गहलोत असा माणूस आहे, ज्याला दूध दिलं तरी तो पहिला ते मांजराला प्यायला देतो 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा मध्यप्रदेश मध्ये आहे. पुढच्या काही दिवसात ही यात्रा राजस्थान मध्ये जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच राजस्थान मधील दोन काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. 

सचिन पायलट गेल्या तीन वर्षात कित्येक वेळा रुसले, पक्ष सोडून निघाले. राहुल गांधींनी समजूत काढून धरून आणलं पण त्यांच समाधान झालं की नाही कळायला मार्ग नव्हता.

सचिन पायलट यांनी सांगळे प्लॅन करून झालं मात्र त्याचं पुढे काहीच होत नाही. त्याच कारण म्हणजे लै पावसाळे पाहिलेला माणूस अशोक गेहलोत.

त्यांनी आत्ता पर्यंत कित्येकदा सचिन पायलट यांना धोबी पछाड दिला आहे. मागच्या निवडणुकीचीच गोष्ट घ्या.

२०१८ च्या राजस्थानच्या इलेक्शनमध्ये कॉंग्रेसच्या १०० जागा आल्या. भाजपच्या ७३ जागा निवडून आल्या. राजस्थानच्या विधानसभा सदस्यांची संख्या आहे २००. म्हणजे बहुमताचा आकडा सिद्ध करायला आकडा होता १०१ चा. 

आत्ता गेल्या पाच वर्षांमध्ये काय झालं तर राज्याची पूर्ण धूरा सचिन पायलट यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. कॉंग्रेसचे कार्यकर्ते कितीही नाय हो करुदेत पण एक गोष्ट मान्य करायला लागते ती म्हणजे राजस्थानात सचिन पायलट यांच्यामुळे कॉंग्रेसला सत्ता स्थापन करता आली.

निवडणूकपूर्वी राहूल गांधींनी संपूर्ण कारभार पायलट यांच्या खांद्यावर टाकला होता. तिकीट कुणाला द्यायची इथपासून ते कोणाला कस निवडून आणायचं हे सगळं पायलट बघत होते. 

आत्ता या सगळ्या राजकारणात गहलोत काय करत होते.

तर आपल्या खास लोकांना तिकीट मिळण्याची फिल्डिंग लावत होते. पायलटने गहलोत यांच्या खास लोकांचा पत्ता निवडणूकपूर्वीच तिकीट नाकारून कट केलेला. अशा माणसांनी बंडखोरी केली. असा दावा होता की या माणसांना निवडून आणण्याच काम गहलोत यांनी केलं. मध्यंतरी अजित दादांनी चो चमत्कार राज्यात दाखवला तशीच काहीशी अवस्था सचिन पायलट यांची झालेली आहे.

म्हणजे कस तर सचिन पायलट यांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे ३० आमदार आहेत. त्यांची संख्या हळुहळु १५ आणि २० वर सरकली. तर दूसरीकडे गहलोत यांनी आपल्या निवासस्थानी शक्तीप्रदर्शन करत ११५ आमदारांची संख्या असल्याचा दावा केला. 

गहलोत यांच्याकडे आलेल्या आमदारांमध्ये छोटूभाई वसावा यांच्या ट्राईबल पार्टीचे दोन आमदार होते. CPM चे आमदार बलवान पूनिया होते. आरएलडीचे आमदार सुभाष गर्ग होते याचसोबत गहलोत यांनी पूर्वीच बंडखोरीच्या माध्यमातून निवडून आलेले काही अपक्ष आमदार आहेत जे जीवतोडून गहलोत यांची खूर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मिडीयाच्या माहितीनूसार गहलोत १०९ आमदरांच्या जीवावर आपली खूर्ची शाबूत ठेवू शकतात. 

आत्ता गहलोत यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची खूर्ची टिकवली तर वाट कूणाची लागली, सचिन पायलट यांची. पाहूण्याच्या काठीनं साप मारण्यात गहलोत फेमस आहेत. ते कसं तर याचा घटनाक्रम राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आलेल्या घडामोडींकडे पाहून मिळतो. 

पायलट यांनी अक्षरश: वाटा तुडवलेल्या, त्या बद्दल नो डाऊट. त्यामुळे कॉंग्रेस बहुमतात आल्यानंतर पायलट हेच राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार याबद्दल देखील नो डाऊट होता. कारण तिकीट तर पायलट यांना विचारूनच देण्यात आली होती. निवडणूक पण पायलट यांच्या नेतृत्वाखालीच लढण्यात आली. 

राहूल गांधी आणि सचिन पायलट एकाच काळात राजकारणात सक्रिय झाले. २००४ साली पायलट पहिल्यांदा खासदार झाले. राजेश पायलट गांधी घराण्याचे निष्ठावान समजले जात होते. इंदिरा गांधी यांच्यासोबत ओळख, संजय गांधी यांची मैत्री आणि पुढे राजीव गांधी, सोनिया गांधी असा निष्ठावंत असणारा कार्यक्रम त्यांनी केला. त्यामुळे सचिन पायलट यांनी गांधी घराण्यावर नाही म्हणलं तरी विश्वास होता. त्यामुळेच आपण आत्ता मुख्यमंत्री होवू असा विश्वास त्यांना होता. 

पण समोरचा म्हातारा अती कावेबाज. भल्याभल्यांना गुंडाळणारी काही माणसं असतात. त्यांचा सर्वोच्च नेता गहलोत म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. 

केसरी प्रकरणानंतर मॅडमजींका निष्ठावान हे बिरूद त्यांनी मिळवलच होतं. प्रश्न होता प्रियांका गांधी आणि राहूल गांधी यांच्यावर छाप सोडण्याचा. गुजरात मध्ये राज्यसभा इलेक्शनसाठी अहमद पटेलांचा जो डाव रंगला त्याच क्रेडिट गहलोत यांना गेलं. त्यामुळ राहूल गांधींसारखा (तरूण?) देखील त्यांची ताकद मान्य करु लागला. 

त्यामुळे गहलोत यांच पारडं शेवटच्या टप्यात जड झालं आणि सचिन पायलट यांच्या खात्यात उपमुख्यमंत्रीपद आणि PDW सारखं खातं आलं. दूसरीकडे गहलोत पून्हा राजस्थानचे नेतृत्व करु लागले. 

सत्तेत एकत्र नांदत होते पण आपल्या महाविकास आघाडीसारखाच कारभार सुरू होता. म्हणजे सगळं कस चांगल चालू आहे हे फक्त दाखवायचा कार्यक्रम सुरू होता. प्रत्यक्षात जेव्हा कोटा च्या हॉस्पीटलमध्ये लहान मुलांच्या मृत्यूंच प्रकरण गाजू लागलं तेव्हा पायलट यांनी गहलोत यांच्या आजूबाजूला फास आवळण्यास सुरवात केली. 

आत्ता मागच्या जूनची गोष्ट.

झालं अस की जूनमध्ये राजस्थानमधून राज्यसभेसाठी तीन खासदारांसाठी निवडणूक ठरलेली. १९ जूनच्या निवडणूकीपूर्वी ११ जूनलाच गहलोत सरकारने आमदारांची घेराबंदी करण्यास सुरवात केली. आमदारांची खरेदी विक्री रोखण्यासाठी डावपेच रचू जावू लागले. आत्ता ही खरेदी विक्री रोखण्यासाठी राजस्थान पोलीसांच्या SOG अर्थात स्पेशल ऑपरेशन ग्रुपने काही अपक्ष आमदारांना नोटीसा पाठवल्या. इथपर्यन्त ठिक होत पण अशीच नोटीस उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना देखील पाठवण्यात आली. 

आत्ता विचार करा मुख्यमंत्रीपदावर कोण आहे तर गहलोत. उपमुख्यमंत्रीपदावर कोण आहे तर पायलट. राज्यात काय सुरूय तर राज्यसभेच्या खासदारकीची निवडणूक. नोटीस कोणाला जाते तर पायलट यांना. आत्ता ही नोटीस कोणी पाठवण्यामागे कोण असेल याचा अंदाज तूम्ही लावू शकता, पण सुरवातीलाच सांगितल गहलोत लय कडवा माणूस आहे. पायलट यांना नोटिस आल्यानंतर पायलट दंगा करायला दिल्लीला जाणार म्हणून या माणसाने आपल्यासाठी पण एक नोटीस मागून घेतली. 

झालं इथून जो दंगा सुरू झाला ते पायलट यांना बाहेर काढूनच शांत बसला. आत्ता ते बाहेर पडले का काढलं हा संशोधनाचा विषय असेल पण परस्थिती निर्माण करणारे कोण तर गहलोत. 

इतका दंगा करून सचिन पायलट ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सारख भाजपमध्ये जाण्याचं धाडस करू शकले नाहीत. ते परतले पण उपमुख्यमंत्री पद गेलं ते गेलं.

गेहलोत यांच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आधी आपण त्यांच्या इतिहासात मारून येवूया म्हणजे अंदाज लागल. 

गहलोत केंद्रात नरसिंह रावच्या सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा राव यांचे अध्यात्मिक गुरू होते चंद्रास्वामी. तेच चंद्रास्वामी ज्यांनी इंग्लडच्या पंतप्रधान मार्गोरेट थेचर होतील, राव पंतप्रधान होतील अशा भविष्यवाण्या केलेल्या होत्या. राव पण लिंबूमिरचीवाल्या गॅंगमधलेच होते. गहलोत हे स्वत: जादूगार होते. म्हणजे त्यांचे वडिल प्रोफेशनल जादूगार होते आणि तेव्हा गहलोत त्यांच्यासोबत जादू दाखवत फिरायचे. आत्ता अशा माणसाला हातचलाखी माहितच असते. त्यांनी काय केलं तर चंद्रस्वामीला किंमत दिली नाही. स्वामीबाबांचा इगो दुखावला. त्यांनी राव यांच्याकडे निरोप दिली आणि गहलोत यांचा पद्धतशीर कार्यक्रम झाला. 

गहलोत पुन्हा राजस्थानात आले.

राजस्थान कॉंग्रेसमध्ये हरिदेव जोशी, परसराम मदेरना, शिवचरण माथूर असे वेगवेगळे गट होते.  १९९० आणि १९९३ च्या निवडणूका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष परसराम मदेरना यांच्या नेतृत्वात झाल्या होत्या आणि यामध्ये कॉंग्रेस तोंडावर आपटली होती. आत्ता चौथा खांब म्हणून गहलोत आले. त्यांनी हरिदेव जोशी यांना जवळ घेतलं आणि पहिलं काम केलं ते म्हणजे परसराम मदेरना यांना बाजूला सारून स्वत: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष झाले. 

अशातच १९९८ च्या इलेक्शन लागल्या. तेव्हा राज्यात जाट आंदोलन जोरात चालू होतं. कॉंग्रेसने यात हवा भरली. आत्ता जाट लोकांचा कुणाला पाठिंबा असणार तर सहाजिक विरोधकांना. कॉंग्रेसला फायदा झाला आणि १५३ जागांवर कॉंग्रेस दणदणीतपणे निवडून आली. 

आत्ता वेळ आली कॉंग्रेसने आपला नेता निवडायची. 

यात पहिला नंबर होता परसराम मदेरना यांचा. कारण काय तर ते जाट होते. दूसरं म्हणजे ते पहिल्यापासून राज्यात सक्रिय होते. दूसरा दावा होता नटवरसिंह यांचा. नेतानिवडीचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला. 

प्रत्येक राज्यांबाबत असणाऱ्या धोरणानुसार इथेही कॉंग्रेस हायकमांड म्हणजे सोनिया गांधी निवड करणार होत्या. ज्यामध्ये परसराम मदेरना यांचा नंबर वरचा होता. 

यासाठी दिल्लीतून माधवराव सिंधीया, गुलाब नक्बी आझाद, मोहसिना किदवई, बलराम जाखड हे चौघेजण आले. प्रत्येक आमदारांसोबत चर्चा करून पाठिंबा असणारा मुख्यमंत्री निवडायचं अस नियोजन ठरलेलं. त्यापूर्वी हॉटेलवर एकवर एकवर प्रत्येकाला भेटून घेवू अस नियोजन करण्यात आलं. पण या सगळ्या राड्यातून जाखड बाहेर एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेले. 

हे तिघे आमदारांच्या भेटी घेवू लागले. आमदारांच मत ऐकून झाल्यावर म्हणायचे पण मॅडमची इच्छा तर… 

अखेर नेता निवडीसाठी सर्व आमदार एकत्र आले. तेव्हा मॅडमची इच्छा तर म्हणून गहलोत यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. हे का दिलं तर तेव्हा मॅडम नव्याने राजकारणात आलेल्या. शरद पवारांसारख्या राज्यात ताकद असणाऱ्या नेत्यांची त्यांना भिती वाटू लागलेली. कॉंग्रेस हायकमांडवर संशय घेणाऱ्या लोकांचे पंख छाटायचं काम चालू होतं.

त्यातूनच जाट समाजाची वाढती ताकद लक्षात घेवून त्यांचा नेता असणाऱ्या मदेरना यांचे पंख छाटण्यात आले आणि या अचूक टायमिंगचा अंदाज गहलोत यांनी लावला. मदेरना यांना विधासभा अध्यक्ष करण्यात आलं तर नेतृत्व गहलोत यांच्याकडे गेलं. 

आत्ता दूसरा किस्सा

२००८ साली सीपी जोशी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. ते राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी १०० टक्के गॅरेंटी होती. अशा वेळी जोशी १ मताने हरले. सीपी जोशींचा पत्ता कट झाला. वसुंधरा राजे यांच्याविरोधात पूर्ण फिल्डिंग लावून ज्याने काम केले आणि कॉंग्रेसची सत्ता आणली तोच दूर झाला. राहता राहिला होता तो म्हणजे महिपाल मदेरना यांचा पत्ता. पण गहलोत यांनी इथपण फिल्डिंग टाईट केली आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. 

आत्ता महिपाल मदेरना यांच्यारुपात पक्षात नवा प्रतिस्पर्धी निर्माण झालेला. जोशी राज्याला रामराम ठोकून केंद्रात गेलेले. अशातच जादू झाली आणि भवरीदेवी कांड समोर आलं. गहलोत सरकारच्या काळातच हा खेळ झाला आणि मदेरना आयुष्यातून उठले. ते जेलमध्ये गेले आणि सक्रिय राजकारणाला कायमचा ब्रेक लागला. 

त्यामुळेच इथं पुण्यात बसून आम्ही सांगतोय गहलोत म्हातारं लय कडवं आहे. पाहूण्याच्या काठीनं साप मारायची त्याची जूनी खोड आहे. सुट्टी देत नसतय ते.  

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.