बाबूराव शेडमाके असे स्वातंत्र्यवीर होते ज्यांनी इंग्रजी फौजांना चार वेळा अस्मान दाखवलं.

बाबूराव शेडमाके हे नाव आपण कधीच ऐकले नसेल. चुकून तुमच्या कानावर हे नाव आलच असेल तर ते ही कुठल्यातरी इतिहासाच्या वर्गात. ते ही अशा वर्गात जिथे वंचित घटकांचा इतिहास मांडला जातो. 

अगदी व्यवस्थित सांगायच झालं तर काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी कल्याण विभागामार्फत कॅलेंडर छापण्यात आले होते. यामध्ये बाबूराव शेडमाकेंचं वय ४ वर्ष देण्यात आलं होतं.

म्हणजे त्यांचे जन्मवर्ष १८५४ आणि शहिद होण्याचं वर्ष १८५८ देण्यात आलं होतं. इतकी गंभीर चूक असूनही कोणांच्या भावना दुखावल्या नाहीत की ही ब्रेकिंग न्यूज झाली नाही. 

कधीकधी वंचीत घटकांच्या राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर होत देखील असेल पण हे नाव आजही सर्वसामान्य मराठी मुलाला माहित नाही हेच खरं. अशाच आपल्या माणसांच्या गोष्टी तुम्हाला बोलभिडू मधून सांगायच्या असतात. 

तर ही गोष्ट आहे एका स्वातंत्र्यवीराची ज्यांनी चार वेळा इंग्रजी फौजांना अस्मान दाखवलं होतं. ज्यांनी इंग्रजांच्या फौजांचा पराभव केला होता. 

१८५७ च्या उठावाला जे तत्कालीन कारण ठरलं होते तो डॉक्टरिन ऑफ लैप्स अर्थात दत्तक विधानाच्या नामंजूरीवर लॉर्ड डलहौसीने काही संस्थाने खालसा केली होती. या अधिकारा अंतर्गतच त्यांने आजच्या महाराष्ट्रातील चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भाग हस्तगत केला होता. इंग्रजांच्या काळात हा भाग चांदा जिल्हा म्हणून ओळखला जात असे. 

इंग्रजांनी मार्च १८५४ साली चांदा जिल्ह्याचा भाग आपल्या ताब्यात घेवून आर.एस. एलिस यांना चांद्याच कलेक्टर केलं. त्या काळात इथे जमिनदार होते. गोंड समाजाचे आदिवासीच याचं नेतृत्व करत असत. 

आजच्या गडचिरोली जिल्ह्यातील मोलमपल्ली एरियामध्ये एकूण २४ गावांचा समावेश होत होता. २५ वर्षांचे बाबूराम शेडमाके तेव्हा मोलमपल्लीच्या २४ गावांचे जमीनदार होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८३३ चा. 

१८५४ साली इंग्रजांनी हा जिल्हा आपल्या अधिपत्याखाली आणल्यानंतर बाबूराव शेडमाके यांनी उठाव केला.

शेडमाके यांनी गोंड, माडिया आणि रोहिल्ला समाजातून ५०० तरुणांची फौज बांधली. याच फौजेच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांदा जिल्ह्यातील राजगड परगणा काबीज करून दाखवला. शेडमाके यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाल्याची माहिती जिल्ह्याचे कलेक्टर कॅप्टन क्रिस्टन यांना मिळताच त्यांनी १३ मार्च १८५८ रोजी नांदगाव घोसरी येथे आपली एक तुकडी पाठवली.

नांदगाव घोसरी येथे बाबूराव शेडमाके यांच्या विरोधात कंपनी सरकारची तुकडी लढली. या युद्धात ब्रिटीशांचा लाजिरवाणा पराभव झाला. शेडमाके यांच्या सैन्याने बऱ्याच ब्रिटीशांना ठार केलं आणि त्यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेतली. 

याच घटनेनंतर अडपल्ली आणि घोटचे जमीनदार वैकटराव हे बाबूराव शेडमाकेंना येवून मिळाले. या दोघांनी मिळून १२०० जणांच सैन्य उभारलं व ब्रिटीशांसोबत खुले युद्ध पुकारले. या सैन्याने मिळून सर्व भाग आपल्या ताब्यात आल्याची घोषणा केली. या फौजांनी सुरला किल्ला ताब्यात घेतला. 

कलेक्टर क्रिस्टनला याची माहिती मिळताच त्याने कंपनी सरकारची दूसरी फौज शेडमाकेंच्या सैन्याच्या बंदोबस्तासाठी पाठवली. मात्र या तुकडीचा देखील लाजीरवाणा पराभव झाला. 

दोन वेळच्या सततच्या पराभवानंतर कॅप्टन क्रिस्टनला शेडमाकेंच्या फौजांच्या ताकदीचा अंदाज येवून गेला होता. त्यामुळे कॅप्टन क्रिस्टनने नागपूरवरून लेफ्टनंतर नॉन नटल यांच्या नेतृत्वात फैज मागितली. १९ एप्रिल १८५८ साली सगनपूर आणि २७ एप्रिल १८५८ साली बामनपेट येथे झालेल्या लढाईत शेडमाकेंच्या सैन्याचा पुन्हा एकदा विजय झाला. 

ब्रिटीश फौजांचा सलग तिनवेळा पराभवाचा सामना करावा लागला.

२९ एप्रिल १८५८ रोजी त्यांनी ब्रिटीशांनी जोडलेल्या टेलिग्राफच्या तारा तोडून दिल्या. त्यासाठी टेलिग्राफ ऑफिसवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन ब्रिटीश मारले गेले. यामध्ये पीटर नावाचा शिपाई यशस्वीरित्या पळून गेला. या पळून थेट जंगलातून कॅप्टन क्रिस्टनच्या घरी पोहचला. इथे त्यांने झालेल्या घटनेचं पूर्ण वर्णन सांगितलं. 

आत्ता कॅप्टन क्रिस्टनने शेडमाकेंचा संपुर्ण बंदोबस्त करायचा म्हणून नागपूर वरून कॅप्टन शेक्सपीयर यांच्या नेतृत्वाखाली फौजा बोलावल्या. १० मे १८५८ रोजी झालेल्या घोट गाव परिसरातील या युद्घात देखील ब्रिटीशांचा पराभव झाला. सलग चार वेळा ब्रिटीश सैन्याला पराभव पत्करावा लागला. 

आत्ता मात्र ब्रिटीशांनी डोक्याने काम करण्याचं धोरण राबवलं व त्यासाठी आपली जूनी पुराणी निती फोडा व झोडाचा वापर करण्याची तयारी केली. 

या अंतर्गत त्यांनी अहेरीच्या राणी लक्ष्मीबाईंना सांगितलं की तूम्ही शेडमाकेच्या सैन्याचा बंदोबस्त करू शकला नाही तर तुमचे राज्य ताब्यात घेवून तुमच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. या कारणाने लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य शेडमाकेंच्या मागे लावले. अत्यंत शिताफीने या सैन्याने १८५८ च्या जुलैमध्ये शेडमाकेंना अटक केली. मात्र अहेरीला घेवून जात असतानाच शेडमाके फरार होण्यात यशस्वी झाले. 

मात्र १८ सप्टेंबर १८५८ रोजी मात्र लक्ष्मीबाईंच्या सैन्याला यश आलं आणि शेडमाकेंना अटक करण्यात आली. त्यांना चंद्रपूरात आणून कॅप्टन क्रिस्टीनच्या ताब्यात देण्यात आलं. 

२१ ऑक्टोंबर रोजी त्यांनी फाशीची शिक्षा घोषीत झाली. त्याच दिवशी दुपारी दोन वाजता चंद्रपूर जिल्हातील जेलच्या बाहेर असणाऱ्या झाडावर त्यांना फाशी देण्यात आली. काहीजणांच्या मते शेडमाके हे फाशीवर लटकवलं जात असताना चार वेळा दोर कापून टाकण्यात यशस्वी झाले होते म्हणून त्यांना चुन्यात बुडवून मारण्यात आलं व नंतर लटकवण्यात आलं. 

आजही चंद्रपूर जिल्ह्यातल्या त्या झाडाखाली बाबूराव शेडमाके यांच स्मारक त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देत उभे आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.