अश्विन नाईकने तुरूंगात लक्झरी लाईफ सेट केली अन् किरण बेदींनी ती मोडून काढली..

अश्विन नाईक हे नाव मुंबई अंडरवर्ल्ड कधीच विसरू शकत नाही. भावावर झालेल्या हल्ल्यामुळे अश्विन नाईक या विश्वात आला आणि काही काळ या अंडरवर्ल्डचा राजा देखील तो राहिला. दाऊद इब्राहिम असो किंवा अरुण गवळी सगळ्यांना फाट्यावर मारून अश्विन नाईक नाबाद राहिला. पायावर गोळी लागून तो व्हील चेअरला खीळला पण तरीही त्याने गुन्हेगारी विश्वात एक दरारा निर्माण केला.

बायको निताचा खून, इतर पंधरा मर्डर, मादक पदार्थ विक्री, खंडणी अशा अनेक आरोपांखाली अश्विन नाईक पाच वर्षे तिहार तुरुंगात आणि पाच वर्षे येरवडा तुरुंगात राहिला.

जेलमधे पण एक वेगळी दुनिया आहे आणि आपलं गुन्हेगारी विश्वात नाव असल्याने त्याचा फायदा कसा झाला याबद्दलही अश्विन नाईक बोलत असायचा. तुरुंगातील एकवेळची लक्झरी असलेली लाईफ किरण बेदींनी कशी बदलली याचा हा किस्सा पण अगोदर ही लक्झरी लाईफ तेही तुरुंगात ही काय भानगड आहे ते आधी पाहूया.

2012 साली दि टेलिग्राफच्या वेल्ली थेवरला दिलेल्या मुलाखतीत आपला अनुभव अश्विन नाईकने सांगितला होता

तुरुंगातील मैत्री ही फक्त फाटका पर्यंतच असते असं म्हणतात पण तिथल्या रखवालदारांशी आणि कैद्यांसोबत अश्विन नाईकची चांगली मैत्री झाली होती. जेव्हा तुरुंगातील गरीब कैद्याकडे जातमुचलक्यासाठी दोनेक हजार रूपये नसायचे तेंव्हा त्याला ती आर्थिक मदत अश्विन नाईक करायचा.

तिहार तुरुंगात मात्र भरपूर सुविधा होत्या असं अश्विन नाईक सांगतो. तिथलं व्यवस्थापन चांगलं होतं. तिथं रुग्णालये खूप होती, भरपूर नर्स तिथे होत्या. कधीकधी तिथल्या नर्स अश्विनसाठी डबा घेऊन यायच्या. 

तिहार तुरुंगात कैद्याला स्वतःचा टिव्ही आणण्याची तेव्हा अनुमती देण्यात आलेली होती. मात्र ज्या कैद्यांना टिव्ही परवडत नसे अशा जवळपास पन्नास कैद्यांना अश्विन नाईकने टिव्ही सेट घेउन दिले होते.

अशा अनेक सोयी तिथं होत्या. अंघोळीला गरम पाण्याची बादली हिवाळ्यात मिळायची. तिहार तुरुंगात असताना नाईकला एकदम सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आलेल होतं कारण त्याच्यावर इतके आरोप होते की कुठूनही त्याचा गेम होण्याची शक्यता होती.

1999 साली तिहार तुरुंगात गेल्यावर कारगिल युद्ध झालं होतं त्यावेळी खुप पैसे द्यावे लागले होते एकटा कैदी म्हणून अश्विन नाईकने दोन लाख रूपये तेव्हा दिले होते.

तिथेच जेलमध्ये त्याने एक कॅन्टीन चालवायला घेतलं केवळ भाजीपाला फुकट मिळायचा म्हणून. सहा हजार भाडं होतं पण कैद्यांना रोजगार मिळायचा म्हणून तो हे करायचा. ब्रेड पकोडे आणि चहा तो विकायचा. तुरुंगात झोप न लागणे हा एक प्रकार असतो. तेव्हा नायट्रोव्हिट घेऊन लोकं झोपून जायचे, कैद्यांना मारहाण व्हायची पण पैशाच्या जोरावर अश्विन नाईकने जेलची व्याख्याच बदलून टाकली होती. पैसे असेल तर सगळं मॅनेज होतं याचीच हि प्रचिती होती.

पैसे असतील तर हव्या त्या सुखसोयी मिळू शकतात याचं अजून एक उदाहरण अश्विन नाईकने सेट केलं ते म्हणजे तंबाखू. तेंव्हा पाचशे रुपयाला सात तंबाखू पुड्या मिळायच्या. कैद्यांचा हा लाड अश्विन नाईकने पुरवला पण हे कैदी तुरुंगात सगळीकडे भिंती थुंकून रंगवू लागले, प्रकरण पेटल आणि किरण बेदींनी ही केस हातात घेतली.

हे सगळं बंद करण्याचे अनेक प्रयत्न किरण बेदींनी केले. कैद्यांच्या नातेवाईकांना सांगून पाहिलं. शेवटी कैद्यांना अनेक मोठे प्रलोभने त्यांनी दाखवली. कैद्यांनी तंबाखू आणि सिगारेट सोडली तर आणखी सुविधा पुरविण्याचं आश्वासन दिलं.

कैदी त्या प्रलोभनाला बळी पडले आणि तंबाखू बंद झाली.

मग किरण बेदींनी हळूहळू कैद्यांची लक्झरी लाईफ कायमची बंद केली आणि कैद्यांना कैद्यासारखच वागवलं जाऊ लागेल. पण अश्विन नाईकने जी लक्झरी लाईफ जगली आणि जेलमध्येही जे इतर कैद्यांसाठी ‘ समाज कार्य ‘ केलं त्यामुळे कैद्यांमध्ये तो अजूनच हीरो बनत गेला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.