हाच तो शेतकऱ्याचा पोरगा ज्याच्या ‘भारत बायोटेकने’ कोरोनावर लस तयार केली
कोरोनाची लस येत नाय तोपर्यन्त काय खरं नाय गड्या,
पण आत्ता कोरोनाची लस बाजारात येण्यासंबधी मार्ग तर तयार होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने कोरोनाची जी लस तयार केली त्याचं मानवी परिक्षण करण्यास परवानगी देण्यासंबधित बातमी आली.
सगळं काही व्यवस्थित झालं तर ही लस १५ ऑगस्टपर्यन्त मार्केटमध्ये येवू शकेल अस सांगण्यात येत आहे.
COVAXIN नावाची लस तयार करण्यात यशस्वी पाऊल टाकणाऱ्या या कंपनीच नाव भारत बायोटेक आहे. या कंपनीवर सरकारीयंत्रणेचा विश्वास आहे कारण यांनी झिका व्हायरसची लस बाजारात आणली होती. तसेच या कंपनीने हिपॅटेटिसची लस जगातील सर्वात कमी किंमतीत बाजारात उपलब्ध करुन दिली होती. भारत बायोटेक ने इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि इंडियन कॉऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या सहकार्यातून ही लस तयार केल्याची बातमी आहे.
भारत बायोटेक ही कंपनी कुणाची आहे ?
भारत बायोटेक या कंपनीची स्थापनी तामिळनाडूच्या थिरूथानी येथे शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या डॉ. कृष्णा एला यांनी केली. शिक्षणाचा गंध नसलेल्या सर्वसामान्य घरातून हा मुलगा शिकला. त्यांनी कृषी क्षेत्रातलं शिक्षण घेतलं याचं क्षेत्रात काहीतरी भरीव करायचं अस उद्दिष्ट होतं पण पुढे ते बायोटेक्नोलॉजीत गेले आणि इतिहास घडत गेला.
सध्या डॉ. कृष्णा भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेंजिंग डायरेक्टर आहेत.
त्यांना शेती विषयात पदवी घेतली. कृषी पदवीधर होवून घरची शेती करणं हेच त्यांच्या आयुष्याचं स्वप्न होतं पण पैशाच्या गरजेपोटी ते नोकरी करु लागले. बायर नावाच्या फार्मास्युटिकल्स कंपनीत ते नोकरी करू लागले. पुढे हंगर फेलोशिप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा रस्ता मोकळा झाला. विस्कॉन्सिन मेडिसन विश्वविद्यालयात त्यांनी पीएचडी पूर्ण केली. ते साल होतं १९९५ चं.
त्यानंतर अमेरिकेतच नोकरी करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा त्यांचा विचार होता पण त्यांच्या आईने त्यांचे डोळे उघडले. त्यांची आई म्हणाली, तूला जे काही करायचं असेल ते इथे भारतात येवून कर. तू जवळ पण रहाशील आणि तूझ्या ज्ञानाचा आपल्या देशाला फायदा पण होईल. सारासार विचार करुन डॉ. कृष्णा भारतात आले.
भारतात आल्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या छोट्याशा भांडवलावर त्यांनी एक छोटी लॅब तयार केली. तीच ही आजची भारत बायोटेक.
सुरवातील हिपॅटेटिसची लस १ डॉलर इतक्या कमी किंमतीत मार्केटमध्ये आणण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी कंपनीला १२ कोटी रुपयांची आवश्यकता होती. कंपनीसाठी इतका फंड गोळा करणं अशक्य होतं तेव्हा आयडीबीआय कंपनीने त्यांना कर्ज दिले. ही कर्जाची रक्कम फक्त दोन कोटी होती तरिही कृष्णांनी हार मानली नाही. चार वर्ष त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी लॅबमध्ये परिश्रम केले आणि १ डॉलर इतक्या कमी किंमतीत हिपेटॅटिसवर बाजारात लस आणली.
दूसऱ्या कंपन्यांची लस तेव्हा बाजारात ४० डॉलरच्या किंमतीत मिळत होती. तेव्हा १ डॉलर म्हणजे अशक्यप्राय किंमत होती. त्यामुळेच ही लस खुद्द तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीने प्रती डोस १० रुपयांच्या किंमतीवर ३५ मिलीयन डोसची विक्री जगभरातील गरिब देशांमध्ये केली होती.
कंपनीच्या या गरुडभरारीत आंध्रप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचा सिंहाचा वाटा आहे.
भारतात उद्योग उभा करणं अशक्य असल्याचं सांगण्यात येते. अनेकदा असे प्रकल्प सरकारी लालफितशाहीचे बळी ठरतात. आवश्यक त्या परवानग्या मिळत नाहीत आणि हे प्रकल्प बासनात गुंडाळले जातात. पण चंद्राबाबू नायडूंचे धोरण डॉ. कृष्णा एला यांच्यासाठी फायद्याचं ठरलं.
चंद्राबाबू नायडू आंध्रप्रदेशात प्रदुषण न करणाऱ्या उद्योगांना घेवून एक बायोटेक नॉलेज पार्क स्थापन करण्याच्या विचारात होते. नॉलेज पार्क अर्थात जीनोम व्हॅली अस याचं स्वरुप असणार होतं व इथे १०० हून अधिक बायोटेक संबधित उद्योग उभा राहणार होते.
हा प्रयोग यशस्वी झाला आणि झिनोम व्हॅलीचा हिस्सा भारत बायोटेक झाली. याच व्हॅली बायोटेक संबधित नोवार्टिस, बायर, आयटिसी अशा नामांकित कंपन्या स्थापन करण्यात आल्या.
त्यानंतर कंपनी कोणत्याही लालफितीच्या कारभारात कमीच अडकली गेली. कंपनीने आपली हॅपेटेटिसची स्वस्त लस पहिल्यांदा मार्केटमध्ये आणली. याच कंपनीने सेल कल्चरल स्वाईन फ्लू ची लस मार्केटमध्ये आणली. जीका व्हायरसची लस शोधणारी ही जगातील पहिली कंपनी ठरली.
आज डॉ. कृष्णा यांना १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
जेव्हा जगभरातले अनेक देश कोविड १९ ची लस शोधण्यात अपयशी ठरत असताना भारत बायोटेक ही विश्वासू कंपनी लस घेवून बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे.
हे ही वाच भिडू.
- या बाईमुळे पोलिओ, स्वाईन फ्लू ते कोरोनाची लस शोधणं सोप्प जातं
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाची तब्बल २७ वेळा नोबेलसाठी शिफारस करण्यात आली होती !
- कोरोना शहरातून सह्याद्रीत पोहचता कामा नये, त्यामुळे ट्रेकिंग काही महिने थांबवा..