रेडिओ स्टेशनमध्ये काम करणारा पोरगा बॉलिवूडचा कॉमेडी किंग बनला…

असराणी या नावाला एकही सिनेमाप्रेमी ओळखणार नाही अस कधी होणार नाही. अनेक लोक असराणींचे कट्टर फॅन आहेत. असराणी यांनी केवळ कॉमेडी रोलच केले नाही तर गंभीर भूमिका साकारून बॉलिवूडला एक अनपेक्षित धक्का दिला होता. आपली कॉमेडी करण्याची एक वेगळी स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली आणि तब्बल 5 दशकं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तर जाणून घेऊया या हरहुन्नरी कलाकाराच्या जबरदस्त प्रवासाबद्दल.

1 जानेवारी 1940 रोजी राजस्थानमध्ये सिंधी परिवारात असराणी यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव गोवर्धन असराणी. त्यांच्या वडिलांचं कारपेंटरिंगचं दुकान होतं आणि साहजिकच वडिलांची इच्छा होती की मुलाने शिक्षण सांभाळून आपल्या कामात मदत करावी. पण असराणी यांचा ना व्यवसायात काम करण्याचा मूड होता ना ते अभ्यासात चांगले होते. कसेबसे ते मॅट्रिक पास झाले आणि जयपूरच्या कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाले. त्याचवेळी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ स्टेशनमध्ये नोकरी पकडली. तिथं ते व्हॉइसओव्हरचं काम करत होते आणि मिळालेल्या पैशातून त्यांचा अभ्यासाचा खर्च सुटायचा.

रेडियो स्टेशनमध्ये काम करत असतानाच त्यांच्या मनात अभिनय आपण करायला हवा हा विचार डोकावून गेला होता. म्हणून त्यांनी अभिनय कार्यशाळा केली आणि तिथेच स्वत:ही इतरांना शिकवू लागले आणि मग त्यांनी थेट मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यावर त्यांची भेट झाली किशोर साहू आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्याशी. या दोघांनी असराणी यांना सल्ला दिला की जर तुला इंडस्ट्रीत टिकून राहायचं असेल तर अगोदर अभिनयाचं व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन ये.

असराणी यांनी पुण्यातील FTII मध्ये प्रवेश घेतला आणि आपला अभिनयाचा कोर्स पूर्ण केला. मग मुंबईत आल्यावर त्यांना पहिल्या सिनेमात काम मिळालं तो म्हणजे हरे कांच की चुडीया. याच काळात त्यांनी सलग दोन वर्षे गुजराती सिनेमांमध्ये लीड हिरो म्हणून भूमिका केल्या. पण असराणी यांचं वैयक्तिक समाधान होत नव्हतं, त्यांना जे करायचं होतं ते करता येत नव्हतं.

आराधना सिनेमात त्यांना राजेश खन्नाच्या मित्राचा रोल मिळाला होता पण अनेक लोकांनी सांगितलं की राजेश खन्नासमोर हा तर अगदीच खुजा वाटतो आणि असराणी यांचा पत्ता या सिनेमातून कट झाला.

पुढे अनेक रोल त्यांच्या हातून गेले पण त्यांना ऋषिकेश मुखर्जी यांनी बावर्ची सिनेमात जो रोल दिला त्याने मात्र असराणी यांचं आयुष्य बदललं. मग मात्र ऋषिकेश मुखर्जी यांच्या प्रत्येक सिनेमात ते दिसू लागले. गुलजार यांच्या सिनेमातही असराणी यांना महत्वाचं स्थान होतं. असराणी हे एकमेव असे कलाकार होते जे त्या काळच्या सगळ्यात मोठ्या दोन सेलिब्रिटी लोकांच्या जवळचे मित्र होते ते म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना आणि बिग बी अमिताभ बच्चन.

अनामिका, अभिमान, चुपके चुपके, छोटीसी बात, तपस्या, पती पत्नी और वो, नालायक, तकदिरवाला, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ, हेरा फेरी, गरम मसाला, दिवाने हुए पागल अश्या अनेक सिनेमांचा ते भाग होते.

200 पेक्षा जास्त सिनेमात असराणी यांनी काम केलं आहे आणि त्यांच्या इतका जबरदस्त विनोदी कलाकार अजून कुठला झालेला नाही. शोले मधला जेलर असो किंवा धमाल सिनेमातला पप्पाजी वालं पात्र अजूनही लोकांच्या लक्षातून गेलेलं नाही. असराणी हे बॉलिवूडला मिळालेले कोहिनुर आहेत आणि तितकीच त्यांची कॉमेडी दर्जेदार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.