माहेरची झुबेदा मुजावर सासरी येवून आशा गवळी झाली

मुंबईच्या डॉनच्या बाबतीत दोनच गोष्टी घडत गेल्या. दाऊद इब्राहीम, राजू पुजारी, अबु सालेम यांसारखे डॉन देश सोडून पळाले. अरुण नाईक, सदा पावळे, नारी खान यांच्यासारखे डॉन पोलीसांच्या चकमकीत मारले गेले. या दोन्ही गोष्टी मुंबईच्या डॉन लोकांसोबत घडत गेल्या.

मात्र याला वरचढ ठरणारा तिसऱा डॉन निघाला, जो मुंबईतच राहिला. तो पोलीसांच्या चकमकींपासून वाचला पुढे आमदार झाला. स्वत:चा पक्ष त्याने काढला. त्याने आपल्या कार्यकर्त्यांना मुलांना मुंबई महानगरपालिकेत निवडून आणलं. त्याच नाव अरुण गवळी. अरुण गवळीने एवढं सगळं कस साध्य केलं हा प्रश्न पडतो तेव्हा हमखास उत्तर मिळतं ते म्हणजे, 

मम्मी. 

डॅडी अरुण गवळीची बायको म्हणजे आशा गवळी. लोक तिला मम्मी म्हणतात. डॅडी शार्पशूटर असला तरी मम्मी डोक्याने शार्प होती. ती पद्धतशीरपणे नवऱ्याला यातून वाचवत आली. पक्ष उभा करण्यापासून ते प्रचार करण्यापर्यन्त ती त्याच्या मागे भक्कम उभा राहिली. अरुण गवळीच्या काळ्या कृत्यांमध्ये देखील ती सहभागी असायची. पोलीसांनी तिच्यावर मनीष शहाच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका देखील ठेवला होता. पण आशा पुराव्याअभावी सहीसलामत सुटत आली.

अरुण गवळीला डॉनच वलय मिळाल नव्हतं. पण मुंबईच्या भाईगिरीच्या चॅप्टरवर मात्र त्यांच्या नावाची दखल घेतली जात होती. नॅशनल सिक्युरिटी ॲक्टखाली अरुण गवळीला अटक करण्यात आली होती.

काही वर्षांपूर्वी अरुण गवळी आपल्या वडिलांप्रमाणे गिरणीकामगार म्हणून काम करु लागला होता. कांजूरमार्ग इथल्या ग्रीव्हज् लिमिटेड या कंपनीत कामाला सुरवात केल्यानंतर मात्र अरुण गवळीची लाईफ बदलली. त्याचा शाळेतला मित्र रमा नाईक हा गुंड म्हणून नाव कमवत होता. अरुण गवळी व रमा नाईक एकत्र आले. त्यांना बाबू रेशीम जॉईन झाला आणि मुंबईच्या इतिहासात BRA नावाच्या गॅंगने आपली दखल घ्यायला लावली.

या गॅंगने पारसनाथ पांडे या मटका किंगचा खून केला. मुंबईतल्या मटका व्यवसाय आपल्या हातात घेण्यासाठी त्याने पांडेचा गेम केला होता. त्यानंतरच अरुण गवळीला नॅशनल सिक्युरिटी ॲक्टखाली अटक करण्यात आली होती. एका महिन्यात त्याला सोडण्यात आलं. 

त्यानंतरच्या काळातच भायखळ्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या झुबेदा मुजावर या तरुणीसोबत अरुण गवळीची ओळख झाली. अरुण गवळी झुबेदाच्या प्रेमात वेडा झालेला. करील तर हीच अस त्याचं ठरलं. झुबेदाचं त्यावेळी आपल्या धर्मातील मुलासोबत जश्न ए शादी ठरली होती. अरुण गवळीने झुबेदाला लग्नासाठी विचारलं. झुबेदा तयार झाली. अरुणं आपले मित्र बाबू रेशीम आणि रामा नाईकला त्याचा निर्णय सांगितला. 

मुस्लीम मुलीसोबत निकाह करणं म्हणजे संपुर्ण मुस्लीम गॅंगला अंगावर घेण्यासारखं होतं.

त्यातही नाईक गुंड जरी असला तरी शेवटी तो मराठी कुटूंबातच वाढला होता. त्याच्यावर मराठी असल्याचा पगडा होता. अशा घरात भायखळ्यात राहणारी झुबेदा कशी नांदू शकते हा प्रश्न पडलेला. तरिही अरुण गवळी आपल्या निर्णयावर ठाम राहिला व त्याने लग्नाचा निर्णय जाहिर करुन टाकला.

माहेरची झुबेदा मुजावर सासरी आली आणि आशा गवळी झाली. कपाळावर भारदस्त कुंकू आणि मंगळसुत्र घालणाऱ्या आशा गवळीकडे पाहून कोणाचाही चटकन विश्वास बसत नाही की ती जन्माने मुस्लीम आहे. आशा आणि अरुण गवळीला पाच मुलं झाली. गीता, महेश, योगेश, योगीता आणि अस्मिता अशी त्यांची नाव. सुरवातीच्या काळत चुल आणि मुल इतकचं काय ते विश्व आशा गवळीचं होतं. अरुण गवळीचे रोजचे मारामारीचे किस्से ऐकायचे. भाईगिरीची चर्चा व्हायची पण घरामध्ये गुंडगिरीला प्रवेश नव्हता.

पण पुर्णपणे गवळी झालेल्या झुबेदाच्या आयुष्यात सुखी संसाराच्या या गोष्टी खूप कमी काळ टिकला. आजच्या आशा गवळीला मध्यंतरी एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा ती म्हणाली होती की,

अरुण गुन्हेगार आहे हे मला माहिती आहे, तरिही मी त्याला साथ देते. कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. मलाही सर्वसामान्य जीवन जगावं वाटतं. पण तस घडणं कदापी शक्य नाही. मी त्याच्यासाठी काय वाट्टेल ते करेल.

आशा गवळी ज्याप्रमाणे काय वाट्टेल ते करण्याची भाषा करते त्याचप्रमाणे तिने केलं. गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकत असताना अरुण गवळीच्या दगडी चाळीत घुसण्याचा प्रयत्न अनेकदा पोलीसांनी केला. सुरवातीच्या काळात अरुण गवळीच्या शोधात पोलीसांनी अनेकदा त्याच्या घराची झडती घेतली. पण गवळी एकदासुद्धा घरात सापडला नाही. पोलीसांच्या मतानुसार आशा गवळीने घरातच खड्डे खोदले होते. एक खड्डा तर पोलीसांनी गॅंस सिलेंडरच्या खाली खोदलेला मिळाला होता. अशा खड्यात आशा गवळी अरुण गवळीला लपवून ठेवायची. त्यामुळे अरुण गवळी चकमकीच्या काळात पोलीसांना सापडू शकला नाही. 

१९९७ साली अरुण गवळीने राजकारणाचा श्रीगणेशा केला.

अखिल भारतीय सेना नावाने पक्ष उभा केला. राजकारणात यावं हा सल्ला त्याला आशा गवळीने दिला होता. तिचं म्हणणं होतं की राजकारणाचा पाठिंबा राहिला तर अरुण गवळीला पोलीस कारवाईतून वाचवता येवू शकतं. त्यासाठी पक्षाची महिला शाखा देखील काढण्यात आली. आशा गवळीने महिला शाखा पुर्णपणे आपल्या ताब्यात ठेवली. पोलीस कारवाई करत असताना याच महिला शाखेच्या महिलांनी कित्येक वेळा अरुण गवळीला संरक्षण दिले. महिला असल्याने पोलीसांना कडक कारवाई करण्याच्या मर्यादा येत असत व त्याचाच फायदा गवळीला होत असायचा.

पोलीसांच्या रडारवर आशा गवळी पहिल्यांदा आली ती एका चिट्टीमुळे. अरुण गवळीने जेलमधून आशा गवळीला एक चिट्टी लिहली होती. अरुण गवळी तेव्हा अमरावतीच्या जेलमध्ये होता. पोलीसांनी अरुण गवळीच्या घरी धाड टाकली तेव्हा त्यांच्या हातात एक चिट्टी सापडली त्यामध्ये लिहलं होतं की,

आशा, राजाला सांगून बंड्याकडून मनीष शहाचं काम लवकर करुन घे.

याच मनीष शहाचा खून करण्यात आल्याने पोलीसांनी घरावर धाड टाकली होती. पण हत्येत संबंध असण्याऐवढे पुरेसे पुरावे त्यांना मिळाले नाहीत. आशा गवळीच्या नियोजनामुळेच अरुण गवळी पुढे आमदार म्हणून निवडून येवू शकला. पुढे नवऱ्याच्या पाठिंब्यावर तिने आई म्यूझिक सर्व्हिस कंपनी सुरू केली. राजकारणात असताना उत्पन्न दाखवण्यासाठीच ही शक्कल असल्याचं सांगण्यात आलं. आशा गवळीने या कंपनीचा कारभार पाहिला. यातून वार्षिक उत्पन्न दोन कोटींच होत असल्याचं दाखवण्यात आलं.

मुंबईच्या माफीयात भलेभले गुंड संपले मात्र अरुण गवळी पुरून उरला याच श्रेय आजही मम्मी अर्थात आशा गवळीला अर्थात पुर्वीच्या झुबेदा मुजावरला दिले जातं. 

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Asif says

    Mummy Majhi Mavshi Lagte Bhetaych asel tar sanga

  2. NarendraChavan says

    EkdumSahi

Leave A Reply

Your email address will not be published.