बिस्किटात ‘पार्लेजी’ आणि क्रिकेटमध्ये ‘नेहराजी’ म्हणजे फुल्ल टू रिस्पेक्ट.

मास्टर ब्लास्टर, द वॉल, दादा…. 

जगासाठी हि टोपणनावे असतील पण सच्च्या क्रिकेटप्रेमींसाठी हि नावे कोणत्याही सुपर हिरोपेक्षा मोठी आहेत. तसच एक टोपननाव मुल्तान का सुल्तान असणाऱ्या सेहवागने भारतीय प्लेअरला दिलं, ते म्हणजे नेहराजी. 

बिस्किट मध्ये पार्लेजी आणि क्रिकेट मध्ये नेहराजी, म्हणजे नादच नाय.

हे दोन “जी” म्हणजे कधीच बदल न झालेली जूनीजाणती माणसं.  

भारतीय क्रिकेट संघाच्या तीन पिढ्यांबरोबर आशिष नेहरा खेळला आहे. मोहम्मद अझरुद्दीनच्या कॅप्टनशिप अंडर सुरु केलेलं आपलं करिअर आशिष नेहराने वयाच्या ३८ व्या वर्षी विराट कोहलीच्या कॅप्टनशिप अंडर संपवलं. पण आपल्यासाठी सिनिअर असणाऱ्या अझरुद्दीन, गांगुलीच्या टीम मध्ये ज्या जिद्दीने नेहरा खेळत होता त्याच जिद्दीने, त्याच उत्साहाने तो एकेकाळी ज्या कोहलीने नेहराच्या हस्ते शाळेत बक्षीस स्विकारले आहे त्या कोहलीच्या टीममध्ये खेळत होता.

नेहराच्या स्वभावाची हीच कारणे आहेत कि तो सर्वांचा ‘नेहराजी’ आहे.

वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे नेहराला जितकं क्रिकेट खेळायला मिळायला पाहिजे होत तितकं मिळालं नाही त्यामुळे कदाचित इतर बॉलरशी आकडेवारी घेऊन तुलना करताना नेहरा कमी पडेल पण जेवढी संधी नेहराला मिळाली तेवढं मैदान त्याने गाजवलं हे नक्की.

नेहराच्या बॉलिंगचा विषय निघाला कि कोणीही त्याचा २००३ सालच्या वर्ल्डकपमधील इंग्लंड विरुद्धचा स्पेल विसरू शकणार नाही. फॉर्म मध्ये असणाऱ्या इंग्लंड विरुद्ध भारताची इनिंग २५० रन्स वरती संपली होती. इंग्लंडची बॅटिंग बघता भारत हि मॅच जिंकेल असं वाटतं नव्हतं पण याचवेळी बॉल हातात गेला नेहराजींच्या.

आशिष नेहराने आपल्या करिअर मधला सगळ्यात बेस्ट स्पेल या मॅच मध्ये टाकला होता. अवघड वाटणारी मॅच भारताने ८२ रन्सने जिंकली. फक्त २३ रन्स देऊन नेहराने ६ विकेट्स घेतल्या होत्या. नेहराच नाही तर कोणत्याही भारतीय बॉलरचा वर्ल्ड कपमधील हा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट स्पेल आहे. नसीर हुसेन, मायकल वॉन, पॉल कॉलिंगवूड सारखे बॅट्समन त्यादिवशी नेहराची शिकार बनले होते. साहजिकच आपल्या सर्वांसाठी नेहराचा हा सर्वात चांगला परफॉर्मन्स आहे. पण स्वतः नेहरासाठी मात्र हा स्पेल नाही तर त्याने टाकलेली फक्त एक ओव्हर त्याचा सर्वात चांगला परफॉर्मन्स आहे.

नेहरा २००४ साली भारत-पाकिस्तान वनडे मॅचेस च्या दौऱ्यासाठी पाकिस्तानात गेला होता. आधीच भारत-पाकिस्तान मधील मॅच त्यातच भारताचा संघ तब्ब्ल १५ वर्षाने पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता म्हणजे वातावरण किती टेन्स असेल याचा अंदाज आपल्याला येईल. पण पाकिस्तान दौऱ्याची सुरुवातच जिंकण्याने करायची या इराद्याने त्यादिवशी ग्राऊंड वरती उतरली होती.

भारताने पहिला बॅटिंग घेऊन सेहवागच्या ५७ बॉल मध्ये ७९ रन्स आणि द्रविडच्या १०४ बॉल मध्ये ९९ रन्सच्या जोरावर ३४९ स्कोअर उभा केला. आज जे क्रिकेट खेळलं जात आहे त्यामध्ये ३४९ रन्स कमी वाटतं असल्या तरी २००४ मध्ये हा स्कोअर बराच सेफ होता. त्या काळात फार कमी वेळा इतक्या रन्स विरुद्ध टीमने चेस केल्या होत्या. पण इंझमाम-उल-हक त्यादिवशी आपल्या कॅप्टन पदाला शोभेल असा खेळाला. आऊट होण्याच्या आधी इंझमाम ने १०२ बॉल मध्ये १२२ रन्स केल्या. भारत सहज जिंकेल अशी वाटणारी मॅच हातातून निसटायला लागली होती.

शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच आली तेंव्हा पाकिस्तानला जिंकण्यासाठी ६ बॉल मध्ये फक्त ९ रन्स पाहिजे होत्या . विकेटकिपर / बॅट्समन मोईन खान अजून क्रीज वर होता. घरच्या ग्राउंडचा फायदा पाकिस्तानला मिळत होताच. १५ वर्षानंतर पाकिस्तान मध्ये जिंकण्याची भारताला आलेली संधी जवळजवळ हातातून गेली होती.

कॅप्टन असणाऱ्या गांगुलीला देखील हि शेवटची ओव्हर कोणाला द्यायची हा प्रश्न पडला होता. यावेळी स्वतःहून पुढे आले आपले नेहारजी.

कोणतीही मॅच इतक्या क्रिटिकल परिस्थितीत असताना बॉलर ने स्वतःहून पुढे येणे तेही पाकिस्तान विरुद्ध हि चेष्टेची गोष्ट नाही. कारण पाकिस्तान विरुद्ध तुम्ही यावेळी केलेली एक चूक तुमच आपल्या देशात येऊन जगणं अवघड करू शकत होती. अशावेळी नेहरा स्वतःहून गांगुलीकडे गेला आणि म्हणाला,

दादा तू डर मत, मैं ओव्हर डालेंगा औंर जिताऐंगा.

अशा परिस्थितीत इतक्या आत्मविश्वासाने बोलायला देखील खूप धाडस पाहिजे. कॉमेंटेटरनी सुद्धा गांगुलीच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं होत. पण नेहराजींनी शेवटी आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवलाच.

ओव्हरचा पहिलाच बॉल नेहराने डॉट टाकला, नॉन स्ट्रायकर एन्ड ला असलेल्या मोईन खानला फक्त स्ट्राईक हवा होता. आपण स्ट्राईक ला आलो कि मॅच जिंकू हा विश्वास त्याला होता. दुसऱ्याच बॉलला मोईन खानला स्ट्राईक मिळाला. तिसरा बॉल पुन्हा डॉट गेला पण चौथ्या बॉलला सिंगल काढून २ बॉल ७ रन्स अशी मॅच आली.

सगळ्या ग्राउंडवर टेन्शन जाणवायला लागलं होत. आता खरं दडपण पाकिस्तान वरती आलं होत. पुढच्याच बॉलला एक रन काढून पुन्हा मोईन खान स्ट्राईक वरती आला. लास्ट बॉल मध्ये जिंकायला पाकिस्तान ला ६ रन्स पाहिजे होत्या. जावेद मियाँदाद यावेळी पाकिस्तानचा कोच होता. मियाँदाद ने १९८६ मध्ये भारताविरुद्धच लास्ट बॉलला सिक्स मारून मॅच जिंकून दिली होती. यावेळी देखील परत त्याची पुनरावृत्ती आपली टीम करेल असा विश्वास त्याला वाटत होता पण यावेळी मियाँदाद च्या या स्वप्नाच्या आडवे “नेहराजी” आले.

बाल्कनीतून मियाँदाद मोईन खानला आणि ग्राउंड वरती भारताची निम्मी टीम नेहराला काय केलं पाहिजे याच मार्गदर्शन करत होती. पण नेहराच्या चेहरा मात्र त्याच आधीच काय करायचं हे ठरल्यासारखा होता. नेहरा हा बॉल यॉर्कर टाकणार का बाउंसर टाकणार अशी कॉमेंटेटरची चर्चा सुरु असताना कोणी विचार करू शकणार नाही असा बॉल नेहराने टाकला.

एक बॉल मध्ये ६ रन्स ची आवश्यकता असताना नेहराने मोईन खान ला चक्क फुलटॉस बॉल टाकला आणि इथेच तो फसला. अचानक अंगावर आलेला फुलटॉस कसा खेळायचा हे मोईन खानच्या लक्षात आलं नाही आणि त्याने इरफान पठाणच्या हातात कॅच दिला.

६ बॉल मध्ये ९ रन्स ची गरज असणारा पाकिस्तान ६ रन्स ने हि मॅच हरला. इतक्या महत्वाच्या आणि टेन्स ओव्हर मध्ये नेहराने फक्त ३ रन्स पाकिस्तानला दिल्या.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.