तुम्ही विसरला असलात तरी राम रहीमला आजही टनाने पत्रे येत असतात..
तुम्हाला वाढदिवसाला जास्तीत जास्त किती शुभेच्छा येतात?
व्हॉट्सऍप शंभर भर, फेसबुकवर हजारभर, आणि भेटून पाच दहा जण. लयच युवानेता असला तर हा आकडा गुणीले दहा करू. शिवाय तलवारीने केक कापण्याची फॅशन ॲड करु. पण आपण बापुडे कितीही झालं तरी बाबा राम रहिम समोर आख्या उख्यी वेख्येचं असणार आहोत.
बाबा राम रहिमला वाढदिवसाच्या दिवशी एक टन ग्रिटिंग कार्ड आलेले.
बर हा एक टनाचा आकडा काय बाबा राम रहिम आपल्या आयुष्याच्या उच्च टोकाला होता तेव्हाचा नाहीए तर तो जेलमध्ये होता तेव्हाचा आहे. म्हणजे आत्ताचा.
आत्ता विचार करा या माणसाची काय क्रेझ असेल ?
हरियाणाचा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला, बलात्कार आणि खुनाच्या आरोपांखाली शिक्षा भोगत असलेला बाबा गुरुमित राम रहीम याला त्याच्या १२ ऑगस्ट २०१८ रोजीच्या जन्मदिवशी त्याच्या अनुयायांनी १ टन ग्रिटींग कार्ड पाठवली होती. हरियाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश या राज्यांतून या शुभेच्छा बाबांपर्यंत पोहचल्या होत्या.
आता मला सांगा १ टन शुभेच्छा ऐकून कोणाच्या चक्कीत जाळ होणार नाही. तसचं ही पत्र बघून टपाल कर्मचाऱ्यांचं डोकं फिरलं होत. या शुभेच्छा पत्रांमध्ये साध्या कागदावर लिहिलेल्या मजकुरासह महागडी ग्रिटींग पण होती.
आजही तुरुंग प्रशासनाला येणाऱ्या टपालामध्ये ९० टक्के पत्रे ही राम रहीमसाठीच आलेली असतात.
एक साधा पोरगा डेऱ्याचा प्रमुख कसा झाला..?
बाबा राम रहीम हा बेसिकली डेरा सच्चा सौदाचा प्रमुख. तर हे आधी डेरा सच्चा सौदा काय विषय आहे ते समजून घेऊया. डेरा म्हणजे राहण्याची, मुक्कामाची व्यवस्था. याची स्थापना केली १८९१ मध्ये बलुचिस्तानच्या कलतमध्ये मस्ताना जी महाराजांनी. यामागे मूळ उद्देश म्हणजे एकत्र येवून समाजसेवा करणे.
पुढे १९४८ मध्ये बाबा सावनसिंग यांनी हरियाणातील सिरसा येथे याची एक शाखा चालू केली. १९६० ते १९९० यादरम्यान शाह सतनामजी महाराज डेरा प्रमुख होते.
याच काळात १९६७ साली गुरुमितचा जन्म झाला. तो मुळचा राजस्थानचा असला तरी त्याचे वडिल मघरसिंग हे सतनामजीसिंग यांचे कट्टर अनुयायी होते. त्यांच्या जोडीने गुरुमितही लहान असल्यापासूनच या आश्रमात येत होता. प्रसादाचे लाडू वाटणे, साफसफाई करणे अशी बारकी कामे करत असे. हळू हळू इथे त्याने धर्मशास्त्र आणि ग्रंथांचा अभ्यास केला. गुरुंचे व्यसनाधिनता टाळण्यासाठीचे आणि समाजसेवेचे तत्वज्ञान अंगिकारले.
पोराची हुशारी बघून तो केवळ ७ वर्षांचा असतानाच ३१ मार्च १९७४ रोजी डेरा प्रमुख शाह सतनामसिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती. पुढे २३ सप्टेंबर १९९० मध्ये सतनामजी यांनी एक सत्संग बोलवून अधिकृतरित्या गुरमीत राम रहीमला डेरा प्रमुख केले. त्यावेळी तो केवळ २३ वर्षांचा होता. कमी वयातच तो जगाचे तत्वज्ञान सांगु लागला.
बाबाचे सर्वदूर आश्रम निघाले, अगदी साताऱ्यातल्या खेड्यातही
तर अशा या राम राहीमचे हरियाणासह देशभरात ५ कोटीच्या आसपास भक्त आहेत. तर भारत आणि भारताबाहेर मिळून डेऱ्याच्या एकूण २५० शाखा आहेत. १९९० नंतर त्याने या शाखा वाढविल्या. अगदी महाराष्ट्रात सुद्धा. त्यातही सातारा, सांगली या हजारो किलिमीटर लांब.
सांगलीतील आटपाडीत १९९५-१९९६ च्या आसपास ६५ एकरांवर आश्रम होता. त्यात खाली गुहा आणि वर आलिशान राजवाडा असं सगळं होत. पण ४-५ वर्षातच बाबाच कर्तृत्व समजलं न लोकांनी जाण-येणं बंद केलं. त्यामुळे तो बंद पडला.
परत २००५ च्या आसपास बाबा साताऱ्यातील फलटणमधील पिंपरदमध्ये अवतरले. ज्या गावात पोलीस ४ महिन्यातुन एखादा साधा दम द्यायला जातेत अशा गावात Z सिक्युरिटी वाल्या बाबांना बघून लोक आकर्षित होऊन गेली. मग काय ८ हजार अनुयायांनी ४ दिवसातच ५० लाख रुपये खर्चून आश्रम बांधला.
२००० सालानंतर बाबा ‘रॉकस्टार’ झाला..
२००० सालानंतर त्याने पारंपारिक पद्धतीने तत्वज्ञान सांगण्याची कास सोडली आणि सत्संगाचे आधुनिकीकरण केले. ते पण असं केल की त्याने सत्संगला रॉक व्हर्जन देवून ते शोज् च्या स्वरुपात घ्यायला चालू केलं. अचकट-विचकट कपडे घालत लाखालाखांचे रॉक शोज् होवू लागले. त्यात सबकुछ तोच असायचा.
पण रॉक असली तरी आपली पिक्चरमधली गाणी नाही बर का. तर जातीभेदाविरुद्ध, दहशतवादाविरूद्ध, स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध, सामाजिक चालीरीतींविरुद्धच्या विषयांवर होती. ’ना धर्म पे, ना जात पे, लढाई आंतकवाद से’ अशी गाणी असलेली ‘नेटवर्क तेरे लव्ह का’, ‘लव रब से’, ‘हायवे लव चार्जर’ या नावाचे आतापर्यंत सहा म्युझिक अल्बम प्रसिद्ध झालेत.
राम रहीम जसा कार्यक्रमात अचकटविचकट स्टायलिश कपडे घालायचा, तशीच कपडे प्रत्यक्ष आयुष्यात घालायचा. विशेष पद्धतीने डिझाईन केलेल्या गाडीत फिरायचा. या कार्सचे डिझाईन राम रहिम यांनी केले असल्याचे सांगितले जाते. राम रहिमची कार तयार करण्यासाठी अपघातग्रस्त कारला मॉडिफाय केले गेले. यांच्याकडे खास प्रकारच्या स्कूटर आणि हमर सारख्या दिसणाऱ्या कार आहेत.
त्यांच्या भोवती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुरक्षागार्ड तैनात असतात. बऱ्याच वेळा हा बाबा बॉलिवूड कलाकारांसोबत दिसायचा. कार्यक्रमाच्या ठिकाणी तो हार्डले डेव्हिनस वरुन जात होता.
हा एवढ्यावरच गप्प बसला नव्हता. २०१५ मध्ये मेसेंजर ऑफ गॉड भाग १ आणि २ असे दोन भाग १ वर्षात प्रसिद्ध केले होते. यात तो दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार, एडिटर असा सगळंच झाला होता. त्याच वर्षी इंडियन एक्सप्रेसने १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून ९६ व्या नंबरला त्याची निवड केली होती.
२००२ साल बाबासाठी भांडाफोड करणार ठरलं
बाबाचे रॉक शोज आणि स्टाईलचे प्रदर्शन चालूच होते. अशातच एक दिवस २००२ मध्ये एका साध्वीने राम रहिमवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत एक पत्र लिहिले आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
ही बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली. बाबाचे समर्थक रस्त्यावर उतरण्याच्या मूडमध्ये होते. प्रकरण गुंतागुंतीचे आणि संवेदनशील असल्यामुळे २००३ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती.
बलात्काराच्या आरोपानंतर लगेचच दोन खुनाचे आरोप देखील झाले.
सिरसातील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून अनेकदा डेरा सच्चा सौदामध्ये महिलांवर कशाप्रकारे अत्याचार केले जातात यासंबंधीच्या बातम्या दिल्या होत्या. या बातम्यांनी थेट राम रहीमवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. यानंतर ऑक्टोबर २००२ मध्ये रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला होता.
दुसरे प्रकरण डेराचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य रणजीत सिंह यांच्या हत्येशी संबंधित आहे. रणजीत हा डेऱ्याच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य होता. तो राम रहीम यांच्या जवळचा असल्याने त्याला राम रहीम याचे सारे कारनामे माहीत होते. त्याचीही १० जुलै २००३ मध्ये हत्या करण्यात आली.
या दोन्ही हत्या आणि बलात्कार प्रकरणात गुरमीत राम रहीम हा मुख्य सूत्रधार असल्याचे सीबीआयनं म्हटले होते. यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २००३ मध्ये खुनाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. २००७ मध्ये सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयामध्ये याप्रकरणी सुनावणी सुरू केली.
यानंतर २५ ऑगस्ट २०१७ रोजी न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवले.
निकालावेळी काय झालं होत ?
निकालाच्या वेळी आरोपी राम रहीम शंभरावर मोटारींच्या ताफ्यातून कोर्टाकडे गेला होता. त्याचे हजारो समर्थक त्यादिवशी नायालयाबाहेर जमले होते. निकाल विरोधात गेला तेव्हा हा जमाव बेकाबू झाला आणि राज्यात एक लाख पोलिसांचा बंदोबस्त होता तरीही अनेक लोक जीवे मारले गेले. शेकडो जखमी झाले.
लोकांच्या आणि वृत्तवाहिन्यांच्याही गाडय़ा जाळल्या गेल्या. पेट्रोल पंप, टेलिफोन एक्स्चेंज, प्राप्तिकर कार्यालय, दूध प्रकल्प पेटवून दिले होते. त्यानंतर पंजाब, हरियाणामध्ये चार दिवस शाळा बंद केल्या होत्या. १५४ ट्रेन रद्द, लष्कराला ध्वजसंचलन करावं लागलं, जमावबंदी लागू झाली, ७२ तास मोबाइल, इंटरनेट बंद होतं.
यानंतर जगासमोर आली बाबाची मुलगी हानीप्रीत :
गुरमीत राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर सगळ्यात जास्त कोणती व्यक्ती चर्चेत राहिली असेल तर ती होती त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत उर्फ प्रियंका तनेजा. तशी ती MSG सिनेमानंतर सर्वसामान्यांच्या नजरेत आली होतीच. तिची पण गोष्ट इंटरेस्टिंग आहे.
१९९६ मध्ये कॉलेजच्या निम्मिताने प्रियांका डेऱ्यामध्ये आली होती. एकदा वर्गात मुलींना आशीर्वाद देण्यासाठी गेल्यावर बाबाने तिला बघितले. हळू हळू तो सत्संगसाठी बोलवू लागला. एकदा तिचा विश्वास बसल्यानंतर बाबाने तिच्यावर आपला प्रभाव पाडवा.
अन् नवीन नाव देवून हनीप्रीत हे नवीन नाव दिले.
पुढे १४ फेब्रुवारी १९९९ रोजी हनीप्रीतचे आणि विश्वास गुप्ता याचे राम रहीमने लग्न लावून दिले. मात्र, दोघांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. काही काळानंतर सासरचे लोक हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार हनीप्रीतने राम रहीमकडे केली.
त्यामुळे ती राम रहीम सोबतच राहू लागली. २००९ मध्ये तिला आपण दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. पण तिच्या नवऱ्याने सांगितलेलं ते दोघे नवरा बायको होते. हे ऐकून आता खर काय, खोटं काय हे त्या दोघांनाच माहित!
हे ही वाच भिडू
- चार्जशिट वाचल्यानंतर आसाराम सारखा माणूस आयुष्यभर जेलमध्ये सडावा असचं वाटेल
- या बाबांच्या आदेशामुळे राजीव गांधींनी राम मंदिराचा शिलान्यास केला.
- तिथूनच मुख्यमंत्री आणि वर्षा बंगला हे समीकरण दृढ झालं.