सोलापूरच्या त्या छोट्याशा वर्तुळाच्या दृष्टीने अतुल कुलकर्णी पूर्णपणे वाया गेला होता.

बरोबरची मुलं इंजिनियरिंगचा कोर्स संपवून जॉबला लागायची वेळ आली आणि हा बापाला सांगतोय की “मला इंजिनियरिंग झेपत नाही” एकतर बाप पोराचा जीव घेईल नाही तर हार्ट अटकने स्वतः वर जाईल अशी कंडीशन. थ्री इडियटसच्या फरहानचा सीन अतुल कुलकर्णीच्या घरात देखील घडला होता.

अगदी सुरवातीपासून सांगतो.

अतुल कुलकर्णीचे वडील सुधीर कुलकर्णी हे सोलापुरातील एक व्यावसायिक. सिगरेटविक्रीची एजन्सी होती त्यांची. सोलापूर उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात प्रत्येक पानपट्टीमध्ये सिगरेट त्यांच्या “बंदुक” एजन्सी मधूनच जायचे. सुखवस्तू कुटुंब. प्रत्येक भारतीय आईवडिलाप्रमाणे अतुलच्या घरच्यांची इच्छा होती पोराने डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं पण दहावीची त्याची प्रगती बघता त्यांच्या लक्षात आलं कि याच्याकडून खूप काही अपेक्षा ठेवण्यास अर्थ नाही.

मग त्यांनी आयडिया काढली. त्याकाळात कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषीक मुलांना इंजिनियरिंग कॉलेजमध्ये काही राखीव सीट्स असायच्या. अतुलचा जन्म बेळगावचा. त्यांनी त्याला अकरावी बारावीसाठी परत बेळगावला पाठवल. पण तिथे जाऊनहि खूप काही दिवे लावले असं नाही. बारावीत तर तो चक्क नापास झाला. तरीही घरच्यांनी चिकाटी सोडली नाही.

पुढच्या वर्षी बारावी पास झाला, सीमावर्ती कोट्यातून पुण्याच्या सीओइपीला प्रवेश मिळाला. आईवडिलाना वाटलं घोडं गंगेत न्हालं. आता चार वर्षाचा कोर्स आठ वर्षात का करेना, सीओइपीसारख्या महाराष्ट्रातील सर्वोत्तम सरकारी कॉलेजमधून इंजिनियरिंग केलाय म्हटल्यावर कुठे ना कुठे छोटी मोठी का होईना नोकरी मिळेल.

त्यांना वाटलेलं तस हा नापास झाला पण फर्स्ट इयरमध्येच गाडी तीन वर्ष अडकली. आणि अचानक एक दिवस म्हणाला इंजिनियरिंग झेपत नाही. आधीतर घरात महाभारत झालं. पण नतर कसबस वडील तयार झाले. पर्यायच नव्हता. सोलापूरला दयानंद कॉलेजला आर्ट्ससाठी प्रवेश घेतला.

सीओइपीमधून थेट आर्ट्स. अतुलच्या सगळ्या पाहुण्यांनी त्याच्या आईवडिलांना नको नको ते सगळ सुनावलं. त्यांना देखील आपल्या मुलाने नाक कापलं अशीच समजूत झाली. त्याच्या आईने तर लग्नसमारंभाला जायचं बंद केल. त्याच्या मित्रांपैकी अनेकजण आता कमवायला देखील सुरु केली होती. अतुलच्या बहिणीला वेगळच टेन्शन होतं.

“दादा जर आणखी एक वर्ष नापास झाला तर आपल्या वर्गात येणार. मग आपण मैत्रिणींना तोंड कसं दाखवायचं.”

एकूण काय सोलापूरच्या त्या छोट्याशा वर्तुळाच्या दृष्टीने अतुल कुलकर्णी पूर्णपणे वाया गेला होता. तो आता काही करेल असं वाटत नाही. स्वतः अतुलला वाटत नव्हतं.

दयानंद कॉलेजच्या गदरिंग साठी नाटक बसवत होते. तालमी सुरु होत्या. सहज बघायला म्हणून गेलेला अतुलसुद्धा त्यांना जॉईन झाला. कथा दिनूच्या मृत्यूपत्राची ही टी एकांकिका. यापूर्वी त्याने कधीच अभिनय केला नव्हता. लहानपणी शाळेत नाटकाच्या गर्दीत बाईनी झाड म्हणून उभ केल असाव एवढाच त्याचा अभिनयाशी संबंध.

पण दयानंदमधली ती नाटक प्रचंड गाजली. त्या नाटकाने त्याला ओळख मिळवून दिली. त्याच आयुष्य बदललं. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर

“वाघाला जशी रक्ताची चटक लागते तशी मला अभिनयाची चटक लागली. मला तेव्हा अभिनय खूप आवडत होता असं मी म्हणणार नाही पण मला त्या ग्लॅमरच आकर्षण वाटल. पूर्णपणे फेल्युअर म्हणून ओळखला गेलेला मी त्या नाटकामुळे कॉलेजचा स्टार झालो होतो ही भावना सुद्धा माझ्यासाठी महत्वाची होती. कदाचित यामुळेच मी नाटकाकडे वळलो असेन.”

अतुल कुलकर्णीच्या नाटकांनी सोलापूर गाजवलं, वेगवेगळ्या स्पर्धा गाजवल्या. एकापाठोपाठ एक नाटक बसवताना त्याला जाणवल आपल्याला हे जमतंय, आपण यात करीयर करू शकतो आणि म्हणूनच त्याने अभिनयाला सिरीयस घ्यायला सुरवात केली, तयारी केली आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्रवेश मिळवला.

तीन वर्षांनी तो तिथून बाहेर आला तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी याचं गांधी विरुद्ध गांधी हे नाटक त्याची वाट बघत होतं. याच नाटकामुळे सबंध महाराष्ट्राला त्याची चांगला नट म्हणून ओळख झाली. घरच्यांना हायसं वाटल. आता गाडी रुळावर येत होती पण तोवर आयुष्यातली तीस वर्ष उलटून गेली होती. 

अतुल कुलकर्णीचा तिथून पुढचा प्रवास सांगायची काही आवश्यकता नाही. देवराई, नटरंग, सत्ता, रंग दे बसंती, वळू अशा सिनेमामधून त्याने प्रत्येकाला स्पर्श करेल असा अभिनय केलाय. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार देखिल मिळाला. पण त्याला स्वतःला दहावी फ हा सिनेमा जास्त जवळचा आहे. यात सगळ्या शाळेने वाया गेलेत असा शिक्का मारलेल्या मुलांना प्रवाहात आणणाऱ्या शिक्षकाचा रोल त्याने केलाय. मला स्वतःला जर असे शिक्षक मिळाले असते तर खूप वर्ष वाचली असती असं त्यांना नक्की वाटत असेल. याच विचारातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकांच्या मदतीसाठी “क्वेस्ट फाउंडेशन” नावाची एक संस्था त्याने सुरु केलीय.

ती अपयशाची वर्ष अगदीच वाया गेली अशी नाही त्याच वर्षांनी अतुलच्या मनात संवेदनशील विद्यार्थी जिवंत ठेवलाय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.