दरवेळी अर्शद आपलं नाणं खणखणीत वाजवून सांगतो, वो लंबी रेसका घोडा हैं..

तस त्याचं फिल्म इंडस्ट्रीतलं करियर सुरु झालेलं ते साल होतं १९८७ चं. आणि  ॲक्टिंग म्हणून त्याला पहिली संधी मिळाली होती ते साल होतं १९९६ चं. अर्शद १९९० पासून इंडस्ट्रितला लढवय्या माणूस.

कालपरवा voot या माध्यमावर अर्शद वारसीची असुर सिरीज पाहण्यात आली. कमी बजेटच्या सिनेमा/सिरीजना अर्शद ढगात घेवून जाण्याच काम करु शकतो हे परत एकदा प्रुव्ह झालं. जॉनी एलएलबी हा सिनेमा देखील त्याने असाच ढगात पोहचवला होता.

अर्शदचं आजचं वय ५१ वर्ष. गेल्या ३० वर्षांपासून तो इंडस्ट्रीत सक्रिय आहे. पण या काळात तो कुठेही  लांब फेकला गेला नाही. सातत्याने स्वत:ला प्रुव्ह करत राहिला.

तो इथपर्यन्त कसा पोहचला त्याची ही रोमांचक गोष्ट, बोलभिडूचे वाचक अजेश पवार यांनी लिहली आहे. 

अर्शदचा जन्म एका मुंबईस्थित मुस्लिम कुटूंबातला. वडिलांना त्याला नाशिकच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं होतं. तिथे याला खेळाची आवड निर्माण झाली. त्याला जिमनॅस्टिक व्हायचं होतं. असही सांगितल जात की तो राष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिक म्हणून नाव कमावू पहात होता. पण त्याच्या जिमनॅस्टिक खेळाबद्दल अधीक संदर्भ मिळत नाहीत.

झालं अस की अर्शद १४ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या दूखातून सावरतोच तो दोनच वर्षात त्याच्या आईचा देखील मृत्यू झाला. वयाच्या १६ व्या वर्षी अर्शद एकाकी पडला.

अनाथ नावाचा शिक्का त्यांच्या कपाळावर लागला. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे त्यांच शिक्षण सुटलं. आपल्या छोट्या भावांसह त्याने मुंबई गाठली व छोटी मोठी कामे करु लागला.

वयाच्या १७ व्या वर्षी त्याने मुंबईत कामाला सुरवात केली होती. ते काम होतं कॉस्मेटिक विकणं. निरनिराळी सौदर्यप्रसाधने विकून तो चार पैसै कमावण्याच्या मार्गाला लागला. पुढे एका फोटो लॅबमध्ये काम करु लागला.

जिमनॅस्टिक कधीच मागे पडलं पण इथे त्याला डान्सची आवड निर्माण झाली.  मुंबईच्या प्रसिद्ध  अशा अकबर सामी डान्स ग्रुपमध्ये त्याला प्रवेश मिळाला. मिळालेल्या या संधीच या पोराने सोनं केलं.

एकामागून एक प्रयत्न करत त्याने भट्ट साहेबांच्या काश (१९८६) आणि ठिकाना(1987) या दोन्ही सिनेमात असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केलं. 

मात्र यानंतर अर्शदसाठी इंडस्ट्रीचा रस्ता बंद झाला.

१९९१ मध्ये अर्शदने इंडिया डान्स कॉम्पिटिशन जिंकली. पुढे १९९२ साली लंडनमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड डान्स कॉम्पिटिशन मध्ये तो सहभागी झाला. तिथं त्याच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. हळुहळु तो छोट्या मोठ्या स्पर्धांमधून सहभागी होतं होता. याचा फायदा म्हणजे अर्शदकडे आत्ता बऱ्यापैकी पैसा जमा होवू लागला. या पैशातून त्याने स्वत:ची डान्स ॲकेडमी सुरु केली त्याच नाव होतं,

AWESOME DANCE STUDIO 

१९९३ साली आलेल्या रूप की रानी चोरों का राजा चित्रपटाला अर्शदने डान्सिंग आयडियाज दिल्या होत्या. १९९६ साली अर्शदचा पहिला चित्रपट तेरे मेरे सपने प्रदर्शित झाला.  ते बॅनर होते ABCL अर्थात Amitab Bacchan Corporation Limited. चित्रपट हीट झाला.

पण अर्शद हिरो म्हणून लोकांना भाळला नव्हता. यापुढे तो चमकू लागला तो साईट ॲक्टरच्या रुपात. बेताबी (१९९७), मेरे दो अनमोल रत्न (१९९८), हिरो हिंदुस्तानी (१९९८), होगी प्यार की जीत (१९९९), त्रिशक्ती (१९९९), घाट (२००१), ‘मुझे मेरे बिवी से बचाव (२००१)’, जानी दुश्मन (२००२) अशा चित्रपटातून तो साईड एक्टरचे रोल निभावू लागला. 

त्यानंतर आला तो सर्किट. 

सर्किट या मुन्नाभाई एमबीबीए पिक्चरमधून त्याला अफाट लोकप्रियता मिळाली. सर्किटचा रोल पहिला मराठमोळ्या मकरंद देशपांडे यांना ऑफर करण्यात आला होता. मकरंद देशपांडे हे नाव थिएटरमधलं मोठ नाव होतं. सत्या मधला ॲडव्होकेट चंद्रकांत मुळे साकारणारा माणूस सर्किट म्हणून भारी काम करेल यात शंका नव्हती. पण घोळ झाला आणि ही भूमिका अर्शदच्या वाट्याला आली.

सुरवातील सर्किट या कॅरेक्टरचं नाव खुजली होतं. पण अर्शदने त्याचं नाव सर्किट अस बदलवून घेतलं. पात्राच्या हरकती, डॉयलॉग, कपडे बदलण्यात आले. अर्शद मनमोकळेपणाने वागला आणि हा रोल एका वेगळ्याच उंचीवर गेला.

सर्किटच्या रोलला अफाट लोकप्रियता मिळाली. आयफा अवार्ड, फिल्मफेअर, नॅशनल फिल्म अवार्ड या सिनेमाला मिळले. बेस्ट कॉमिक ॲक्टर आणि सपोर्टिंग ॲक्टर म्हणून त्याचा उल्लेख करण्यात येवू लागला.

मुन्नाभाईच्या सिरीजनंतर अर्शद 2.0 हे व्हर्जन आपणाला बघायला मिळालं. रोहित शेट्टीचा गोलमाल, ढोल, धमाल अशा सिनेमात त्याने स्वत:ला कॉमेडी ॲक्टर म्हणून सिद्ध केलं. इष्किया मध्ये तो नसरुद्दिश शहा सारख्या मातब्बर गड्यासमोर उभा राहिला.

२०१३ साली त्याचा जॉली एलएलबी आला.

प्रमुख भूमिकेत असणारा त्याचा हा चित्रपट तसा लो बजेट होता. चित्रपट विशेष काही कामगिरी करेल अशा अपेक्षा नव्हत्या. तरिही हा पिक्चर त्याने अक्षरश: खाल्ला. चित्रपटाला बरेच पुरस्कार मिळाले. अर्शद आत्ता कोणत्याही भूमिका साकारू शकतो हेच या चित्रपटातून सिद्ध झालं.

त्यानंतर आलेल्या जॉनी एलएलबीच्या दूसऱ्या भागातून मात्र त्याला डच्चू देण्यात आला. पहिल्या भागाची लोकप्रियता पाहून फॉक्स स्टार स्टुडियो प्रोड्यूसर म्हणून उतरला. सिनेमा भव्यदिव्य करायचा या योजनेतून अर्शदच्या जागी अक्षय कुमार आला. हे दुख त्याने पचवलच असेल यात शंका नाही.

एकएक करत तो पायऱ्या चढत राहिला. स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रवास कधी कधी खूप मोठा असतो. अर्शद तेच करत राहिला. एकामागून एक तो स्वत:ला सिद्ध करत लंबी रेसचा घोडा असल्याचं ठणकावून सांगत राहिला. नव्यानेच आलेल्या असुर वेबसिरीज देखील त्यांने खावून टाकली.

नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमच्या जमानात्यात वूट सारख्या माध्यमांवर आलेली लो बजेट असणारी असूर सिरीज चमकली. त्याला उत्कृष्ट लिखाण, दिग्दर्शन या गोष्टी असल्या तरी कुठेतरी अर्शदचं दिसणं हे देखील महत्वाच कारण ठरतं.

भिडू अजेश पवार

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.