त्यांनी एक मोठी उडी घेतली व तत्कालीन सांगरुळ विधानसभा मतदार संघातून १९९० च्या निवडणूकीत अपक्ष म्हणून चक्क तत्कालीन बडे नेते श्रीपतराव बोंद्रे यांनाच आव्हान दिले. त्यावेळी शेकापक्षाचे लढाऊ नेते गोविंदराव कलिकते हे विद्यमान आमदार होते. तिरंगी लढत झाली, त्यात बोंद्रेदादा मोठ्या फरकाने विजयी झाले.

परंतू त्याचा राग म्हणून चुयेकर यांना अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले आणि संघाची सुत्रे अरुण नरके, महाडिक गटाकडे आली.

या अगोदर म्हणजे १९८६-८७ च्या दरम्यान हेच महादेवराव महाडिक आपल्या पिवळ्या स्कूटरवरून आनंदराव पाटील चुयेकर यांची भेट घेण्यासाठी चुये (ता.करवीर) येथे जात असत. त्या गावांतील अनेक लोकांना ते आजही आठवते. मला दूध वाहतूकीचा सगळा ठेका द्या असा महाडिक यांचा आग्रह होता परंतू त्यास चुयेकर तयार नव्हते. सगळे मी तुमचे ऐकणार नाही व मला इतर कार्यकर्त्यांनाही ही संधी द्यायला हवी असे चुयेकर यांचे म्हणणे होते.

गोकुळ मध्ये महाडिक यांना पहिल्यांदा रोखण्याचे काम चुयेकर यांनी केले होते. परंतू त्याच चुयेकर यांना अध्यक्षपदावरून हलवून संघाची सुत्रे अरुण नरके यांच्याकडे आली तेथून पुढे सलग दहा वर्षे ते संघाचे अध्यक्ष राहिले. या काळातच महाडिक संघाचे नेते बनले. संघातील सगळा व्यवहार त्यांच्या हातात आला. संघात संचालक मंडळ जरी कार्यरत असले तरी तिथे होणाऱ्या प्रत्येक निर्णयात महाडिक यांचा सहभाग असतो.

आजवर गोकुळ दूध संघातील सत्तेचा वापर हा राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे पंख छाटण्यासाठीच झाला. ज्याच्या हाती गोकुळ त्याच्या हाती जिल्ह्याची सत्ता असते. तो जिल्ह्यातील राजकारणात किंगमेकर असतो.

कोल्हापुरात असं म्हंटल जायचं की,

जोपर्यंत गोकुळ आहे तो पर्यंत आप्पांच्या सावलीलाही धक्का लागणार नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक निश्चितच वासेपूरच्या स्टोरीतले रामाधीरसिंह ठरत होते. आणि म्हणूनच ‘आमचं ठरलंय आता गोकुळ उरलंय’ अशी जीवश्च कंठश्च आरोळी ठोकत बंटी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोकुळकडे कूच केली.

हा घाव आप्पांना वर्मी बसला. अगदी शेवटच्या क्षणी फैजल खान जसा हॉस्पीटलमध्ये रामाधीरसिंहच्या अंगावर धावून जातो तसा पिक्चरचा शेवट होता. शाहिद खान, सरदार खान, दानिश खान ही पात्र बदल्याच्या आगीत संपून जातात पण रामाधीरसिंह टिकून राहतो. या टिकून राहण्याच्या टेचातच एकदा रामाधीरसिंह सुलतानला विचारतो,

“शाहिद मर गया, सरदार मर गया, दानिश मर गया, पर हम अभी तक जिन्दा है, काहे ??

तेव्हा सुलतान म्हणतो,,

क्योंकी, बाबूसाहब आप ही असली बाहुबली हो।

आप्पा हे वासेपूरचे रामाधीरसिंह होते. आप्पांना बाहुबली समजणाऱ्या दोन पिढ्या कोल्हापूरमध्ये आजही आहेत, हेच आप्पांच राजकारण होतं. बाकी बंटी पाटील मोठे व्हायला महाडिक देखील तितके मोठे होते हे सांगण गरजेचं होतं.

  •  स्नेहल माने (mailto:snehal.ushashankar@gmail.com)

हे ही वाच भिडू 

2 Comments
  1. Vaibhav says

    अंगावर काटा आला, मस्त – खूप छान लिहलय :
    पण एवढ्या सगळ्यात कोल्हापूरच्या जनतेचा फायदा की तोटा.
    त्या लोकांनी त्यांची घरे भरण्याची योजना केली, बाकी गरीब लोकांचे काय.?
    Gang of kolhapur आहे हे सगळं.
    तिथं गोकुळ ला नोकरी करायची झाली तर अगोदर पैसे भरावे लागतात, अस ऐकलंय?

  2. Ashutosh M. says

    मी अलीकडे धनंजय महाडिक यांचा मुलगा, कृष्णाराज महाडिकचे vlog बघितले आणि तिथून महाडिक कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी अजून जाणून घ्यायची इच्छा होती. मी नाशिकचा असल्या मुळे कोल्हापूरच्या राजकारणाची जास्त माहिती नव्हती आणि आज हा लेख वाचून सगळी हवी ती माहिती मिळाली. त्यात भर म्हणजे ही सगळी स्टोरी Gangs OF Waseypur च्या रुपात सांगितल्या मुळे एकदम अचूक कळली.
    Thanks to the writer! Great job! 👍🏼

Leave A Reply

Your email address will not be published.